Thursday, 8 December 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहत घर आणि छापखाना विकणारे नामदेवराव व्हटकर यांच्या विषयी

लेखक : - संगम कांबळे



६ डिसेंबर १९५६... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस... अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती... नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती... प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता... त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली... आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेला अवघा देश लोटला... जस कळेल तसं शहरातून, खेडोपाड्यातून पाऊल मुंबईच्या दिशेने पडू लागली होती... या अंत्ययात्रेसाठी उसळलेल्या जनसागराच्या असवाने मुंबईचा रस्ता ओलाचिंब झाला होता... या सगळ्यात एक समांतर गोष्ट घडत होती... या गोष्टी पुढं यायच्या सोडून काळाच्या ओघात गडप झाल्या.... त्या शेवटच्या क्षणांना कायमच कैद करणारे, त्यासाठी आपलं राहत घर आणि आपला छापखाना विकणारे आजही सर्वांसाठी अनभिज्ञच आहेत, ही माहिती पुढं आली नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे... 


माजी आमदार, दलित मित्र नामदेवराव व्हटकर यांच्या विषयी बऱ्याच जणांना माहिती नसावी... कोल्हापूर जिल्ह्यातील मसूदमाले गावात २४ ऑगस्ट १९२१ मध्ये त्यांचा जन्म झाला... तर ४ ऑक्टोबर १९८२ साली मृत्यू... एकाचवेळी त्यांनी साहित्यिक, संपादक, नाट्यरंग, चित्रपट, नभोवाणी, स्वातंत्र्य सैनिक, प्रगतिशील शेतकरी अशा पंधराहून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे... जन्मापासून बसलेल्या जातीयतेच्या चटक्यामुळे संपूर्ण आयुष्य त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं... एकदा दाढी करत असताना नाव्ह्याने विचारलं तुम्ही कोणत्या जातीचे... यावेळी दलित म्हणून दिलेल्या उत्तराने नाव्ह्याचा वास्तरा गाल कापून गेला... तो चेहऱ्यावरचा डाग घालवता येणार नाही, पण या देशावरचा अस्पृश्यतेचा डाग मला पुसून काढावा लागेल असा प्रण करून त्यांनी अख्ख आयुष्य यासाठी खर्ची घातलं... वर सांगितलेल्या सर्व क्षेत्रातून त्यांनी या विरोधात आवाज उठवला... त्याच्या या कामाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना पहिला 'दलित मित्र' पुरस्कार देऊन सन्मानित केलं...


६ डिसेंबर रोजी ते मुंबईतच होते...त्यांना बाबासाहेब गेल्याचं कळल्यानंतर अतीव दुःख झालं... त्यांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी असं त्यांच्या मनात आलं...चित्रपट, नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या... त्यांनी अनेकांना विचारलं पण कुणी तयार होत नव्हतं, काहींनी तर "त्याच आम्हाला काय, तो तुमचा नेता आहे, अस्पृश्यांचा नेता आहे आम्ही करणार नाही" असं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं... कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबडी अशा फोल ठरली होती... येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाच महत्व त्यांनी ओळखलं होत... कुणी मदत करो न करो, मी स्वतः करतो असं त्यांनी ठरवलं... पण ही इतकी सहजसोपी गोष्ट नव्हती... त्याकाळी व्हिडीओ रेकॉर्डिंग साठी कॅमेरा आणि त्यासाठी रील या इतक्या खर्चिक गोष्टी होत्या की त्याचा आज अंदाज देखील लावता येत नाही... 


अंदाजे तीन हजार फूट निगेटिव्हची रील, कॅमेरा आणि कॅमेरामन यासाठी जवळपास तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला... आता पैसा कुठून उभा करायचा हा मोठा प्रश्न होता... काही किरकोळ कारणांसाठी काहीतरी तारण ठेऊन ते एका मारवाड्याकडून पैसे घेत असत... पण यावेळी रक्कम मोठी होती, त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवावा लागला... त्यांना याच्या बदल्यात एकूण दीड हजार रुपये मिळाले... धावत - पळत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामनकडे गेले... त्यांनी दीडशे रुपये प्रतिदिवस भाड्याने एक कॅमेरा आणला... आणि रात्री १०-११ च्या सुमारास राजगृह गाठले....


