Wednesday, 9 July 2014

गरज राष्ट्रवादी'मुक्त' महाराष्ट्राची!

Sunday, July 6, 2014

मकरंद देशपांडे नावाचा एक अवलिया कलाकार आहे. तो लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, नाटय़चळवळय़ा असा सर्व काही आहे. त्याचं लेखनही तसं हटके असतं. त्याच्या एका नाटकातला एक संवाद त्याची प्रचीती देतो. तो संवाद असा : 'बंद घडी भी दिन में दो बार सही वक्त दिखाती है!
हा संवाद आठवायचं कारण (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष! जोमानं सुरू झालेल्या या पक्षाचे घडय़ाळ 'बंद' पडत आलंय. तरीही त्यांच्या साहेबांसकट त्यांच्या चेल्यांना असं वाटतंय की, आपल्यासारखी 'वेळ' कुणालाच 'साधता' येत नाही! घडय़ाळासारखाच आपला पक्ष वेळेशी सुसंगत ध्येयधोरण घेतोय. घडय़ाळाचे काटे पुढे सरकतात तसा आपला पक्षही पुढे सरकतोय! काळ-काम-वेगाचा (इतर कामांप्रमाणेच) आपणच ठेका घेतलाय आणि टोल तर आपलं अंगभूत अंगच आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला चार जागा मिळाल्या. चारपैकी तीन 'घरं'च आहेत. एक पवारांचं, एक मोहित्यांचं, एक भोसल्यांचं. अपवाद असा चौथा निवडून आलाय. पक्षाची कामगिरी नऊवरून चारवर आल्याने निवडणूक आयोगाने 'तुमचा 'राष्ट्रीय' दर्जा का काढून घेऊ नये?' अशी नोटीस काढलीय. 'राष्ट्रीय' दर्जा मिळवण्यासाठीच्या मुख्य तीन-चार कसोटींना उतरेल अशी आता पक्षाची स्थिती उरलेली नाही. त्यामुळे संगमा आणि तारिक अन्वरसह 'राष्ट्रीय' म्हणून मिरवणारा हा पक्ष लवकरच 'महाराष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष होईल. पण त्याने या पक्षाची अंगभूत मस्ती उतरणार नाही!
स्थापनेपासून सत्तेला चिकटलेल्या या पक्षाची सध्याची प्रतिमा ही भ्रष्ट सत्ता, संपत्तीचा माज आणि हम करेसो कायदा अशी झालेली आहे. राज्यात सरकार आघाडीचं आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचा आहे. पण अर्थ, गृह, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामासह अधिकाराची आणि मलिद्याची खाती याच पक्षाकडे आहेत. आणि भ्रष्टाचाराचे, घोटाळय़ांचे, नियमबाह्य कामांचे आरोप सर्वात जास्त यांच्याच खात्यांवर आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपेक्षा गुंडा मंत्र्यांना हाताशी धरून कारभार करण्यावर भर असलेल्या या पक्षाचा चेहरा विशिष्ट जातीचा, विशिष्ट प्रांताचा आणि दादागिरीचा आहे. तो जाणीवपूर्वक पोसलेला, आणि आपण सत्तेत येण्यासाठीच जन्माला आलोय, हा दर्प आहे.
अर्थात याला कारण अर्थातच संस्थापक (आणि तहहयात) अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबच. कारण या एकाच खांबाभोवती हा पक्ष फिरतो. महाराष्ट्राच्या राजकारणात असे एकखांबी तंबू आणखीही आहेत. पण 'साहेबां'ची सर कुणालाच नाही.
यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात गेली चार दशके आपल्या विविध 'खेळीं'नी त्रिकोणाचा चौथा कोन बनून राहिलेल्या पवारसाहेबांच्या नावावर अनेक भल्याबुऱ्या गोष्टी आहेत. त्यातला सगळय़ात पहिला गुण म्हणजे इंग्रजीत ज्याला 'अनप्रेडिक्टेबल' असा 'सोफिस्टेकेटेड' शब्द आहे- ज्याला शुद्ध मराठीत 'बेभरवशाचा' असा विश्वासघातकी अर्थ आहे, असा गुण. दुसरा म्हणजे- पवार हिशेब चुकते करतात. तिसरा- ज्याच्या खांद्यावर हात ठेवतील, त्याला खांद्यासकट मानेपर्यंत कधी गाडतील, सांगता येत नाही. राजकारणातून प्रचंड संपत्ती, मालमत्ता वगैरे करूनही कागदाचा एक कपटा पुरावा म्हणून सापडणार नाही याची दक्षता घेणार. सापडलाच, तर कोणीतरी तिसराच माणूस सापडतो आणि चौथा तुरुंगात जातो. साहेबांना विविध क्षेत्रांतले मित्र, भाट, पे-रोलवर असावेत असे पत्रकार, लेखक, कवी, नाटक-सिनेमावाले सर्वच आहेत. त्यामुळे त्यांना 'जाणता राजा' अशी उपाधीही दिली जाते. साहेबांच्या वाढदिवशी कवी भूषणलाही आपल्या प्रतिभेची लाज वाटेल अशी स्तुतिसुमने प्रत्यक्ष आणि ग्रंथरूपाने उधळली जातात. साहेब एकत्रित काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून 'विश्वासार्ह नसलेलं व्यक्तिमत्त्व' म्हणून काँग्रेसमध्ये ओळखले जायचे. (तसे ते कुठेही गेले तरी हे संबोधन कायम राहते.) याचे कारण त्यांनी काँग्रेसमध्ये बंड करून पुलोद सरकारचा केलेला प्रयोग. मग विरोधी पक्षनेते. इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधींशी जुळवून घेत पुन्हा काँग्रेसप्रवेश. आणि राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरसिंह रावांकडून पराभूत. मग पुन्हा मुख्यमंत्री. पुन्हा दिल्ली. सोनियांना त्यांनीच 'नेतृत्वा'चे साकडे घातले आणि नंतर त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा करत निलंबन ओढवून घेऊन राष्ट्रवादीची स्थापना. स्वतंत्र निवडणुका लढवून पुन्हा सोनिया काँग्रेसशी आघाडी करून गेली १५ वर्षे निव्वळ सत्ताभोग! वाचून आपण दमू, पण साहेब नव्या दमाने तयार!
राष्ट्रवादी काँग्रेस काय किंवा काँग्रेस काय, यांना मोदी लाटेनं असा तडाखा दिलाय, की आपलंच शेपूट तोंडात धरून स्वत:भोवतीच फिरणाऱ्या श्वानासारखी त्यांची अवस्था झालीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचा गेल्या १५ वर्षांतला कारभार हा कार्यक्षमतेबाबत वेगाने खाली घसरत गेला आणि भ्रष्टाचाराबाबत वेगाने वर चढत गेलेला दिसतो. अर्थात याची सुरुवात १५ वर्षांपूर्वीच झालेली आहे. पप्पू कलानी, भाई ठाकूर यांच्यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तींना राजकारणात आणून पवारांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची सुरुवात केली. अशा माणसांना आमदारकीची वस्त्रे म्हणजेच कवचकुंडले मिळाल्याने वसई-विरार पट्टय़ात दहशत, तर उल्हासनगरात बेकायदा बांधकामं आणि खूनसत्रं सुरू झाली. याच लोकांना बळ देऊन पवारांनी भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, असा आरोप गोपीनाथ मुंडे, खैरनार, अण्णा हजारे आदींनी केला. वसई-विरारमधल्या दहशतवादाविरोधात विजय तेंडुलकरांसारखे लेखकही रस्त्यावर उतरले. संरक्षण दलाच्या विमानातून स्वत:सोबत गुन्हेगारांना घेऊन आल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. पण पवार ढिम्म. या आरोपांची उत्तरं देण्याचं पवारांनी महत्त्वाचं मानलं नाही आणि सत्ता गेली. मधली साडेचार वर्षे युतीने कारभार केला आणि पवार पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेत आघाडीने आले. दरम्यान, ते केंद्रात मंत्री झाले; पण त्यांचा जीव महाराष्ट्रात.. आणि विशेषत: पुणे जिल्ह्यात! केंद्रीय मंत्री असतानासुद्धा ते तेव्हा महापालिकेच्या विकासकामांची उद्घाटने करत. आज महाराष्ट्राच्या राजकारणात पवार सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचे भाट सोडले तर कुणीही त्यांच्याविषयी आदरयुक्त बोलत नाही. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर तर पवारांना समवयस्क, आपल्या पिढीतला विरोधकही राहिला नाही. आणि आता तर प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडेंच्या आकस्मिक निधनानंतर दुसऱ्या फळीतला विरोधकही उरला नाही. पवारांना आता देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याशी म्हणजे तिसऱ्या-चौथ्या फळीशी लढावे लागणार आहे. (त्यात त्यांच्याकडे 'स्वस्थ बसा' सांगणारे कुणी मोहन भागवत नाहीत!) तरीही वासरांत शिंग मोडून शिरणाऱ्या गायीसारखे पवार पुन्हा निवडणुकीत उतरलेत.. आपल्या जुन्याच शस्त्रसाठय़ानिशी! पवारांनी पुन्हा काँग्रेसवर दबाव, दलित-मुस्लिमांना आरएसएसची भीती, मराठय़ांना आरक्षणाचे गाजर, व्यापाऱ्यांना एलबीटी घालवायला मदत, पक्षाध्यक्षबदल, भातुकलीच्या खेळासारखे शपथविधी उरक.. असा सगळा उसन्या अवसानाचा खेळ मांडलाय!
