१८०६ सालापासून मराठी (देवनागरी) छापखाना सुरू झाला.१८०६ साली विल्यम कॅरेचं पहिलं मराठी पुस्तक छापण्यात आलं. (ग्रामर ऑफ मराठा लॅण्गवेज, Grammar of Maratha language ) तेव्हापासूनचा इतिहास शोधून पाहा. मराठीतलं शिवरायांबद्दलचं पहिलं पुस्तक जोतीरावांचं आहे. जून १८६९ मध्ये ते प्रसिद्ध झाले.
मुंबईतील ओरिएन्टल छापखान्यात छापलेले हे पुस्तक मुंबईत काळबादेवीला वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या तर पुण्यात स्वत: जोतीरावांच्या वेताळ पेठेतील (नंतरची गंज पेठ व सध्याची महात्मा फुले पेठ ) पुस्तकांच्या दुकानात विक्रीला ठेवलेले होते. त्याची किंमत अवघी सहा आणे ठेवण्यात आलेली होती. हे पुस्तक जोतीरावांनी परमहंस सभेचे अध्यक्ष दिवंगत रामचंद्र बाबाजी राणे यांना अर्पण केले होते.
"शिवराय एव्हढे मोठे होते की, ते अमक्याएव्हढे मोठे होते," अशी इतर कोणाची त्यांना उपमा द्यायची असेल तर दुसरी व्यक्तीच उपमेला समोर दिसत नाही, इतके महाराज मोठे होते, असे फुले या पोवाड्यात सांगतात.
छत्रपतींचे जीवन व कार्य याविषयी भरभरून आदर व्यक्त करून तेच आपली कार्यप्रेरणा आहेत, असेही जोतीराव सांगतात. सुमारे एक हजार ओळींचा हा प्रदीर्घ पोवाडा आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या व मी संपादीत केलेल्या महात्मा फुले समग्र वाड्मयात तसेच इंटरनेटवरही हा पोवाडा उपलब्ध आहे.
मराठीतील विविध बखरी, फारशीमधील तवारिखा, इतिहास ग्रंथ, इंग्रजी भाषेतील नानाविध ऎतिहासिक पुस्तके यांचा सखोल व्यासंग करून मोठ्या तयारीनिशी जोतीरावांनी हा ग्रंथ सिद्ध केला. गेली १५५ वर्षे तो सर्वत्र उपलब्ध आहे.
" अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेतायुगी !१!
स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार देशासाठी !२!"
शिवराय देशासाठी लढत होते असे सांगणारे पहिले इतिहासकार, शिवशाहीर महात्मा जोतीराव फुले होत. त्यांना हा मान का नाकारला जातो?
शिवरायांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आलेख रेखाटताना जोतीराव म्हणतात,
"सोसिले उन्हातान्हाला भ्याला नाही पावसाला
डोंगर कंगर फिरला यवन जेरीस आणला
लढवी अचाट बुद्धीला आचंबा भुमीवर केला
बाळगी जरी संपत्तीला तरी बेताने खर्च केला
वाटणी देई शिपायाला लोभ द्रव्याचा नाही केला
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला!"
हे पुस्तक लिहून आणि प्रकाशित करूनच जोतीराव थांबले नाहीत. त्यांनी शिवचरित्रावर व्याख्याने द्यायचा, पोवाडे गायचा धडाका लावला. १८८० साली जोतीराव रायगडावर गेले. महाराजांच्या समाधीची त्यांनी पुजा केली. पुण्यात येऊन स्वारगेटजवळच्या हिराबागेत (शिवाजी मराठा शिक्षण संस्थेजवळ) गंगारामभाऊ म्हस्के (मराठा) आणि चाफळकर स्वामी (ब्राह्मण) या मित्रांच्या सोबत सत्यशोधक समाजातर्फे पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. तिथून ही जयंती मुंबईला लालबाग परळला रावबहादूर लोखंडे यांनी नेली. त्यानंतर १५ वर्षांनी लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीला हजेरी लावली. इतिहास लिहिणारांनी मात्र शिवजयंतीचे सगळे श्रेय टिळकांना देऊन टाकले.
खरा इतिहास सांगतो, शिवजयंती सुरू महात्मा फुल्यांनी केली होती, लो. टिळकांनी ती पुढे नेली.
टिळकांचे नातू जयवंतराव टिळक यांना याचे भान होते. त्यामुळे आपल्या आत्मचरित्रात टिळकांनी ती सुरू केल्याचा दावा न करता त्यांनी ती पुढे आणली, अशी प्रांजळ कबुली जयवंतराव देतात.
टिळकांनी रायगडवर जाण्याचा निर्णय ज्या सभेत घेतला तिच्याबद्दल टिळक चरित्रकार न.चिं. केळकर लिहीतात, "सभेचे अध्यक्ष चाफळकर स्वामी होते. ठराव डॉ. विश्राम रामजी घोले यांनी मांडला. अनुमोदन गंगाराम भाऊ म्हस्के यांनी दिले. यापूर्वीही असे प्रयत्न झाले होते."
आधीचे प्रयत्न म्हणजे १८८० साली महात्मा जोतीराव फुले यांनी शिवजयंती सुरू करण्यासाठी घेतलेली सभा.
ही पहिली सभा झाली हिराबागेत. टिळक तिथेच सभा घेतात.
फुल्यांनी घेतलेल्या सभेचे अध्यक्ष होते चाफळकर स्वामी. तेच अध्यक्ष टिळकांनीही निवडले.
फुल्यांनी घेतलेल्या सभेत ठराव मांडणारे नी अनुमोदन देणारे घोले व म्हस्के होते. हेच टिळकांच्या सभेत ठराव मांडतात. अनुमोदन देतात.
म्हणाजे दोन्ही ठिकाणी व्यक्ती त्याच. फक्त १८८० ला नेते फुले आहेत नी १८९५ ला टिळक.
इतके सगळे लेखी पुरावे असताना शिवाजी महाराजांची जयंती करण्याचे श्रेय फुल्यांचे काढून टिळकांना देणे हे कितपत उचित आहे?
सत्यशोधक समाजाच्या वतीने झालेल्या जयंती कार्यक्रमाच्या बातम्या दीनबंधूमध्ये अनेकदा प्रकाशित झालेल्या आहेत.
फुल्यांनी १८६९ ला लिहिलेलं शिवचरित्र(पोवाडा), सुरू केलेली जयंती, पुढे १९०६ साली सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेले ६०० पृष्ठांचे शिवचरित्र, जेधे जवळकर यांचे शिवाजी मेळे आणि १९३३ ला हीरक महोत्सवानिमित्त माधवराव बागल यांचा ग्रंथ असे इतरही असंख्य पुरावे आहेत. : प्रा. हरी Hari Narke
- Prof. Hari Narke यांच्या Facebook पोस्ट वरून