बाबसाहेबांचं पार्थिव पहाटे आले... एका ट्रकवरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.. याच ट्रकवर कसाबसा कॅमेरालावून उभा राहण्याची जागा मिळाली... पहिला शॉट खोदादाद सर्कल वर घेण्यात आला... यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होत... सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहचलं... याठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली... चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं... त्यांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवण्यापर्यंत चित्रीकरण सुरूच होतं... बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा याठिकाणी चित्रित झाला... चितेला अग्नी दिल्यानंतर ही चित्रीकरण करण्यात आले...


या सगळ्या चित्रीकरणासाठी एकूण २ हजार ८०० फूट रील संपली होती... दुसऱ्या दिवशी बाँबे फिल्म लॅबोरेटरीत ही फिल्म प्रोसेसला देण्यात आली... आता ही फिल्म धुणे, दुसऱ्या पॉझिटिव्हवर रशप्रिंट काढणे आणि एडिटिंग करणे यासाठी अडीच ते तीन हजार खर्च येणार होता... त्यासाठी पुन्हा त्याच मारवाड्याकडे जाऊन त्यांनी राहत घर गहाण ठेऊन तीन हजार रुपये आणले... पुढं या तारण ठेवलेल्या मिळकती सोडवत्या आल्या नाहीत... त्यामुळे त्या कायमच्या गेल्या...मुंबई सोडावी लागली... 


मालमत्ता गेली तर गेली... पण बाबासाहेबांच्या शेवटच्या स्मृती जपता आल्या, त्यांच्या उघड्या चेहऱ्याचा या जगातील शेवटचा क्षण युगांयुगासाठी कैद करता आलं, याच समाधान त्यांना होतं... आज आपण पाहतोय त्या शेवटच्या क्षणांची नामदेवराव यांनी केलेलं हे जगातील एकमेव चित्रफीत आहे... या गोष्टींचं कधीही श्रेय घेतलं नाही किंवा याच भांडवल केलं नाही... 

(काळाच्या पडद्याआड गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी...)



(आज कोल्हापूरात त्यांची जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यात आलं... त्या कार्यक्रमात मला ही माहिती मिळाली... इतिहासातील एवढ्या मोठ्या घटनेचा उल्लेख कुठंच नसल्याची खंत वाटली.. म्हणून ही माहिती तुमच्या समोर आणली...)

यातील चित्रीकरण आणि त्यावेळच्या आठवणी हा संदर्भ त्यांच्या "कथा माझ्या जन्माची" या आत्मचरित्रातून घेतला आहे... नामदेवराव व्हटकर समजून घ्यायचे असतील तर हे आत्मचरित्र नक्की वाचा...


Sunday, 27 November 2022

सिंजेंटा विरुद्ध डॉ टायरोन हेज

 माध्यम कर्मिंनी वाचलाच पाहिजे हा लेख.


भांडवली नफेखोर विकानितीचे अर्थशास्त्र म्हणजे काय?आणि पर्यावरणाचे रक्षण,संवर्धन ,जतन करायचे असेल तर भांडवली विकासनिती नाकारून हरित राजकारण हे स्वीकारावेच लागेल हे स्पष्ट  करणारा हा लेख.


++++++++++++++++++++++;


