माध्यम कर्मिंनी वाचलाच पाहिजे हा लेख.
भांडवली नफेखोर विकानितीचे अर्थशास्त्र म्हणजे काय?आणि पर्यावरणाचे रक्षण,संवर्धन ,जतन करायचे असेल तर भांडवली विकासनिती नाकारून हरित राजकारण हे स्वीकारावेच लागेल हे स्पष्ट करणारा हा लेख.
++++++++++++++++++++++;
आजच्या पुण्यनगरीतील माझा लेख
सिंजेंटा विरुद्ध डॉ टायरोन हेज
सन १९९९ . अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील इमारतीतील हॉल. एक कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ उभा होता . पस्तिशीच्या आसपास वय .स्थूल शरीर .साधारण पाच साडेपाच फुट उंची . चौकोनी चेहरा .चेहऱ्यावर दाढीची व्यवस्थित कापलेली वक्र रेष . केसांचा पोनीटेल बांधलेला ,अंगात काळा कोट ,चेहऱ्यावर थोडीशी चिंता असा तो शास्त्रज्ञ पाच सहा गोऱ्या माणसांच्या समोर आपल्या प्रयोगाचे निष्कर्ष मांडत होता . त्याना तो मोठ्या पडद्यावर बेडकांची छायाचित्र दाखवू लागला . तो म्हणाला , “ बेडूक फुफ्फूस व त्वचेद्वारेही श्वासोंश्वास करतो . बेडकाच्या त्वचेतून ऑक्सिजन सहज शोषला जातो . परंतु पाण्यात विरघळणारी किटकनाशके ,तणनाशकेही त्वचेद्वारे सहज बेडकांच्या शरीरात प्रवेश करतात . तुमच्या कंपनीच उत्पादन , अॅट्रॅझिन तणनाशक याच मार्गाने बेडकांच्या शरीरात प्रवेश करत . अॅट्रॅझिनमुळे नर बेडकांच रुपांतर अर्धवट मादी बेडकात होतं . ना नर ना मादी अशी त्याची गत होते . अॅट्रॅझिनमुळे बेडूक आपली प्रजोत्पादनाची क्षमता गमावून बसतात”. तो अतिशय पोटतिडकिने आपले निष्कर्ष मांडत होता . परंतु या निष्कर्षांमुळे समोर बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यांवरची नाराजी गडद होऊ लागली .शेवटी त्यांचा प्रमुख सावकाश एक एक शब्द जुळवत कावेबाजपणे बोलू लागला ,” खात्री करण्यासाठी संपूर्ण प्रयोग पुन्हा करा . आम्ही तुम्हाला पुन्हा निधी देतो . परंतु एका अटीवर . आमची खात्री पटेपर्यंत तुम्ही आपले कोणतेही निष्कर्ष प्रसिद्ध करायचे नाहीत “. तो शास्त्रज्ञ म्हणाला ,” ठीक आहे “ आपल्या प्रयोगशाळेच्या विकासाकरिता हा निधी कसा वापरता येईल याची तो मनातल्या मनात आखणी करू लागला .परंतु त्या माणसांचा हा प्रस्ताव त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यापासून रोखणारा होता हे त्यावेळी त्याला माहित नव्हते . त्याला त्यावेळी हेही माहित नव्हते कि ती एका संघर्षाची सुरुवात होती .या संघर्षाच्या एका बाजूला असणार होती , बलाढ्य बहुराष्ट्रीय अशी सिंजेंटा कृषी उत्पादन कंपनी तर दुसऱ्या बाजूला असणार होता तो स्वत: कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात काम करणारा एक सर्वसामान्य कृष्णवर्णीय संशोधक आणि प्राध्यापक डॉ. टायरोन हेज .
