Thursday, 30 March 2023

चतु:सूत्र : ‘आवाज नसणाऱ्यां’चा आवाज!

 

लेखक - पार्थ एम. एन.



या पत्रकाराचं नाव आहे मीना कोतवाल. ती ३३ वर्षांची आहे आणि द मूकनायकनावाची वेबसाइट तिने सुरू केलेली आहे.

Thursday, 23 March 2023

वाचायलाच हवीत : थेरीगाथा स्त्रीकवितेतला समूहस्वर



November 12, 2022 00:10 IST

अरुणा ढेरे

 

समाजाच्या विविध थरांमधून स्त्रिया भिक्षुणीसंघात आल्या आणि बुद्धांच्या उपदेशानं त्यांनी निर्वाणाची आस धरली. त्या स्त्रियांनी- अर्थात थेरींनी लिहिलेली वचनं म्हणजे थेरीगाथा’. या स्त्रीच्या नाजूकपणाच्या, प्रापंचिक सुखाच्या वा सृष्टीसौंदर्याच्या कथा नाहीत. संघर्ष करत, दु:ख, प्रलोभनं दूर सारत, भावनांच्या पाशातून वेगळय़ा होऊ पाहाणाऱ्या स्त्रियांचे हे उद्गार प्रत्येकानं वाचायलाच हवेत असे.

 थेरीगाथाहा बौद्ध भिक्षुणींच्या वचनांचा-उद्गारांचा संग्रह आहे. थेरम्हणजे मुळात स्थविर’. बौद्ध भिक्षूंना स्थविर किंवा थेर म्हणतात आणि भिक्षुणी म्हणजे थेरी; म्हणजे स्थविरी. मराठीत, बोलीभाषेत आपण थेरडा किंवा थेरडी असे शब्द वापरतो. मूळ ज्येष्ठ किंवा वृद्ध अशा अर्थानं हे शब्द आहेत. या शब्दांच्या अर्थाचा थोडा अपभ्रंश करून अनेकदा राग, तुच्छता किंवा हेटाळणी अशा अर्थच्छटेनं आपण ते वापरतो. मात्र थेर म्हणजे मोठे, ज्येष्ठ, थोर. केवळ शरीरानं ज्येष्ठ नव्हेत, तर ज्ञानानं, अनुभवानं ज्येष्ठ, ते थेर-थेरी!

 या थेर-थेरींच्या गाथा बुद्धवचनांच्या संग्रहात समाविष्ट आहेत. बुद्धाच्या वर्तन-वचनांमुळे जे जागेझाले, त्यांना झालेला बोध म्हणजे त्यांच्या गाथा. त्यामुळे त्याही बुद्धवचनांचा प्रत्यक्ष प्रत्यय देणाऱ्या म्हणून बुद्धवचनसंग्रहात त्यांचा समावेश झाला आहे. गौतम बुद्धांच्या शिष्यांनी बुद्धाचा उपदेश सांभाळला आणि तीन प्रचंड विभागांमध्ये तो जतन करून ठेवला. ते तीन विभाग म्हणजे तीन पेटारे किंवा पीटक’. त्रिपीटक किंवा तिपीटक. या तीन पीटकांमधल्या एका पीटकात- सुत्तपीटकात बुद्धवचनांखेरीज पाच अवांतर संग्रह आहेत. त्यातल्या एका संग्रहात थेर किंवा थेरी यांची वचनं समाविष्ट आहेत. बहुधा इसवी सनपूर्व पहिल्या शतकात हे संग्रह तयार झाले असावेत. अभ्यासकांनी म्हटलं आहे की, हे पाली भाषेतून सिद्ध झालेलं जगातलं प्राचीनतम संतसाहित्य आहे. त्यावर भाष्य करणारा पहिला उत्तम ग्रंथ परमत्थदीपनीम्हणजे परमार्थदीपनीहा धम्मपाल या पंडितानं पुढे लिहिला.

त्रिपीटकातल्या गाथासंग्रहात त्र्याहत्तर थेरींनी उच्चारलेल्या सव्वापाचशेहून अधिक, म्हणजे पाचशे चौतीस गाथा आहेत. गाथा म्हणजे भाषितं. त्यांना उदानअसं म्हटलं जातं. बौद्ध भाष्यांमधली ही शास्त्रीय संज्ञा आहे. उदान म्हणजे सहजस्फूर्त उद्गार. स्वाभाविक ऊर्मीनं उच्चारलेले शब्द! आनंदाच्या भरात हृदयातून सहजपणे उचंबळून उठलेला उमाळा म्हणजे उदान. निर्वाणप्राप्तीच्या आनंदात जे उद्गार भिक्षू-भिक्षुणींच्या मुखातून बाहेर पडले ते म्हणजे उदान. हे अनुभव धर्मक्षेत्रापुरतेच मर्यादित असले, तरी ते एक भावकाव्यच आहे आणि स्त्रीलिखित किंवा स्त्रीउच्चारित भारतीय कवितेत त्याला मानाचं स्थान आहे.