'केंद्रात सत्ताबदल झाला आणि अल्पसंख्याकांवरचे हल्ले वाढले,' असं पुण्याचं उदाहरण देऊन सांगताना त्यांना गृहमंत्री आपलेच आबा आहेत याचा विसर पडला. १५ वर्षांत मराठा आरक्षण, आरएसएस, एलबीटीबाबत स्वत:चेच सरकार असून काही करता आले नाही. कधीकाळी आपल्या पुरोगामी प्रतिमेला साजेसे नामांतर, महिला धोरण असे निर्णय घेणारे, अंधश्रद्धांना विरोध करणारे, त्या चळवळींना पाठिंबा देणारे पवार ते हेच का? आज दलितांवरचे अत्याचार वाढलेत, स्त्री-कंडक्टरला भर रस्त्यात मारहाण होते, स्त्री-पोलिसांवर जमाव हात टाकतो, नरेंद्र दाभोळकरांची हत्या होऊन आता वर्ष होईल.. या घटनांबद्दल अवाक्षर न काढता यांना आणखी २६ लवासा हवेत! संवेदनशून्यतेची, अविवेकाची, बेदरकार, बेजबाबदारपणाची यापेक्षा आणखी वेगळी पावती कोणती? तीही दस्तुरखुद्द जाणत्या राजाकडून?
बरं, पक्षांतर्गत पुन्हा सगळं तेच! दोघांच्या खांद्यावर हात ठेवून तिसऱ्यालाच पुढे करायचं नि या दोघांना वाकायला लावायचं. दादांचं बस्तान बसतंय तोवर ताईला पुढे करायचं. दर हंगामाला एक ब्लू आय बॉय तयार करायचा नि त्याला डोंबारी जसा काठीच्या टोकावर पोराला ठेवून वर वर नेतो, तसा वर न्यायचा आणि नंतर ब्लू आयचे डोळे पांढरे होतील हे बघायचं. सध्या जितेंद्र आव्हाडांकडे बघून दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ गालात हसत असतील. राज ठाकरेंना लवकर उठण्याचे सल्ले देणारे साहेब स्वत:च्या सुप्रियाला- कार्यकर्त्यांशी नीट बोलणे हेसुद्धा एक चांगले व्यसन नव्या नेतृत्वाने लावून घेतले पाहिजे, असे सांगतील का?
थोडक्यात, 'महाराष्ट्राची नसन् नस माहीत, कार्यकर्त्यांना नावाने ओळखणारे नेतृत्व' अशा पवारांच्या राष्ट्रवादीने सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता आणि दोन्हीतून माज, दहशत, अरेरावी आणि लूट केलीय महाराष्ट्राची. प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचं काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केलं. त्यात राष्ट्रवादीचा वाटा मोठा आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने जो धडा शिकवलाय, त्याहून अधिक मोठा धडा विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी यांना शिकवायला हवा. पाण्याशिवाय मासा राहील, पण हे सत्तेशिवाय राहणार नाहीत. म्हणून यांना सत्तेतून घालवायला हवेच.
काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवणं जास्त गरजेचं आहे. कारण काँग्रेस आपल्या मरणाने मरेल. पण राष्ट्रवादी हा पक्ष नसून प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात जमीन, जंगल, कायदा यांना धाब्यावर बसवून स्वत:ची तुंबडी भरणारी, गुंडांना अभय देऊन राजकीय आश्रय देणारी ही प्रवृत्ती ठेचली नाही, तर रात्रीत भाई ठाकूर, पप्पू कलानी, अविनाश भोसले, सुधाकर शेट्टी अशी नवी साखळीच तयार होईल. आणखी या पराभवाने तरी पवारांच्या राजकारणाची दिशा बदलेल किंवा त्याची इतिश्री होईल.
पवारांच्या राजकारणात 'भाकरी फिरवा', 'कारभारी बदला' असे परवलीचे शब्द असतात. आता हे शब्द त्यांच्या आणि त्यांनी संस्थापित पक्षाबद्दल बोलावे लागतील. काँग्रेसनेही ही धोंड गळय़ात बांधून मरण्यापेक्षा स्वतंत्र सरणावर चढावं. तेवढंच जाता जाता स्वसन्मानाचं पुण्य!
शेवटची सरळ रेघ : भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा पालवे-मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या 'नैसर्गिक राजकीय वारस' आहेत असं एका वक्तव्यात म्हटलंय. आजवर मानसपुत्र, शिष्य असत.
नैसर्गिक राजकीय वारस म्हणजे काय, हे म्हाळगी प्रबोधिनीत जाऊन शिकायला हवे.. कारण गांधी घराण्याबद्दल मग नेमके नवे संबोधन सापडेल!