सन १९९७ पर्यंत विद्यापीठातील नेहमीच्या वर्तुळाबाहेर डॉ. टायरोन यांचे नाव कोणाला माहितही नव्हते .परंतु सन १९९७ मध्ये त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं . ते वळण होत नोव्हार्टीस या कंपनीच त्याना संशोधनासाठी आलेलं बोलावण . ह्या नोव्हार्टीसच रुपांतर नंतर सिंजेंटा कृषी पीक उत्पादन कंपनीत झालं . अमेरिकेतील कायद्यानुसार किटकनाशक व तणनाशक बनवणाऱ्या कंपन्यांना त्याचं उत्पादन पर्यावरणाला हानिकारक नाही हे सिद्ध करावं लागतं . सिंजेंटा कंपनी अॅट्रॅझिन या तणनाशकाचे उत्पादन करते . अमेरिकेत मका व उस उत्पादक शेतकऱ्यांकडून अॅट्रॅझिनला मोठी मागणी आहे .कंपनीला अॅट्रॅझिन पर्यावरणाला हानिकारक नाही हे सिद्ध करायचं होत . टायरोनना हे एक नेहमीप्रमाणे शासकीय प्रमाणपत्रासाठी लागणार छोटस संशोधन असणार असच वाटलं होतं . परंतु नियतीच्या मनात काही वेगळच होतं .
त्यांनी संशोधनाला सुरुवात केली . त्यांनी एका टबमध्ये अॅट्रॅझिन विरहित पाणी तर दुसऱ्या टबमध्ये अॅट्रॅझिनयुक्त पाणी ठेवलं .दोन्हीमध्ये वेगवेगळे बेडूक ठेवले . टायरोन रोज त्या बेडकांचे निरीक्षण करत होते . एक दिवस नेहमी प्रमाणे ते अॅट्रॅझिनयुक्त पाण्यातील बेडूक तपासत होते . त्यातला नर बेडूक त्याना गेले काही दिवस वेगळाच दिसत होता . नर बेडकांमध्ये गळ्यावर स्वरकोष असतात .मिलनकाळात नर स्वरकोषामुळे मादीला साद घालू शकतात . परंतु टायरोनना त्या नर बेडकाच्या स्वरकोषाचा आकार खूप कमी झाल्यासारखा वाटत होता . त्यामुळे आता तो माद्यांना साद घालू शकत नव्हता . टायरोननी त्या बेडकाची चिरफाड केली आणि त्याची जननेन्द्रिय तपासायला सुरुवात केली . नराच्या वृषणाच्या बाजूला त्यांना चक्क मादीची अंडाशयं दिसली . तो बेडूक ना नर ना मादी असा झाला होता . याचा अर्थ अॅट्रॅझिनमुळे बेडूक मरत नव्हते परंतु त्यांचीं प्रजोत्पादन क्षमता नष्ट होत होती . टायरोनना हे ही आढळलं, अत्यंत कमी मात्रेतील अॅट्रॅझिनही नराच मादीमध्ये रुपांतर करू शकतं . गेल्या काही वर्षात अमेरिकेत बेडकांची संख्या प्रमाणापेक्षा कमी का होत आहे याच कारण टायरोन यांच्या लक्षात आलं .परंतु सिंजेंटा कंपनी टायरोनना आडूनआडून त्यांच्या प्रयोगातील निष्कर्षांत फेरफार करण्यास सुचवू लागली . त्यांनी टायरोनना वेगवेगळी आमिषेही दाखवली .टायरोन त्याला बधले नाहीत . मग या बलाढ्य कंपनीने टायरोनशी उघड उघड संघर्ष सुरु केला .
टायरोनचे बेडकांबाबतचे निष्कर्ष जगप्रसिद्ध ‘नेचर’ या शास्त्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले . जलस्त्रोतातून शरीरात जाणाऱ्या अॅट्रॅझिनमुळे पुरूषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होऊ शकतो हेही त्यांनी सिद्ध केले . आश्चर्याची गोष्ट अशी कि स्तनाच्या कर्करोगावरील लेट्रोझोल हे औषध सिंजेंटाच बनवते . म्हणजे कर्करोग निर्माण करणारे विष पर्यावरणात आपणच सोडायचे आणि त्याच्यावरच्या औषधातून आपणच पैसे कमवायचे हा दुहेरी उद्योग ही कंपनी करत आहे .
बेडकांवरचे दुष्परिणाम हे केवळ संकटाच्या हिमनगाचे टोक आहे. किटकनाशकं, तणनाशकं ही माणसाने त्याच्या समृद्धीसाठी तयार केलेली रसायनं आज भस्मासुरासारखी माणसावरच उलटलेली आहेत . सर्वत्र वाढत चालेल्या कर्करोगाची कारणं या रसायनांच्या अतिवापरात दडलेली आहेत . डॉ. टायरोन सारख्या तत्वनिष्ठ वैज्ञानिकांमुळे या गोष्टीची जाणीव जागृती होऊ लागली आहे .
डॉ.विनया जंगले
vetvinaya@gmail.com