आजच्या पुण्यनगरीतील माझा लेख 

           सिंजेंटा विरुद्ध डॉ टायरोन हेज 

                  सन १९९९ . अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील इमारतीतील हॉल. एक कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ उभा होता . पस्तिशीच्या आसपास वय .स्थूल शरीर .साधारण पाच साडेपाच फुट उंची .  चौकोनी चेहरा .चेहऱ्यावर दाढीची व्यवस्थित कापलेली वक्र रेष . केसांचा पोनीटेल बांधलेला  ,अंगात काळा कोट ,चेहऱ्यावर थोडीशी चिंता  असा तो शास्त्रज्ञ पाच सहा गोऱ्या माणसांच्या समोर आपल्या प्रयोगाचे निष्कर्ष मांडत होता .  त्याना तो  मोठ्या पडद्यावर बेडकांची छायाचित्र दाखवू लागला . तो  म्हणाला , “ बेडूक  फुफ्फूस व त्वचेद्वारेही श्वासोंश्वास करतो .  बेडकाच्या त्वचेतून  ऑक्सिजन सहज शोषला जातो . परंतु   पाण्यात विरघळणारी किटकनाशके ,तणनाशकेही त्वचेद्वारे  सहज बेडकांच्या शरीरात प्रवेश करतात . तुमच्या कंपनीच उत्पादन , अॅट्रॅझिन  तणनाशक याच मार्गाने बेडकांच्या शरीरात प्रवेश करत . अॅट्रॅझिनमुळे नर बेडकांच रुपांतर अर्धवट मादी बेडकात होतं . ना नर ना मादी अशी त्याची गत होते . अॅट्रॅझिनमुळे बेडूक आपली प्रजोत्पादनाची क्षमता गमावून बसतात”. तो अतिशय पोटतिडकिने आपले निष्कर्ष मांडत होता . परंतु या निष्कर्षांमुळे  समोर बसलेल्या माणसांच्या  चेहऱ्यांवरची नाराजी गडद होऊ लागली  .शेवटी त्यांचा  प्रमुख सावकाश एक एक शब्द जुळवत  कावेबाजपणे बोलू लागला ,” खात्री करण्यासाठी संपूर्ण प्रयोग पुन्हा करा . आम्ही तुम्हाला पुन्हा निधी देतो . परंतु एका अटीवर . आमची खात्री पटेपर्यंत तुम्ही आपले कोणतेही निष्कर्ष प्रसिद्ध करायचे नाहीत “. तो शास्त्रज्ञ म्हणाला ,” ठीक आहे “ आपल्या प्रयोगशाळेच्या विकासाकरिता हा निधी कसा वापरता येईल याची तो मनातल्या मनात आखणी करू लागला .परंतु त्या माणसांचा हा प्रस्ताव त्याचे  निष्कर्ष प्रसिद्ध करण्यापासून रोखणारा होता हे त्यावेळी त्याला माहित नव्हते . त्याला त्यावेळी हेही माहित नव्हते कि ती एका संघर्षाची सुरुवात होती .या संघर्षाच्या एका बाजूला असणार होती , बलाढ्य बहुराष्ट्रीय अशी सिंजेंटा कृषी उत्पादन कंपनी तर दुसऱ्या बाजूला असणार होता तो स्वत: कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात काम करणारा एक सर्वसामान्य कृष्णवर्णीय संशोधक आणि प्राध्यापक डॉ. टायरोन हेज . 

       सन १९९७ पर्यंत  विद्यापीठातील  नेहमीच्या वर्तुळाबाहेर  डॉ. टायरोन यांचे नाव कोणाला माहितही नव्हते   .परंतु  सन १९९७ मध्ये त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं . ते वळण होत नोव्हार्टीस या कंपनीच त्याना संशोधनासाठी आलेलं बोलावण . ह्या नोव्हार्टीसच रुपांतर नंतर सिंजेंटा कृषी पीक उत्पादन कंपनीत झालं . अमेरिकेतील कायद्यानुसार किटकनाशक व तणनाशक बनवणाऱ्या कंपन्यांना त्याचं उत्पादन पर्यावरणाला हानिकारक नाही हे सिद्ध करावं लागतं .   सिंजेंटा कंपनी अॅट्रॅझिन या तणनाशकाचे उत्पादन करते . अमेरिकेत मका व उस उत्पादक शेतकऱ्यांकडून अॅट्रॅझिनला मोठी मागणी आहे .कंपनीला अॅट्रॅझिन  पर्यावरणाला हानिकारक नाही हे सिद्ध करायचं होत . टायरोनना हे एक नेहमीप्रमाणे शासकीय प्रमाणपत्रासाठी लागणार छोटस संशोधन असणार असच वाटलं होतं . परंतु नियतीच्या मनात काही वेगळच होतं .  