अर्थात मध्ययुगीन विरागिनींच्या भक्तिकाव्यापेक्षा हे पुष्कळ वेगळं काव्य आहे. धर्मतत्त्वांचा तो प्रत्यक्ष अनुभव शब्दांकित झाला आहे. त्यात एक उत्कट असा भाववेग आहे. पाली भाषेत त्यासाठी एक अगदी अन्वर्थक शब्द आहे- धम्मसंवेग’! बौद्ध थेरांच्या गाथांमधून हा संवेग निसर्गाच्या रौद्रसुंदर दर्शनानं प्रकट झाला आहे. सृष्टीच्या विलसितांचा उल्हसित करणारा अनुभव त्यांच्या गाथांमधून सहजपणे अवतरला आणि थेरींच्या गाथांमधून त्यांचा जीवनसंघर्ष व्यक्त झाला. त्यांनी जीवनावर मिळवलेल्या विजयाचा आनंदस्वर ऐकू येतो आहे.

 

या थेरी म्हणजे बुद्धाच्या मुली आहेत. सुंदरी स्थविरी म्हणते, ‘‘मी बुद्धाची मुखजात कन्या आहे. मौखिक उपदेशातून जन्माला आलेली त्याची औरस कन्या आहे.’’ धर्मदीक्षा घेतल्यानंतर बुद्धाच्या लेकी म्हणून नवा जन्म घेतलेल्या या स्त्रिया खूप मोठय़ा संघर्षांला सामोऱ्या गेलेल्या आहेत. बौद्धांची धर्मसाधना म्हणजे चित्तवृत्तींचा विरोध करत खंबीर होत जाण्याची साधना. जन-विजनात भटकंती करत असताना एकीकडे बाह्य संरक्षणाच्या कला त्यांनी विकसित केल्या. असं मानलं जातं, की सध्याच्या ज्यूदो, तायक्वांदो, कुंग फू, कराटे अशा संरक्षणकला हे त्यांचंच विकसित रूप आहे. या कलांमध्येच मिसळून असलेल्या आंतररक्षणाच्या ध्यान-विपश्यनेसारख्या कला आत्मसात करत बौद्ध साधक स्त्री-पुरुष निर्वाणप्राप्तीची अवघड वाट चालले. थेरीगाथांमधून या वाटचालीचंही दर्शन होतं. संपूर्ण स्वावलंबनानं स्वत:ची ओळख करून घेणाऱ्या या थेरींनी संयम, स्वसंयोजन, स्वयंशासन आणि साहस यांच्या आधारानं आत्मसाक्षात्काराचा जो अनुभव प्राप्त केला, त्याचा उच्चार त्यांनी गाथांमधून केला आहे.

समाजाच्या विविध थरांमधून भिक्षुणीसंघात या स्त्रिया दाखल झाल्या आहेत. त्यात मोलमजुरी करणाऱ्या स्त्रिया आहेत, भिक्षेवर निर्वाह करणाऱ्या आहेत, वनवासी आहेत, श्रीमंत-अतिश्रीमंत घरांमधल्या आहेत. विद्यावंत, प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या गृहिणींपासून, राजवंशात जन्मलेल्या स्त्रियांपासून लावण्यवती गणिकांपर्यंत इतर नाना प्रकारच्या वर्ण-वर्गामधल्या स्त्रिया आहेत. या स्त्रियांनी बौद्ध संघात प्रवेश केला आणि आपल्या पूर्वायुष्याचा लोप करून टाकला. निर्वाणप्राप्ती हेच त्यांचं एकमेव उद्दिष्ट उरलं. त्यासाठी केलेल्या साधनेचा विस्तारानं उच्चार त्यांनी केला नाही, पण जाता जाता बौद्धांचे साधनामार्ग मात्र काही जणींनी दाखवले आहेत. उदाहरणार्थ, जेन्ता थेरी म्हणते, ‘निर्वाणप्राप्तीचे जे बोध्यंगरूपी सात मार्ग आहेत, त्यांची बुद्धांच्या उपदेशानुसार मी साधना केली.गुप्ता  थेरी स्वत:शीच बोलते, स्वत:लाच सांगते की, ‘लाडका मुलगा किंवा आवडता प्राणी यांना सोडून तू ज्यासाठी प्रवज्या घेतलीस, तिचंच पालन कर. मनाच्या स्वाधीन होऊ नकोस. राग, अभिमान, अविद्या आणि औद्धत्य टाकून.. तू दु:खाचा शेवट कर.

