द वायर मराठी
1 जुलै 2019
रोहित कुमार
तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी २५ जून रोजी संसदेतल्या त्यांच्या पहिल्यावहिल्याघणाघाती भाषणातसरकारचा चांगलाच समाचार घेतला. त्यांचे ते भाषण राजकारणातल्या त्या एका त्रासदायक शब्दाभोवती केंद्रित होते : फॅसिझम. “आज देशामध्ये फॅसिझमची सर्व सुरुवातीची चिन्हे दिसू लागली आहेत,” असा त्यांचा मुद्दा होता.
असे म्हटले जाते की फॅसिझमची व्याख्या करणे म्हणजे प्रेमात असण्याची अचूक व्याख्या करण्याचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. तुम्ही असता तेव्हा तुम्हाला ते माहीत असते, पण त्याची व्याख्या करायला सांगितले तर अचूक शब्दयोजना करणे हे एक आव्हान असते.
काहीजणांचा असा आग्रह असतो की २० व्या शतकाच्या सुरुवातीला मुसोलिनी आणि त्याचा Partito Nazionale Fascista किंवा राष्ट्रवादी फॅसिस्ट पक्ष यांचे जे सरकार होते त्याचे वर्णन करतानाच केवळ फॅसिझम हा शब्द वापरायला हवा, तर इतर काही जण जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या अधिकारवादी सरकारसाठी हा शब्द वापरतात.
मात्र फॅसिझमची काही ठराविक गुणवैशिष्ट्ये असतात ज्यांच्याबाबत राजकीय इतिहास आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांचे एकमत आहे, आणि लोकशाहीमधील नागरिकांनी या ठराविक वैशिष्ट्यांची ओळख करून घेतली पाहिजे.
अतिरेकी राष्ट्रवाद
How Fascism Works, या आपल्या पुस्तकामध्ये, येल विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणारे जेसन स्टॅनले यांनी फॅसिझमची व्याख्या करताना म्हटले आहे, “तो अतिरेकी राष्ट्रवाद असतो. हा राष्ट्रवाद कधी वंशवादी असतो, धार्मिक असतो किंवा सांस्कृतिक. एक अधिकारवादी नेता संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतो, आणि तोच देशाच्या वतीने बोलतो.” कामचलाऊ व्याख्यांमध्ये ही व्याख्या सर्वात चांगली आहे.
फॅसिझमची व्याख्या करणारे एक वैशिष्ट्य म्हणजे तो राष्ट्रीय अस्मितेला इतर सर्व अस्मितांच्या वर मानतो. राष्ट्रवादाचा अतिरेक म्हणजे फॅसिझम! राष्ट्रवाद आपल्याला आपला देश अनन्य आहे आणि आपले त्याच्याप्रती एक विशेष उत्तरदायित्व आहे असे सांगतो, तर फॅसिझम सांगतो आपला देश हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि आपण पूर्णपणे त्यालाच उत्तरदायी आहोत.
सरकारमधले लोक जर सतत राष्ट्रवादावर जोर देत असतील आणिवारंवार युद्धखोर राष्ट्रवादी घोषणा देत असतील तर ती फॅसिझम अवतरल्याची खात्रीशीर चिन्हे असतात.
लेखक युवाल नोहा हरारी यांनी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा लोक जीवन गुंतागुंतीचे असते याकडे दुर्लक्ष करतात आणि ते अतीसोपे करू पाहतात, तेव्हा फॅसिझम जन्म घेतो. फॅसिझम गोष्टींकडे काळ्यापांढऱ्या स्वरूपात पाहतो, चांगल्या आणि वाईट, गटातले आणि गटाबाहेरचे, आणि अर्थातच देशभक्त आणि देशद्रोही.
एक कल्पित भूतकाळ
फॅसिस्ट कथन नेहमीच एका कल्पित, सोनेरी भूतकाळावर आधारित असते. एक वांशिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या शुद्ध, पवित्र असा काल्पनिक काळ, ज्याचा बाहेरच्या आक्रमकांमुळे किंवा आतल्या भ्रष्ट लोकांमुळे दुर्दैवी अंत झाला. फॅसिस्ट सरकारे ही नेहमीच भूतकाळातील त्या गौरवशाली संस्कृतीचे पुनरुत्थान करण्याचे वचन देऊन सत्तेवर येतात. (योगायोगाने, ती संस्कृती उतरंड असलेली पुरुषप्रधान संस्कृती होती, जिथे शक्तिशाली, शूर पुरुष मेहनत करत आणि युद्धे लढत आणि कर्तव्यतत्पर, आज्ञाधारक स्त्रिया घरी राहून पुढची पिढी घडवत.)
नेपल्स येथे १९२२ साली झालेल्या फॅसिस्ट काँग्रेसमध्ये बोलताना बेनिटो मुसोलिनीने स्वतःच हा सोनेरी भूतकाळ काल्पनिक असल्याचे कबूल केले होते:
“आपण आपले मिथक तयार केले आहे. हे मिथक एक श्रद्धा आहे, एक तळमळ आहे. ते वास्तव असण्याची गरज नाही..आपले मिथक आपला देश आहे, आपले मिथक त्या देशाची महानता आहे! ते मिथक, ती महानता आपल्याला संपूर्ण वास्तवात उतरवायची आहे. आणि त्यासाठी आपण आपले सर्वस्व अर्पण करत आहोत.”
