Sunday, 16 April 2017

नव्याने हवा बाबासाहेबांचा शोध!

Maharashtra Times
१४ एप्रिल २०१७
नव्याने हवा बाबासाहेबांचा शोध!
डॉ. मिलिंद कसबे
विद्यावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी होते, हे खरेच; पण ते केवळ दलितांचे कैवारी होते असे रुजविण्यात आपण राजकीयदृष्ट्या कमालीचे यशस्वी झालो आहोत. बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करण्यात दलितेतर धर्मांध समाज जेवढा जबाबदार आहे, तेवढाच दलित समाजही जबाबदार आहे. त्यांच्या १२६ व्या जयंतीच्या विचारसोहळ्यात आजच्या सांस्कृतिक वास्तवाकडे पाठ करून परिवर्तनाचे स्वप्न पाहू शकत नाही. एकतर तत्त्वनिष्ठ असे दलितांचे स्वतंत्र राजकारण असल्याचे चित्र आज दिसत नाही. दुसरीकडे, १९७१ साली तमाम दलितांचे ऊर्जास्थान असलेली दलितांची विद्रोही चळवळ अस्तित्वात आहे, असे धाडसाने सांगता येणार नाही. वेदना, विद्रोह आणि बंडाने पेटून उठलेले दलित साहित्य आज कुठे आहे? बाबुराव बागूल यांचे क्रांतीविज्ञान, सुर्व्यांचा मार्क्सवाद, दया पवारांचा कोंडवाडा, नामदेव ढसाळांची ज्वाला भरलेली विद्रोही कविता, रा. ग. जाधवांची समीक्षा, रावसाहेब कसबे, पानतावणे आणि यशवंत मनोहरांचे वैचारिक लेखन या गोष्टी आता दलित साहित्य आणि चळवळीच्या पटलावर नाहीशा होऊन इतिहासजमा होत आहेत.
संघटित दलितांची चळवळ अशी गोष्ट नव्या भांडवलशाहीने गिळंकृत करून दलितांना सुटे सुटे करण्यात येथील धर्मांध राजकारणी कमालीचे यशस्वी झाले आहेत. याचा दृश्य परिणाम म्हणजे आज दलितांचे विशेषतः आंबेडकरी विचारांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाही, दलित साहित्य किंवा दलित चळवळ म्हणावे असे हक्काचे सांस्कृतिक विचारपीठ कार्यान्वित नाही आणि आंबेडकरी जनतेचे प्रश्न सोडवणारी निर्णायक आर्थिक धोरण दलित समाजात नाही. जे काही आहे ते सारे भावनेच्या मनोऱ्यावर उभे आहे. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला की सारे प्रश्न सुटतात, असा समज दलित समाजात पसरला आहे. निळा गुलाल, निळ्या पताका, जयभीमचा नारा, पांढऱ्या शुभ्र वस्त्रांचे परिधारण अशा भावनिक आणि मिथकांच्या गोष्टीत दलित समाज अडकतो आहे. बुद्ध धम्माचे आचरण आणि बाबासाहेबांच्या प्रती आदरभाव प्रत्येक दलिताच्या मनात ओतप्रोत भरलेला असणे ही गोष्ट अभिमानाची नक्कीच आहे. मात्र, त्याला विचारसरणीची व्यवहारी जोड देण्यात प्रागतिक प्रवाह कमी पडले हे मान्य करायला हवे.
डॉ. आंबेडकरांच्या विचारांपासून दूर जाण्याचे अनेक तोटे आंबेडकरी समाज अनुभवतो आहे. जे प्रागतिक आंबेडकरी सांस्कृतिक आचरण उभे राहायला हवे होते, ते राहिले नाही. उलट राजकारणाने सांस्कृतिक आचरणावर मात करून दलितांच्या माथी विघटनाचा शाप मारला. समग्र सांस्कृतिक परिवर्तनाची लढाई एकाच जातीने लढून उपयोगाची नाही. ती लढाई जातिव्यवस्थेशी आहे, कर्मठ आणि कुंठित झालेल्या धर्मव्यवस्थेशी आहे, भांडवलशाहीशी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ती वाढत्या असहिष्णुतेशी आहे. अशावेळी समविचारी जातींनी एकत्र येऊन आपले एक प्रागतिक राजकीय धोरण निश्चित करायला हवे. बाबासाहेबांचे स्वप्न संपूर्ण उपेक्षित सममाजाच्या उन्नतीचे होते.