      त्यांनी संशोधनाला सुरुवात केली . त्यांनी एका टबमध्ये अॅट्रॅझिन विरहित पाणी तर दुसऱ्या टबमध्ये अॅट्रॅझिनयुक्त पाणी ठेवलं .दोन्हीमध्ये वेगवेगळे बेडूक ठेवले  .  टायरोन रोज त्या बेडकांचे निरीक्षण करत होते . एक दिवस नेहमी प्रमाणे ते अॅट्रॅझिनयुक्त पाण्यातील बेडूक तपासत होते . त्यातला  नर बेडूक त्याना गेले काही दिवस वेगळाच दिसत होता  . नर बेडकांमध्ये गळ्यावर स्वरकोष असतात .मिलनकाळात नर स्वरकोषामुळे मादीला साद घालू शकतात . परंतु टायरोनना  त्या नर बेडकाच्या स्वरकोषाचा आकार खूप कमी झाल्यासारखा वाटत होता . त्यामुळे आता तो माद्यांना साद घालू शकत नव्हता  . टायरोननी त्या बेडकाची चिरफाड केली आणि त्याची  जननेन्द्रिय तपासायला सुरुवात केली . नराच्या वृषणाच्या बाजूला त्यांना चक्क मादीची अंडाशयं दिसली . तो बेडूक ना नर ना मादी असा झाला होता . याचा अर्थ अॅट्रॅझिनमुळे बेडूक मरत नव्हते परंतु त्यांचीं प्रजोत्पादन क्षमता नष्ट होत होती . टायरोनना हे ही आढळलं, अत्यंत कमी मात्रेतील अॅट्रॅझिनही नराच मादीमध्ये रुपांतर करू शकतं . गेल्या काही वर्षात अमेरिकेत बेडकांची संख्या प्रमाणापेक्षा कमी का होत आहे याच कारण टायरोन यांच्या लक्षात आलं .परंतु   सिंजेंटा कंपनी  टायरोनना आडूनआडून त्यांच्या प्रयोगातील निष्कर्षांत फेरफार करण्यास सुचवू लागली . त्यांनी टायरोनना  वेगवेगळी आमिषेही दाखवली .टायरोन त्याला बधले  नाहीत . मग  या बलाढ्य कंपनीने टायरोनशी उघड उघड संघर्ष सुरु केला .               

      टायरोनचे बेडकांबाबतचे निष्कर्ष जगप्रसिद्ध  ‘नेचर’ या शास्त्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले  . जलस्त्रोतातून शरीरात जाणाऱ्या अॅट्रॅझिनमुळे पुरूषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होऊ शकतो हेही त्यांनी सिद्ध केले . आश्चर्याची गोष्ट अशी  कि स्तनाच्या कर्करोगावरील लेट्रोझोल हे औषध सिंजेंटाच बनवते . म्हणजे कर्करोग निर्माण करणारे विष पर्यावरणात आपणच सोडायचे आणि त्याच्यावरच्या औषधातून आपणच पैसे कमवायचे हा दुहेरी उद्योग ही कंपनी करत आहे .  

      बेडकांवरचे दुष्परिणाम हे केवळ संकटाच्या हिमनगाचे टोक आहे.  किटकनाशकं, तणनाशकं ही माणसाने त्याच्या समृद्धीसाठी तयार केलेली रसायनं आज भस्मासुरासारखी माणसावरच उलटलेली आहेत . सर्वत्र वाढत चालेल्या कर्करोगाची कारणं  या रसायनांच्या अतिवापरात दडलेली आहेत . डॉ. टायरोन  सारख्या तत्वनिष्ठ वैज्ञानिकांमुळे या गोष्टीची जाणीव जागृती होऊ लागली आहे .  


     डॉ.विनया जंगले 

vetvinaya@gmail.com

Sunday, 27 March 2022

गॉर्कीचे बिनभिंतीचे विद्यापीठ

 



मॅक्झिम गॉर्कीच्या आत्मचरित्राची त्रयी म्हणजे विश्वरूपदर्शन आहे. तो जन्मभर बिनभिंतीच्या विद्यापीठात शिकला आणि या विद्यापीठातील त्याचे शिक्षण त्याच्या लेखनभर विखुरले आहे

