Tuesday, 13 November 2018

लोहियांच्या विचारांचा आजचा अर्थ – डॉ. भालचंद मुणगेकर


लोहियांच्या विचारांचा आजचा अर्थ
Posted: मार्च 21, 2010 in राजकारण, वैचारिक  
टॅगस्गैरर्कॉंग्रेसवाद, लोहिया, समाजवाद, समानता 3
डॉ. भालचंद मुणगेकर , सौजन्य मटा
डॉ. राममनोहर लोहिया यांची जन्मतारीख २३ मार्च, १९१०. दोन दिवसांनी त्यांची शंभरावी जयंती. भारतीय समाजवादाचे सर्वांत प्रभावी प्रवक्ते डॉ. लोहियाच होते. त्यांच्या मूलगामी विचारांनी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला. त्यांच्या विचारांचा आजचा अर्थ सांगणारा हा विशेष लेख.
काँग्रेस सोशालिस्ट पक्षाची १९३४ साली स्थापना झाली. बौद्ध तत्त्वज्ञानाचे भाष्यकार, मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असलेले आणि समाजवादाला नैतिक अधिष्ठान हवे, असा आग्रह धरणारे आचार्य नरेंद देव मे १९३४ मध्ये पाटण्यातल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. जयप्रकाश नारायण त्याचे प्रमुख सूत्रधार होते. १९५६ साली आचार्य गेले. १९५३ साली समाजवादी कार्यक्रमांवर जयप्रकाशांची नेहरूंशी झालेली बोलणी फिसकटली. त्यामुळे, तसेच पक्षातील कारणांमुळे १९५४ साली जेपी सवोर्दयी चळवळीत गेले. १९५३ मध्ये अशोक मेहता मागास अर्थव्यवस्थेतील राजकीय अपरिहार्यता आणि सहकार्याची समान क्षेत्रेअसा सिद्धान्त मांडून काँग्रेस लोकशाही समाजवादीकडे जात आहे अशी भूमिका मांडून काँग्रेसमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर १९५२ मधल्या पंचमढी अधिवेशनापासून १९६८ मध्य५हत्त्वाचा आहे. लोहियांनी मार्क्सनंतर अर्थशास्त्राचे स्वरूप कसे बदलले, उत्पादन तंत्रातील बदलांचा कामगारवर्ग आणि शोषणाच्या स्वरूपावर कसा परिणाम झाला, गरिबी-बेकारी-विषमता नष्ट करण्यासाठी भांडवलशाही आणि साम्यवाद हे दोन्ही पर्याय कसे गैरलागू आहेत हे यात सांगितले, तर समाजवाद : काळा-गोराया पुस्तकात पाश्चिमात्य देशातील समाजवादापेक्षा आशियातील समाजवाद कसा वेगळा असेल, केंद-राज्य-जिल्हा व खेडे या चौखांब्यावर आधारित विकेंदित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार आहे. जमिनीच्या फेरवाटपावर आधारित शेतीची पुनर्रचना आणि मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण त्यांना अभिप्रेत होते. समाजवादी आणि संयुक्त समाजवादी पक्षांच्या जाहीरनाम्यात त्यांनी समाजवादाचे कार्यक्रम सुचविले. परंतु लोहियांसकट सर्व समाजवाद्यांच्या आथिर्क भूमिकेचे श्रेष्ठ श्रेणीची संमिश्र अर्थव्यवस्थाअसे सारांशाने वर्णन करता येईल.

व्यक्तिस्वातंत्र्य आणि अहिंसेवर अपार निष्ठा असल्यामुळे लोहियांचा साम्यवादाला कडवा विरोध होता. त्यामुळे साम्यवाद्यांची कामगार वर्गाची हुकूमशाहीत्यांना मान्य असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भारतात साम्यवादी आणि समाजवादी चळवळी समांतरच नव्हेत, तर एकमेकांच्या कट्टर विरोधक राहिल्या. साम्यवाद्यांनी सुधारणावादी म्हणून समाजवाद्यांची हेटाळणी केली; तर समाजवाद्यांना जमातवाद्यांशी जवळीक करायला संकोच वाटला नाही. त्यातच साम्यवाद्यांच्या भूमिका दीर्घकाळ सोविएत युनियनवर अवलंबून राहिल्या. साम्यवादी आणि समाजवाद्यांच्या एकांगी आणि परस्परविरोधी भूमिकांमुळे भारतात श्रमिकांचे राजकारण सतत क्षीण राहिले.