गेल्या काही वर्षांपासून भारतातील धर्मांध राजकारण ज्या पद्धतीने इतिहासातील घटनांचा मिथकांचा, प्रतीकांचा आणि महापुरुषांच्या नावांचा चलाखीने वापर करून लोकांच्या नावावर सांस्कृतिक आक्रमण करत आहे. हे आक्रमण कधी राजकीय निर्णयाने, कधी मन की बात करून, तर कधी देशद्रोही संबोधून केले जात आहे. विन्डी डोनिजर, पेरूमल मुरूगन, रोहित वेमुला, कन्हैया कुमार, गुरमेहर कौर, ही उदाहरणे ताजी आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्यांची जखम अजून भरलेली नाही. शिवाय, भांडवली राजकारणाला जे हवे आहे, ते घडवून आणण्यासाठी माणसांच्या मर्जीप्रमाणे राष्ट्रवादाच्या व्याख्या बदलत आहेत. राष्ट्रवाद ही गोष्ट दुधारी शस्त्र आहे, असे बाबासाहेबांनीच ‘पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी’ या ग्रंथात सांगितले आहे.
संसदीय राजकारणात धर्माचे वाढते महत्त्व लोकशाहीला अत्यंत मारक आहे, असे मत बाबासाहेबांनी मांडले होते; पण तमाम दलित-उपेक्षित आणि बहुजनांच्या मनावरील धर्माचे गारूड उतरत नाही. राजकारण, शिक्षण, व्यापार, शेती यासारख्या अनेक क्षेत्रांत जात आणि धर्माने बस्तान पक्के केले आहे. आंबेडकरवादापुढचे आजचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचे पुनर्रोपण करण्याचे आहे. यासाठी, बाबासाहेबांनी धर्मचिकित्सा करणे, पोटजाती नष्ट करणे आणि आंतरजातीय विवाह करणे हे प्रभावी उपाय सांगितले होते; पण त्यांकडे प्रागतिक प्रवाहांनी पुरेसे लक्ष दिले नाही.
भारतातील जातिव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय बाबासाहेबांच्या स्वप्नातला धर्मनिरपेक्ष भारत उभा राहणार नाही आणि गौतम बुद्धांना अपेक्षित असलेली शांततामय करुणाही मनामनांत रुजवता येणार नाही. सध्या धर्माच्या हातात राजकीय सत्ता गेल्याने आणि राजकारणाचे दोर भांडवलदारांच्या हातात गेल्याने प्रागतिक विचारविश्व धोक्यात आले आहे. त्याचे पुनरुज्जीवन करायचे असेल, तर सर्व समविचारी प्रागतिक पक्ष, संघटना, संस्था, व्यक्ती व समूहांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्रागतिक चळवळी फोडून त्यातील नेत्यांना विकत घेण्याचे षड‍्यंत्र इथले राजकारण सतत करील, यात शंका नाही.
परिवर्तनवाद्यांनी ब्राह्मण्याऐवजी ब्राह्मणांचा द्वेष करण्याने व आंबेडकरवाद्यांनी कम्युनिस्टांचा द्वेष करण्याने पुरोगामी चळवळीची खूप हानी झाली. ‘बुद्ध आणि मार्क्स’, ‘बुद्ध की मार्क्स’ अशा शब्दच्छलात अडकवून आंबेडकरवाद व्यापक होऊ न देण्यात प्रागतिक विचारवंत अडकून राहिले. दलित साहित्य आंबेडकरी साहित्य की बौद्ध साहित्य? अशा शाब्दिक कोट्या करत दलित लेखकांची सर्जनशीलता गोठली. वेदना आणि विद्रोहाची आग पेरत दलित कवितेची पन्नाशी गेली. दलित आत्मकथनेही आवर्तात सापडली. दलित रंगभूमीची पीछेहाट झाली. दलित नेत्यांची फाटाफूट झाली. अशा अनेक पडझडीतून क्रांतीचा वारसा असलेली दलित चळवळ आज जात आहे.

प्रतिगामी आणि धर्मांध शक्तींनी महाराष्ट्रातील ओबीसी जातींना आणि हिंदू दलित जातींना राजकीयदृष्ट्या आपल्याकडे वळवून आंबेडकरी चळवळीला एकाकी पाडले. आता तर डॉ. आंबेडकर-हेडगेवार, आंबेडकर-गोळवळकर अशी तुलना करून दलित चळवळीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण आंबेडकरी समाज अजूनही जागा आहे, यावर विश्वास ठेवला पाहिजे. आंबेडकरवाद नावाचे सुंदर प्रागतिक तत्त्वज्ञान त्याच्या हातात आहे. आता केवळ बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषात न अडकता हा समाज तमाम बहुजन समाजाशी वैचारिक नाते ठेवून आणि समविचारी, धर्मनिरपेक्ष जाती-धर्मांशी सांस्कृतिक मैत्री करून जागतिकीकरणात नवा व्यापक प्रागतिक आंबेडकरवाद उभा करील, अशी आशा आहे.
(लेखक मराठीचे प्राध्यापक आहेत.)