मॅक्झिम गॉर्कीच्या आत्मचरित्राची त्रयी प्रसिद्ध आहे. माय चाइल्डहूड डेज’ (माझे बालपण) हा अर्थातच बालपणाचे वर्णन करणारा भाग. लेखक पत्रकार गॉर्की (१८६८-१९३६)चे मूळ नाव अॅलेक्से मॅक्सिलॉविच पेशकॉव्ह आणि त्याचा जन्म फार दारिद्र्यात नित्झनी नॉव्हगोर्ड या रशियातील खेड्यात झाला. तो पाच वर्षांचा असताना वडील पटकीने वारले. आईने त्याला आपल्या आईवडिलांकडे सोडून पुनर्विवाह केला. आजोबा शिवराळ कठोर होते. पण आजी हळवी लोककथांचे प्रेम असणारी. रंगारी काम करणाऱ्या आजोबांची चूल पेटणे कठीण झाले आणि आठव्या वर्षांपासून मॅक्झिम जहाजावर भांडी धुणे, कारखान्यात मजुरी करणे अशी अनेक कामे करू लागला. लिहा-वाचायला कामे करीत शिकला. कष्टाचे जिणे फार कठीण झाले तसा एकविसाव्या वर्षी तो दिशाहीन भटका मजूर बनला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात लेखन सुरू करतानाच त्याने मॅक्झिम गॉर्की हे टोपण नाव निवडले. गॉर्कीचा अर्थच दुःखाची छटा असणारा कडवट’ (बिटर) असा आहे. १८९२ साली त्याची मॅकर छुद्रही बालपणीच्या विदारक अनुभवावरील कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर लगेच चोर शेतकऱ्याचा मुलगाही गरिबीचे वास्तव चित्रण करणारी कथा आली आणि त्याचे नाव रशियात गाजू लागले. शब्दचित्रे कथा नंतर १९०६ साली त्याची मदरप्रसिद्ध झाली आणि तो पहिल्या रांगेतील लेखक बनला. मधल्या काळात एक कादंबरी नाटकाने त्या यशाची पूर्वतयारी केली.

त्याच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या खंडाचे नाव आहे इन वर्ल्ड’. उघड्या जगात तो रशियाच्या साम्राज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी भटकत राहिला. साहित्यातील समाजवादी वास्तवाचा प्रणेता ठरला. नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा त्याचे नामांकन झाले होते. लिओ टॉलस्टॉय चेकॉव्हशी त्याचे जवळचे संबंध होते. हलकीफुलकी अंगमेहनतीची कामे करता करता त्याने वाचन वाढवले. एका बाजूला विलक्षण अनुभव दुसऱ्या बाजूला ग्रंथ त्याला रचतहोते. मार्क्सवादी चळवळीत तो एका निष्ठावंत कार्यकर्ता होता. त्याच्या साहित्यकृतीवर नाटके चित्रपट निघाले. कॅप्रीच्या बेटावर त्याने सात वर्षे काढली. तीन वेळा हद्दपारी भोगली. ही संघर्षकथा आजही खिळवून ठेवते. माय युनिव्हर्सिटीज्हा आत्मचरित्राचा तिसरा भाग १९२३ साली प्रसिद्ध झाला. कुठल्याही विद्यापीठात नियमित विद्यार्थी नसताना त्याने माझी विद्यापीठेहे अनेक वचनी नाव मुद्दाम उपरोधासाठी निवडले असावे. गॉर्कीच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या भागाची सुरुवात वाचताना पन्नास वर्षांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेतील कमवा शिकायोजनेतील सवर्ण गरीब मुलांच्या चित्तरकथा आठवतात. औपचारिक शिक्षण सोडून गेलेले बरेच लेब्राट’ (काम करून शिकणारे) बेसकाट’ (मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक) हेच द्वंद्व गॉर्कीच्या चरित्रात दिसते