वर्तमान फॅसिस्ट कल्पना वास्तवात उतरवण्यासाठी आवश्यक भावना आणि गतजीवनाबद्दलची ओढ जागविणे हे या काल्पनिक भूतकाळाचे कार्य आहे. नाझी विचारवंत अल्फ्रेड रोझेनबर्ग यांनी १९२४ मध्ये असेच लिहिले होते, “आपला स्वतःचा पौराणिक भूतकाळ जाणून घेणे आणि त्याचा आदर करणे… पुढच्या पिढीनेयुरोपच्या मूळ निवासस्थानाच्या मातीशी घट्ट नाळ जोडावी यासाठीची ही पहिली अट असेल.”
महान नेता
प्रत्येक फॅसिस्ट सरकारच्या केंद्रस्थानी असतो एक महान नेता, जो पितृसत्ताक कुटुंबाचा प्रमुख किंवा पुरुषी सत्तेचा वाहक असतो. जेसन स्टॅनले यांच्या मते फॅसिस्ट चळवळी एवढ्या ठामपणे पुरुषप्रधानतेचा पुरस्कार करतात याचे कारण म्हणजे देशाचा नेता हा पारंपरिक पितृसत्ताक कुटुंबातील पित्यासमान असतो.
अशा रीतीने हा नेता देशाचा “पिता” बनतो. त्याची ताकद आणि सत्ता हे त्याच्या कायदेशीर अधिकाराचा स्रोत बनतात, अगदी पितृसत्ताक कुटुंबामध्ये पित्याची ताकद आणि सत्ता हे त्याची मुले व पत्नीवरील त्याच्या सर्वोच्च नैतिक अधिकाराचे स्रोत असतात तसेच! नेता त्याच्या देशाचे पालनपोषण करण्याचे वचन देतो, अगदी जसे पारंपरिक कुटुंबातील पित्याप्रमाणेच! तो त्यांना कोणत्याही दुखापतीपासून वाचवण्याचेही वचन देतो.
देशाचा भूतकाळ पितृसत्ताक कौटुंबिक संरचनेप्रमाणे दाखवल्याने, फॅसिस्ट सरकारांकरिता सत्तेच्या उतरंड असलेल्या, अधिकारवादी आणि विषमतावादी संरचना स्थापित करणे सोपे जाते.
फॅसिस्ट प्रथम समाजाला गटातले आणि गटाच्या बाहेरचे असे विभाजित करून आणि नंतर बाहेरच्यांना दुष्ट शत्रू म्हणून दाखवून सत्तेवर येतात. त्यांचा नेता हा बाहेरच्यांबद्दल भीती निर्माण करण्यात आणि केवळ तो एकटाच आतल्यांचे रक्षण करू शकतो असे चित्र निर्माण करण्यात विशेष तरबेज असतो (बाहेरचा गट हा खूप लहान असतो आणि खरे तर आतल्या गटाला त्याच्यापासून कोणतीही वास्तव भीती नसतेही गोष्ट अलाहिदा).
वास्तवाची पुनर्व्याख्या करणे
भूतकाळाचे मिथकीकरण करण्याबरोबरच फॅसिस्ट सरकार हे वर्तमान वास्तवाचीही पुनर्व्याख्या करण्यासाठी लक्षणीय प्रमाणात कष्ट आणि संसाधने खर्च करते. ते लोकशाहीच्या संस्थांना केवळ त्यांच्याबद्दलच्या विश्वासाला सुरुंग लावून पोकळ करते, कारण एकदा का विश्वसनीयतेच्या सर्व यंत्रणा नष्ट झाल्या की मग तुम्ही कुणावर विश्वास ठेवणार?मग तुमच्यासमोर केवळ एकच व्यक्ती उरते, ती म्हणजे वास्तवाची व्याख्या करणारी एकमेव व्यक्ती – महान नेता! या नेत्याला वास्तवाचा एकमेव स्रोत म्हणून स्थापित करणेहे फॅसिस्ट शासनामध्ये प्रचाराचे ध्येय असते. देश जितका फॅसिझमच्या पकडीत येत जाईल तितका याच नेत्याचा चेहरा सगळीकडे दिसू लागेल.