अशा धर्मानं निश्चित केलेल्या साधनेत या स्त्रिया मग्न झाल्या खऱ्या, पण प्रत्येकीचा निर्वाणप्राप्तीचा अनुभव वेगळा, काळाचा तो तुकडा वेगळा आणि त्या अनुभवात सामावण्याचं प्रत्येकीचं निमित्तही वेगळं. एखादी उत्तरा रात्रीच्या पहिल्या प्रहरी पूर्वजन्माचं स्मरण करता करता मधल्या प्रहरी आपले दिव्यचक्षू शुद्ध करते आणि त्रविद्य होऊन उठते. एखादी सिंहा सात वर्ष स्वत:शी झगडते, पण अखेर निर्वाणप्राप्ती होत नाही म्हणून गळफास घ्यायला निघते.. आणि त्याच क्षणी तिला मुक्तीचा अनुभव येतो. एखादी धर्मा लटपटत्या पायांनी भिक्षा मागताना जमिनीवर कोसळते आणि त्याच वेळी शरीराच्या नश्वरतेची जाण तिला मुक्तीकडे घेऊन जाते. एखादी सुमंगलमाता वृक्षातळी ध्यान लावते आणि तिला परमसुखाचं निर्वाण प्राप्त होतं.

या थेरींचे उद्गार मग फक्त शांत होण्याचे, निर्वाणप्राप्तीच्या आनंदाचे होतात. त्यांच्या गाथा या मुक्तीच्या गाथा आहेत. प्रपंचातून देहानं बाहेर पडण्याच्या आणि नंतर मनानं सगळय़ा विचार-विकारांपासून दूर होत जीवनाच्या गुंत्यातून बाहेर पडण्याच्या. या स्त्रियांनी निसर्गाची गाणी गायली नाहीत. प्रेमाची आणि सहज सुखदु:खांची गाणी गायली नाहीत. भिक्षुणी होण्यापूर्वी त्या कुमारी, प्रौढा आणि वृद्धा म्हणून जगल्या. कुणी प्रपंचानं पोळून निघाल्या म्हणून, कुणी प्रपंचाचं वैयर्थ्य आणि देहाची अनित्यता समजली म्हणून आणि कुणी मुक्तीची आस निर्माण झाली म्हणून स्वेच्छेनं थेरी झाल्या. अगदी धीट आणि स्पष्ट आहेत त्यांचे उद्गार!

एक थेरी म्हणते,

 मी मुक्त! छान मी मुक्त!

उखळ, मुसळ अन् कुबडा (नवरा)

जनन-मरण फेऱ्यातून झाले मुक्त!

भवतृष्णा झाली नष्ट,

 मी मुक्त! मुक्त मी! मुक्त!  स्वयंपाकपाण्यापासून आणि नकोशा नवऱ्यापासून मुक्त झाल्याचा आनंद ती सांगते.  दुसरी एक चंद्रा उपासमारीला कंटाळते. दारिद्रयानं गांजून जाते.

ती सांगते,

हलाखीचे जिणे माझे, नाही पती, नाही पूत

आप्तजनही नव्हते, अन्नवस्त्राची ददात

दारोदार भिकारीण, काठी-कटोरा हातात

सात वर्षे फिरले मी थंडी-उन्हाच्या दाहात  आणि मग तिला एक थेरी भेटली. तिच्याकडून उपदेश घेतला आणि बौद्ध संघात ती आली. म्हणाली,