गॉर्कीचा जन्मच ज्ञानसेवा करण्यासाठी आहे आणि विद्यापीठांना त्याच्यासारख्या तरुणांची गरज असल्याचे सांगतो. त्याचे ऐकून तो शिक्षण घेण्याच्या ओढीने आजीला सोडून सल्लागाराबरोबर प्रवासाला निघतो. तेव्हा आजी सांगते, ‘आता लोकावर चिडू नको. तू रागीट, हट्टी भांडखोर आहेस. थेट आजोबावर गेला आहेस. त्याने काय वाढून ठेवलेय ते बघ. मूर्खासारखा जगला आणि बावळटासारखा संपला, कडवट म्हातारा. एक ध्यानात ठेव, परमेश्वर माणसाला जोखत नाय. ती सैतानाची विशेष गुणवत्ता. ठीक गुडबाय.डोळे पुसत ती आता त्यांची पुर्नभेट होणार नाही असे म्हणते. तो अस्वस्थपणे भटकत राहील आणि ती मरून जाईल हे तिचे भाकीत खरे ठरल्याचे गॉर्कीने तटस्थपणे नोंदवले आहे. साध्या सरळ कथनाचा हा प्रवाह असंख्य वळणे घेतो. क्रांतीपूर्व रशियातील उलथा-पालथी आणि बदलत्या समाजप्रवाहाचे दर्शन सहजतेने घडवले आहे. अॅन्ड नाऊ आय एम इन शल्फ-तातार कझान, इन क्राऊडेड वन-स्टोरी हाऊस…’ हे सारे मुंबैच्या कामगार चाळीतील वास्तव वाटते. डाव्यानारायण सुर्व्यांच्या माझे विद्यापीठचे उगमस्थान अथवा मूलाधार गॉर्कीच्या विद्यापीठात आहे. मात्र त्यांचे विद्यापीठ एका शहरातील आहे. गॉर्कीची विद्यापीठेरशियातील अनेक गावांतील आहेत. येर्व्हेश्नॉव्हची आई त्याला कझानला कशासाठी आलास हा प्रश्न तिसऱ्या दिवशी विचारते. विद्यापीठात प्रवेश घ्यायलाअसे तो म्हणताच ती चक्रावून भाजी चिरायच्या ऐवजी स्वतःचे बोट कापून घेते. जहाजावर स्वयंपाकी होता एवढ्या अनुभवावर त्याला विद्यापीठात प्रवेश कसा मिळणार या प्रश्नाने ती गोंधळून जाते.

हळुहळू उच्च शिक्षण हे दिवास्वप्न बनले. कुणाची मदत मिळेल, आणि नशीब उघडेल ही आशा त्याने सोडून दिली. स्वावलंबी जगण्याने कोवळ्या वयातच मला परिस्थितीचा प्रतिकार करीत एखादा माणूस हा माणूस बनण्याचे पहिले ज्ञान मिळवतो ते मला झालेअसे त्याने म्हटले आहे. उपाशी मरावे लागेल म्हणून तो होल्गा नदीकाठी गोदी कामगार बनला. शिक्षक प्रशिक्षण कॉलेजातील बश्किन हा एक विद्यार्थी त्याच्या परिचयाचा झाला. त्याचे आवडते पुस्तक काऊन्ट ऑफ मॉन्ते क्रिस्तोहे होते. तो कथा छान सांगायचा. वेश्यांसाठी गीते लिहायचा. त्याच्या लेखनशैलीचा मॅक्झिमला मत्सर वाटे. त्रुसोव्हच्या दुकानावर घड्याळ दुरुस्ती दुकानही पाटी होती. पण तो चोरीचा माल विकायचा. तो सायबेरिया, बोखारिया अशा मध्य आशियातील मुसलमानांच्या कथा छान सांगायचा. तिसऱ्या झार अलेक्झांडरच्या दरबारातील चर्चमधील श्रेणीबद्ध भानगडी उकरायचा. हा झार चांगला होता पण दहशतवाद्यांनी त्याला ठार केला. अशी माणसं, परिसर आणि वाचन यामुळे साहसाने वेगळी वाट शोधण्याची आच लागली.