या बिंदूवर, आता हा नेता अक्षरशःकाहीही बोलला तरी चालते. मात्र रोचक गोष्ट अशी की याचा अर्थ लोक त्याच्यावर खरोखर विश्वास ठेवतात असे नाही. उदाहरणार्थ व्लादिमीर पुतीन सत्याची ऐशीतैशी करण्यासाठी प्रसिद्धच आहेत. आणि तरीही रशियातील लोकांमध्ये त्यांना अभूतपूर्व अशी मान्यता आहे. ते खोटे बोलत आहेत हे लोकांना कळते पण ते सोडून देतात, कारण मनातल्या मनात त्यांना वाटते की ते कुठेतरी खोलवर सत्यच सांगत आहेत – रशियन लोकांच्या ‘गौरवा’चे सत्य. एखादा अधिकारवादी नेता जोपर्यंत लोकांना आवडणाऱ्या मूल्यांबद्दल बोलत असतो तोपर्यंत तो सत्य सांगत आहे की नाही हे फारसे महत्त्वाचे ठरत नाही.
बुद्धिवादावर हल्ला करणे
कपोलकल्पित कथा आणि मिथ्या प्रचाराच्या जोरावर सत्तेवर आलेले सरकार विद्यापीठे आणि समीक्षात्मक विचारांचा पुरस्कार करणाऱ्या इतर संस्थांवर विशेषकरून हल्ले चढवेल यात आश्चर्याची गोष्ट नाही. विरोध करणाऱ्या स्वतंत्र आणि मुक्तविचारी आवाजांना थारा देणाऱ्या संस्थांची विश्वसनीयता ध्वस्त करण्यासाठी आणि त्यांच्या जागी लाचार प्रसारमाध्यमे आणि संस्थांना आणण्यासाठी फॅसिस्ट सरकारे आटापिटा करतात.
उदाहरणार्थ, तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कस्तानातील विद्यापीठांमधील पाचहजार विचारवंतांना लोकशाहीवादी किंवा डावे विचार असल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकले आणि तुरुंगात टाकले. यापैकी एक विचारवंत, राज्यशास्त्राचे प्राध्यापक इस्मत आका म्हणाले, “काढले जाणारे हे लोक केवळ लोकशाहीवादी डावे लोक नाहीत, ते खूप चांगले शास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत. त्यांना काढून टाकून सरकार उच्च शिक्षणाच्या कल्पनेवरच, या देशात विद्यापीठे असण्याच्या कल्पनेवरच हल्ले करत आहे.”
फॅसिझम नैपुण्याची खिल्ली उडवते, तज्ञांना कोणतीही किंमत देत नाही. उदारमतवादी लोकशाहींमध्ये, राजकीय नेत्यांनी केवळ ते ज्यांचे प्रतिनिधित्व करतात त्याच लोकांचा नव्हे तर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचा आणि शास्त्रज्ञांचाही सल्ला घेणे अपेक्षित असते. पण फॅसिस्ट नेते अपरिहार्यपणे स्वतःला आपणच “कृती करणारे लोक” आहोत असे समजते, ज्यांना कुणाचा सल्ला घेण्याचा किंवा विचार-विमर्श करण्याचा काहीही उपयोग नसतो.
१९४२ साली एका निबंधामध्ये फ्रेंट फॅसिस्ट लेखक पियरे दरियू ला रोशेल यांनी लिहिले, “(फॅसिस्ट) म्हणजे संस्कृती नाकारणारा… तो कल्पनांवर विश्वास ठेवत नाही, आणि म्हणून सिद्धांत नाकारतो. तो कृतीवर विश्वास ठेवतो आणि एका धूसर मिथकाशी सुसंगत कृती करतो.”
फॅसिस्ट सरकारचे नियंत्रण प्रस्थापित होईपर्यंत आपण निःशंकपणे असे म्हणू शकतो की त्या सरकारला सत्तेवर आणलेल्या निवडणुका विवेकावर नव्हे तर भावनांवर लढल्या गेल्या, कारण एकदा का परिणामकारकरित्या या भावनांवर ताबा घेतला गेला की मग व्यावहारिक पातळीवर लोकशाही म्हणजे केवळ एक भावनांच्या आधारे चालणारा भावनांचा खेळच बनते.
हरारी लिहितात तसे, फॅसिस्ट आपल्या ईमेल्स आणि फोन कॉल्स हॅक करतात त्याहीपेक्षा जास्त आपल्या भीती, तिरस्कार आणि अभिमान या भावना हॅक करतात. ते त्यानंतर या भावनांचा वापर करतात, जी त्यांच्या हातातली शस्त्रे बनतात आणि आतूनच लोकशाही उद्ध्वस्त करतात.
हे माहीत होणे आणि समजणे हा कदाचित फॅसिझमचा संसर्ग झालेल्या समाजाकरिता मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. जर समाजातील शिक्षण आणि समीक्षात्मक विचारांचे मूल्य समजणारे पुरेसे लोक एकत्र आले आणि स्वीकार, समावेशकता आणि नम्रता (भीती, तिरस्कार आणि अभिमान यांच्या विरोधातील भावना) यांचा पुरस्कार करू लागले, तर फॅसिझमचा प्रसार थांबवता येण्याची थोडीफार शक्यता आहे.
असे करू शकलो नाही तर काय होईल ते इतिहासाच्या काळ्या पानांमध्ये लिहिलेले आहेच!
रोहित कुमार, हे शिक्षणतज्ञ आहेत.
चित्रकर्ता : परिप्लब चक्रवर्ती