माझ्या श्रवण-वर्तने आर्या-उपदेश फळे

तीन विद्यांची मी ज्ञाती आस्रविरहित झाले

एक होती सुजाता. तरुण मुलगी. श्रीमंत घरातली सून. एकदा दासींबरोबर विलासाची सगळी साधनं घेऊन ती उद्यानात रमलेली असताना बुद्धाची भेट झाली आणि तिचं मन त्याच्या वाणीनं-उपदेशानं इतकं बदललं की, सगळं वैभव मागे ठेवून ती भिक्षुणी झाली.  पुत्रशोकानं वेडय़ा झालेल्या कृशा गौतमीची कथा तर सर्वश्रुत आहे. गरिबाघरची म्हणून सासरी अवहेलना सोसताना तिला मुलगा झाला आणि तिनं कुळाला पुत्र दिल्यामुळे तिचे हाल थोडे कमी झाले. पण तो मुलगाच मरण पावला आणि गौतमी वेडीपिशी झाली. माझा मुलगा जिवंत कराअसा आग्रह करणाऱ्या तिला सांगितलं, ‘बाई गं, ज्या घरात एकही मृत्यू आजपर्यंत झालेला नाही, अशा घरातून मला थोडी मोहरी आणून दे. मी तुझ्या मुलाला नक्की जिवंत करतो.गौतमी दारोदार हिंडली आणि मृत्यू हे एक अटळ, अपरिहार्य सत्य आहे, हे तिला हळूहळू उमगून आलं. ती शांत झाली.

एक अभिरूपा नंदा होती. अतिशय देखणी. कपिलवस्तूतली ती सधन क्षत्रियकन्या. चरभूत हा शाक्य राजपुत्र तिचा प्रियकर होता. लग्न व्हायचं त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. नंदेच्या आईबापांनी तिला मग सक्तीनं भिक्षुणीसंघात दाखल केलं, पण नंदेला विरक्तीचा मार्ग मान्य नव्हता. सक्तीचं वैराग्य तिनं मनानं स्वीकारलंच नाही. उपदेशासाठी महाप्रजापती गौतमी गौतम बुद्धांकडे भिक्षुणीला पाठवत असे. त्याचा उपदेश ऐकण्याची नंदेला मात्र मुळीच इच्छा नव्हती. तिनं दुसऱ्याच भिक्षुणीला स्वत:ऐवजी पाठवून दिलं. शेवटी बुद्धांच्या सूचनेनुसार तिला एक दिवस त्यांच्यासमोर जावंच लागलं. मनात तीव्र नकार घेऊन ती बुद्धाकडे गेली, तेव्हा बुद्धानं तिच्यासमोर तरुणी, प्रौढा, वृद्धा अशा स्त्रीच्या तिन्ही अवस्था उभ्या केल्या. एके काळचं लावण्य नंतर संपूर्ण नष्ट होणार हे तिला कळून आलं आणि ती भानावर आली.

 

भद्रा, कुंडलकेशा, पटाचारा, विमला, अद्धकाशी, आम्रपाली, चापा या भिक्षुणींच्या गाथांमागची जीवनं म्हणजे तर स्वतंत्र कथांचे विषय आहेत. त्या काळातल्या समाजजीवनाचा एक उभा छेदच आपण त्यामधून घेऊ शकतो. जातिबद्ध, लिंगबद्ध आणि दु:खबद्ध अशा तत्कालीन समाजव्यवस्थेला पर्याय म्हणून जातिनिरपेक्ष, लिंगनिरपेक्ष आणि दु:खमुक्त अशा धर्ममार्गावर चालणाऱ्या स्त्रियांच्या या गाथा आहेत.

लिंग आणि देह हे दोन्हीही परमार्थक्षेत्रात महत्त्वाचे नाहीतच, कारण दोन्हीही भ्रममूलक आहेत, असं बौद्ध तत्त्वज्ञान मानतं. देहाशी जीवनातल्या दु:खांचे अटळ बंध आहेत. म्हणून निर्वाणाच्या मार्गातला देह हा एक अडथळाच आहे, असं हे तत्त्वज्ञान सांगतं. साधनेच्या बळावर दैहिक प्रेरणा आणि वासनांवर ताबा मिळवण्याचा मार्ग बुद्धानं दाखवला. बुद्धानं स्त्रीला दु:खाचं आगर मानलं आहे, कारण ती प्रपंचाशी, भौतिकाशी दृढपणे बांधली गेली आहे. धर्मजीवनात थेरींना भेटलेला बुद्ध हा करुणेचा सागर होता. त्यांच्याविषयीच्या ममत्वभावाने भरलेला होता. त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवणारा तो श्रेष्ठतम गुरू होता. त्याच्यावर भरवसा ठेवून बौद्ध संघात आलेल्या अनेकींना स्वत:च्या देहाशी प्रथम संघर्ष करावा लागला आहे. देहाच्या विकारांना ताब्यात ठेवण्यासाठी झगडावं लागलं आहे. नंदोत्तरा, सिंहा, क्षेमा, अद्धकाशी, विमला यांना देहाच्या वासनांपासून मुक्त होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या देहस्विनींच्या गाथा म्हणजे बुद्धिमान अशा साहसी स्त्रियांच्याच गाथा आहेत. या स्त्रियांना लोभावणारा मारहा बौद्ध चिंतनातून गाथांमध्येही आलेला आहेच. मार हे मोहाचं प्रतीक आहे. तो या स्त्रियांना सन्मार्गापासून ढळवण्याचा प्रयत्न करतो. सोमा नावाच्या थेरीची हेटाळणी करताना तो म्हणतो, ‘जे स्थान केवळ ऋषींनीच प्राप्त करावं असं आहे, ते केवळ दोन बोटांची प्रज्ञा असणाऱ्या स्त्रीला प्राप्त होणं शक्य नाही.द्वयंगुल प्रज्ञा म्हणजे दोन बोटांची प्रज्ञा. स्वयंपाकाशी अटळपणे बांधली गेलेली बाई भात शिजला की नाही हे बघण्यासाठी भाताचं शीत दोन बोटांनी दाबून पाहते. बायकांची बुद्धी शितावरून भाताची परीक्षा करण्याइतकीच असते, असं मार तिला खिजवून म्हणतो. त्यावर सोमानं उत्तर दिलं आहे की, ‘माझं चित्त मी सुसमाहित केलं आणि ज्ञान प्राप्त केलं. सम्यक् धर्म मला समजला. मग माझं स्त्रीत्व कशाच्या आड येणार? आनंददायक वाटणारी तृष्णा मी नष्ट केली आणि अंधाराचा संचय फोडून टाकला. आता, हे पाप्या, तू समजून अस की तू अंतक आहेस, पण मीच तुला ठार केलं आहे.