आचार्य नरेंद देव आणि जेपींवर जसा मार्क्सवादाचा प्रभाव शेवटपर्यंत राहिला, तसा लोहियांवर गांधीजींचा राहिला. लोहिया मार्क्सवादाच्या मर्यादा सांगूनच थांबले नाहीत. तर त्यांनी मार्क्सवादाविरोधी भूमिका घेतली. पंचमढीत, कार्यर्कत्यांच्या आग्रहाने मी मार्क्सवादी नाहीकिंवा मार्क्सवादाच्या विरोधात नाही,’ असे जरी लोहिया स्पष्ट म्हणाले, तरी ते शंभर टक्के गांधीवादी असल्यामुळे ते मार्क्सवादाच्या विरोधात असणे स्वाभाविकच होते. समाजवादी चळवळीत मार्क्सवादाच्या विरोधात मनोभूमिका तयार होणे, हा त्याचा अपरिहार्य परिणाम होता. समाजवादी चळवळीचे नुकसान होण्याचे तेही एक कारण आहे.
गैरकाँग्रेसवाद
१९६३मध्ये फरुकाबाद पोटनिवडणुकीतून लोकसभेत गेल्यानंतर त्यांनी पहिल्याच भाषणात तीस कोटी लोकांचे दरडोई उत्पन्न तीन आणे असल्याचे सांगून चचेर्चा प्रारंभ केला. परंतु संपत्तीबरोबर सर्व प्रकारची सत्ता आणि प्रतिष्ठेचेही विषम वाटप झाल्याचा त्यांना संताप होता. डॉ. आंबेडकरांशिवाय जातिव्यवस्थेमुळे समाजाचे कसे अध:पतन झाले, याचा सकस विचार फक्त लोहियांनी केला. जात म्हणजे अपिरवर्तनीय वर्ग आणि वर्ग म्हणजे बंदिस्त जातअशी त्यांची मीमांसा होती. जात म्हणजे बंदिस्त वर्गया डॉ. आंबेडकरांच्या मीमांसेशी ती मिळतीजुळती होती.
भारतातील दैन्य, गरिबी, विषमता या साऱ्याला काँग्रेसच जबाबदार आहे, अशी खात्री झाल्यानेच लोहियांनी गैरकाँग्रेसवादमांडला आणि जनसंघापासून स्वतंत्र पक्षापर्यंत सर्वांची एकजूट करून १९६७ मध्ये नऊ राज्यांत संविद सरकारे आणली. लोहियांच्या निधनानंतर समाजवाद्यांचा गैर काँग्रेसवादइतका टोकाला गेला की जनसंघ असलेल्या जनता पक्षात आपले अस्तित्व विलीन करायला ते कचरले नाहीत. १९८० नंतर हिंदू राष्ट्रवादही ठाम भूमिका असल्याने भाजपच्या रूपाने जनसंघ पुन्हा उभा राहिला. सत्तेवरही आला. परंतु १९८० मध्ये समाजवादी पक्ष आणि चळवळ कायमची संपली. नकारात्मक राजकारण आणि सुस्पष्ट राजकीय विचारप्रणालीचा पर्याय उभा करण्यातली असमर्थता हीच त्याची प्रमुख कारणे होत.
सांस्कृतिक संदर्भ
डॉ. लोहियांना स्वातंत्र्यानंतर राजर्कत्यांची मानसिकता, त्यांचे धोरणात्मक अग्रक्रम, साम्राज्यवादाच्या प्रतिकांविषयींची भूमिका, आथिर्क ढांचा, समाजरचना, विषमता इ. बाबतीत गुणात्मक बदल होईल, असे वाटले व तसे न झाल्याची मनस्वी चीड आली. त्यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले.

ज्या वंदे मातरम्साठी हजारोंनी तुरुंगवास भोगला त्याऐवजी जन गण मनराष्ट्रगीत केल्याचा त्यांना खेद होता. क्रिकेटला जवळपास मिळालेल्या राष्ट्रीय दर्जाचा राग होता. इंग्रजी हे शोषणाचे हत्यार असल्याची त्यांची भूमिका होती. लोहियांचा विरोध इंग्रजीला भाषाम्हणून नव्हता, तिला मिळालेल्या असाधारण प्रतिष्ठेला होता. आरोपीच्या जीवनमरणाचा वाद न्यायालयात त्याला न समजणाऱ्या इंग्रजीत चालण्याला होता. आजही शुद्ध मराठी बोलणाऱ्यापेक्षा अशुद्ध वा चूक इंग्रजी बोलणाऱ्याला अधिक प्रतिष्ठा आहेच.
स्त्री-पुरुष समानता
डॉ. आंबेडकरांचा अपवाद सोडला तर स्त्रियांचे गौणत्व आणि त्यांची सक्षमता याचा विचार लोहियांइतका कुणी केला नाही. जातिप्रथा आणि स्त्रियांची अवनती ही भारताच्या अध:पतनाची दोन प्रमुख कारणे असल्याचे ते आग्रहाने म्हणत. कनिष्ठ जाती, अन्य मागास आणि मुसलमान यांना केवळ समान संधीच नव्हे, तर विशेष संधीचापुरस्कार करताना लोहियांनी त्यात स्त्रियांचाही समावेश केला. आज लोहियांनी महिला आरक्षणात ओबीसी व मुस्लिम महिलांच्या स्वतंत्र आरक्षणाचा आग्रह धरलाच असता.