गॉर्कीने व्यक्तिचित्रे कथांचा संग्रह प्रसिद्ध केला. त्यांचे मूलाधार आत्मचरित्रात सापडतात. जॉर्ज प्लेटनेव्ह त्याला ग्रामीण भागात शिक्षक होण्याचे गाजर दाखवतो. तो अभ्यासक्रम पूर्ण करूनही मॅक्झिमला वयाच्या अटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळाली नाही. ते आळीपाळीने भाड्याच्या खोलीत एकच कॉट वापरीत. त्यांची घरमालकीण गाल्किना विद्यार्थ्यांना जोडीदारीण गाठून देई. एक अपत्य असलेली बाई अंधार पडताच एका विद्यार्थ्याच्या खोलीत जाई. ती श्रीमंत बाई त्या तरुणाला मात्र आवडत नसे. हा फार्स मुळातून वाचण्यासारखा आहे. नवीन कामाच्या शोधात भटकताना गॉर्कीने केलेले समाजाचे सूक्ष्म निरीक्षण महत्त्वाचे आहे. आपण समाजात, विशिष्ट गावात संस्कृतीत वाढतो. पण त्यांच्या समग्र साक्षरतेचा दावा कुणीच करू शकत नाही. बेकायदा छापखाना चालवणाऱ्या काही तरुणांना अटक होते. गॉर्कीला सावध वागण्याची सूचना मिळते. आजूबाजूला हेर असतात. क्रांतीत सहभागी होताना त्याला हे सर्व अनुभव मार्गदर्शक ठरले. लेनिनच्या धोरणांचा पुरस्कार त्याने सुरुवातीला केला. पण त्याने लोकशाही समाजवादावरील श्रद्धेने पुढे त्याच्यावर टीका केली. त्याची किंमत मोजली; पण हुकूमशाही साम्यवाद त्याला नको होता.

बेकरीत नोकरी करताना ज्याच्याकडे तो संगीताचे धडे घेत होता त्या शिक्षकालाच पैसे चोरताना पकडतो. परत केलेल्या पैशातील दहा रूबल शिक्षक परत मागतो. असे अनेक प्रसंग गॉर्कीला मानसिक उद्वेगाने आत्महत्येचे प्रयत्न करायला लावतात. अशाच एका प्रसंगावर त्याने अॅन इन्सिडन्ट इन लाइफ ऑफ मॅकरही कथा लिहिली. झारच्या पोलिसांचे हल्ले, चर्चचे अडथळे, गोळीबार, रोमासची हद्दपारी अशा अनेक घटनांचे कथन गॉर्कीने अलिप्तपणे केले आहे. आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न धक्कादायक आहेत.



समाराला स्थलांतर केल्यानंतर एका डेपोत रात्रीचा रखवालदार झाल्यानंतर गॉर्कीला वेगळ्याच अधोलोकाचे दर्शन घडते. देहविक्रय करणाऱ्या लुईसाचे शब्दचित्र त्याने सहृदयतेने रेखाटले आहे. इथेच तो ग्रामीण कलाकारासाठी गीते लिहू लागला. पशू मानव यांच्यामधील संघर्ष तो समजून घेत होता. अन्य साहित्यिकांच्या भेटीचे उल्लेख त्याने भारावून केले आहेत. क्रांतिकारक म्हणून गुप्त पोलिस त्याची चौकशी करतात. हा फार्स रंजक उद्बोधक आहे. त्यांचा प्रमुखच त्याला थोर लेखक कोरोलेन्कोची भेट घ्यायला सांगतो आणि त्यांच्या चर्चांचा वृत्तान्त लेखकाच्या जडणघडणीचे अंतरंग उलगडत जातो. वाङ्मयीन संस्कृतीवरचे त्याचे भाष्य मराठीला लागू पडावे. तो वृत्तपत्रात काम करू लागला. नंतर कथाकार ते कादंबरीकार असा प्रवास. प्रेमाच्या अनुभवांचे चित्रण देखील त्याने हातचे काही राखता केले आहे.

थोडक्यात ढोंगी, उथळ, बौद्धिकतेचा बडेजाव मांडणाऱ्या साहित्य संस्कृतीचा पोकळपणा समजून घेत त्याने त्या धुक्यातून शोधलेली स्वतःची वाट महत्त्वाची ठरली. ती त्याला विद्यापीठीय पदवीने मिळवून दिली नव्हती. त्याच्या बिनभिंतीच्या विद्यापीठातील अनुभवातून ती सापडली होती.

 

-- डॉ. आनंद पाटील

 (लेखक गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख आहेत)

मूळ लेख इथे वाचता येईल.