सोमा ज्ञानाची गोष्ट करते. जीवनाचं सम्यक् स्वरूप समजणं, धर्माची मूलतत्त्वं समजणं, याबाबतीत स्त्री-पुरुष भेद संभवतच नाही. पण अशा पातळीवर पोहोचण्यासाठी या थेरींना जो संघर्ष करावा लागला, त्यात त्यांच्या मनाची स्वाभाविक कोवळीक बहुधा संपून गेली असावी. भवतालच्या सौंदर्याची आणि भावात्मतेची सुखद चित्रं थेरीगाथांमधून उमटलेली दिसत नाहीत ती त्यामुळे.  तरीही या गाथा वाचताना आपल्याला विस्मयाची एक आनंददायक जाणीव होते. विस्मय याचा, की बुद्धासह सर्वानीच जिला प्रपंचाचं प्रतिरूप म्हणून दु:खमय मानलं, तिनंच प्रपंचाच्या आणि दु:खाच्या पार गेल्याचा निर्वाळा किती उमाळय़ानं दिला आहे. आणि विस्मय याचाही, की स्त्रीकडे पाहाण्याची एक दृष्टी या गाथांनी किती सहज आपल्याला दिली आहे. भिकारीण असो, वेडी असो, परित्यक्ता असो, की वेश्या असो, कोणीही निर्वाण प्राप्त करू शकतं; कोणालाही मुक्ती मिळू शकते. केवढा मोठा दिलासा आहे हा प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक दुबळय़ाला, प्रत्येकालाच! शिवाय स्त्रियांना हे आश्वासन मिळालं आहे की, आपण साहस करू शकतो, झगडू शकतो, विश्वासानं- स्वत:वरच्या विश्वासानं उभ्या राहू शकतो.  स्त्रीच्या नाजूकपणाच्या गाथा नाहीत या. विश्रब्ध प्रापंचिक सुखाच्याही नाहीत. या गाथा आहेत दु:खाचे डोंगर फोडून पलीकडे गेलेल्यांच्या. प्रलोभनांची चिवट जाळी फाडून फेकलेल्यांच्या. भावनांच्या कारांमधून धैर्यानं निसटणाऱ्यांच्या. दोन्ही हात उंचावत निर्वाणाचा- मुक्तीचा आनंदघोष करणाऱ्या स्त्रियांचे हे शांत आणि उत्स्फूर्त उद्गार आहेत आणि बौद्ध वाङ्मयानं ते दोन हजार वर्ष सांभाळले, म्हणून आज आपल्यापर्यंत ते येऊ शकले आहेत. धर्मरत स्त्रियांची मुक्तीची आस, त्यांनी लौकिक-अलौकिक पातळीवर केलेला संघर्ष आणि त्यांनी निर्धारानं प्रेयसाचा त्याग करत प्राप्त केलेलं त्यांचं निर्वाण- त्यांचं श्रेयस, यांचं दर्शन घडवणारी ही अ-पूर्व कविता भारतीय काव्यपरंपरेतही स्वतंत्र स्थान मागणारी आहे.

 

aruna.dhere@gmail.com