विवाह आणि स्त्री-पुरुष संबंधाबाबत भारतीयांचे मन गलिच्छ असल्याचे लोहियांचे मत होते. पावित्र्याच्या कल्पनांमुळे स्त्रीची गुलामी फक्त चुलींपुरती राहिली नाही तर पापपुण्याच्या बेड्याही तिच्या पायात अडकल्या. त्यातही तिच्या शरीराला अधिक महत्त्व देण्यात आले. स्त्री-पुरुष संबंधात दोनच अपराध आहेत : बलात्कार आणि खोटे बोलणे वा वचनभंग. सावित्रीपेक्षा बंडखोर दौपदीविषयी अभिमान वाटणाऱ्या लोहियांना रुढी व संकेतांच्या विरोधात तरुणींचे बंड अभिप्रेत होते. स्त्रियांची चळवळ आज या दिशेने जाते आहे ही समाधानाची गोष्ट आहे.
गौर वर्णाचे साम्राज्य
आशियासारख्या उष्मा कटिबंधात गौरवर्ण हा सौंदर्याचा निकष मानणे, हा सौंदर्यशास्त्राचा विपर्यास आहे, असे लोहिया म्हणत. दौपदी सावळी होती, याचा त्यांना अभिमान वाटे. जवळपास तीन शतके युरोपीय गोऱ्यांनी जगावर अधिसत्ता गाजविली. जेत्यांची गुणवैशिष्ट्ये नेहमीच पराभूतांवर लादली जातात. किंवा पराभूत ती भूषण म्हणून मिरवतात. लोहिया म्हणतात, ‘कृष्णवणिर्यांची जगावर सत्ता असती तर स्त्रीसौंदर्याचे निकष बदलले असते. राजकारण सौंदर्यकल्पनांवरही वर्चस्व गाजविते. अद्वितीय सत्ता तर सुंदरही दिसू लागते.
अभिजात रसिकता
लोहियांनी भारतातील शिल्प, साहित्य आणि इतर कलांचा आस्वाद घेतला. त्यावर भाष्य केले. शिल्पकलेविषयी ते म्हणतात, ‘इतिहासाचे ग्रंथ कधीतरी नाश पावतात म्हणूनच की काय, भारतीय जनतेने अनंत काळ प्रचलित राहणाऱ्या कथा-कहाण्यांच्याद्वारे तो सांगून ठेवला आहे. इतिहास संतापला. त्याने सूड घेतला आणि सर्वांत अधिक काळ टिकणाऱ्या पाषाणावर चित्ररूपाने त्याने स्वत:ला खोदून ठेवले.परंतु ते त्वरित या पोकळपणावर बोट ठेवतात. एका बाजूला श्वास रोखून धरणारे शिल्पांतील चिरंतन सौंदर्य, तर दुसऱ्या बाजूला इतिहास आणि धर्मचिंतनातील रितेपण हा विरोधाभास त्यांना अस्वस्थ करतो. त्यांनी दिल्लीचे मनोज्ञ वर्णन केले आहे. ते म्हणतात की पॅरिस, वॉशिंग्टन, लंडन, टोकिया यांच्यापेक्षा दिल्ली सर्वांत मोहक आहे हे खरे, परंतु ती अत्यंत नीच वेश्या आहे. जेत्यांसमोर ती नेहमीच वक्ष:स्थळ उघडत आली आहे.
हवी नवी मांडणी
सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर समाजवादाचे स्वरूपच बदलले आहे. आता बाजारपेठेचे दुष्परिणाम कसे टाळता येतील, त्याचा विचार करणे अत्यावश्यक आहेच. त्यासाठी दैन्य, विषमता व बेरोजगारी दूर करून चिरंतन विकासासाठी बाजारपेठेवर निर्णायक व अतिरेकी भिस्त ठेवणारे आणि साम्यवादी या दोघांनाही लोकशाही समाजवादाचा स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही. जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, जमातवादविरोध, धर्मनिरपेक्षता, व्यामिश्र संस्कृतीवर आधारित राष्ट्रवाद, संतुलित प्रादेशिक विकास, जागतिक शांतता अशा मूलभूत कार्यक्रमांवर आधारित विचारप्रणाली तयार करावी लागेल. कोणत्याही एका ग्रंथात किंवा विचारप्रणालीत याची उत्तरे नाहीत. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित लोकशाही समाजवादाची पुनर्मांडणी करणे, हीच डॉ. लोहियांना खरी श्रद्धांजली ठरेल!