Wednesday, 26 March 2014

अरविंद केजरीवाल का उल्टा चष्मा!

Sunday, March 16, 2014

'चष्मा' हा मानवाने दृष्टिदोष दूर करण्याकरिता रोजच्या वापरासाठी, तुलनेने कमी खर्चात बनवलेले साधन आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळिशीनंतर चष्मा वापरायची गरज निर्माण होई. त्यामुळे त्याला 'चाळिशी' असेही उपनाम मिळाले. चाळिशी म्हणजे तारुण्य संपले असे समजून लग्नाच्या बाजारात 'चष्मा असलेली मुलगी नको' अशा जाहिरातीही केल्या जात. 
कालांतराने चष्मा या गोष्टीकडे बघण्याचा लोकांचाच दृष्टिकोन बदलला. त्यानंतर ही चाळिशी शाळकरी मुलांच्या नाकावरही दिसू लागली. पूर्वी लग्नाच्या बाजारात मुलींची अडचण ठरणारा चष्मा सध्या मुलींमध्ये 'स्पेक्ट्स' नावाने स्टाईल स्टेटमेंट ठरलाय. चष्मा आता विशेषण, वृत्ती-प्रवृत्ती दाखवणारं साधन म्हणूनही प्रसिद्ध झालाय. उदा. 'काले चष्मेवाले' किंवा 'तुम्ही तुमचा चष्मा बदला..' इ. इ. 
सध्या निवडणुकांचे वातावरण असल्याने विविध राजकीय पक्ष, नेते, विश्लेषक यांना या ना त्या कारणाने 'दृष्टिकोन' या विषयावर बोलताना 'चष्मा' या शब्दाचा वापर करावा लागतो. राजकारणात स्थिरस्थावर, वृद्धजर्जर झालेल्या पक्षांपासून तरुण, तेजतर्रार नवनिर्माणापर्यंतचे अनेक पक्ष आहेत. एखाद्याचा नंबर वर्षांनुवर्षे तोच राहावा तसे या पक्षांचे 'दृष्टिकोन'- पर्यायाने 'चष्मे' फ्रेमसह परिचित झालेत. 
मात्र, भारतीय राजकारणात नव्याने आलेले, भ्रष्टाचार निर्मूलन, व्यवस्था परिवर्तन, उद्योगपतींनी विकत घेतलेले पक्ष नेस्तनाबूत करण्यासाठी आलेले, भ्रष्टाचार निर्मूलन महामहोपाध्याय अण्णाजी हजारे यांनी बहिष्कृत केलेले, स्वयंघोषित 'आम आदमी' अरविंद केजरीवाल यांनी सर्व नेत्रतज्ज्ञांना देशोधडीला लावण्याचा पणच केलेला दिसतो. अर्थात हे नेत्रतज्ज्ञ राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्टी तपासणारे आहेत.
अण्णा हजारे यांच्या 'जंतरमंतर'वरील त्या प्रसिद्ध आंदोलनात अण्णा, किरण बेदी, प्रशांत भूषण यांबरोबरच अरविंद केजरीवाल प्रथम जनतेला माहीत झाले. अण्णा, किरण बेदी तशी प्रकाशझोतातली माणसे. भूषण पिता-पुत्र हे जेठमलानी पिता-पुत्राप्रमाणे दिल्लीच्या कायदेवर्तुळातील परिचित नाव (आणि 'जेठमलानीज्' इतकेच उपद्व्यापीही!). यात अरविंद केजरीवाल यांनी मात्र हनुमानाची भूमिका घेतलेली. त्यांच्या साध्या पॅण्ट-शर्टवर साधा स्वेटर, पायात साध्या चपला याचे कुठल्याही गोष्टीचे केव्हाही अप्रूप वाटणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी त्यावेळी पडदा फाटेस्तोवर कौतुक केलेले. तेच या आंदोलनामागचा 'ब्रेन' आहेत, असेही नंतर सांगितले जाऊ लागले. आणि लवकरच अरविंदजींनी ते खरे करून दाखवले.
लोकपाल आंदोलनात सर्व राजकीय पक्षांना 'चपले'प्रमाणे बाहेर ठेवणाऱ्या या आंदोलनातून बाहेर पडून केजरीवाल यांनी 'आम आदमी पार्टी' म्हणजे 'आप' हा नवा राजकीय पक्ष काढला. अण्णा हजारे, किरण बेदी त्यापासून दूर राहिले, तर अंजली दमानियांपासून अनेक लोक त्या पक्षात सामील झाले. यात वेगळे नाव होते योगेंद्र यादव यांचे. अण्णांचे शिष्य म्हणवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी अण्णांचे मत बाजूला ठेवत, पण त्यांचा आदर करत राजकीय पक्ष काढलाच. आधुनिक द्रोणाचार्यास आधुनिक एकलव्याने अंगठा न देता अंगठा दाखवला. 



त्यानंतर अरविंद केजरीवाल यांची गाडी भरधाव सुटली. लोकपाल आंदोलन सुरू झाल्यावर 'हा कोण केजरीवाल?' यावर आपल्या राजकीय अनुमान संस्कृतीतील पहिल्या धडय़ाप्रमाणे 'तो संघाचा माणूस' असा संशय व्यक्त केला गेला. नंतर तो भाजप प्रायोजित आहे असा गवगवा झाला. पण पुढे केजरीवाल भाजपवरही झाडू चालवायला लागल्यावर आतून खूश असलेले संघ-भाजपही सावध झाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सेफोलॉजिस्टसकट सर्वानी 'आप'ला कच्चा लिंबू ठरवले होते. पण केजरीवाल का जादू (की झाडू?) चल गया आणि दिल्लीत काँग्रेस नामशेष झाली, तर भाजपच्या तोंडचा सत्तेचा घास काढून घेतला गेला. आणि विश्लेषकांसह राजकीय पक्षांच्या झोपा उडाल्या! डावी आघाडी, उजवी आघाडी, तिसरी आघाडी, चौथा पर्याय या सर्वापलीकडे जाऊन 'आप' उभा ठाकला. 
यानंतर अरविंद केजरीवाल यांनी विशिष्ट कोनातून चालायला नकार देतानाच नागमोडी वळणांना लाजवेल अशी वळणे घेतली. दिल्लीत कुणाचाच पाठिंबा घेणार नाही, विरोधी पक्षातच राहू, पुन्हा निवडणुकांना सामोरे जाऊ, आम्ही इथे सत्तेसाठी नाही, तर 'व्यवस्था परिवर्तना'साठी आलोय, असे सांगत सांगत त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनवले. त्यावर 'तुम्ही काँग्रेसचा पाठिंबा कसा घेतला?' या सवालावर त्यांचे उत्तर : 'आम्ही कुठे घेतला? त्यांनी दिला.' अशा रीतीने त्यांनी राजकीय निर्णय लग्नाच्या अहेराच्या पातळीवर आणला. 
पुढे त्यांनी हीच आपली शैली बनवली. प्रत्येक वेळी 'मला कुठे सत्ता हवी? मला मुख्यमंत्री नाही व्हायचे, पंतप्रधान नाही व्हायचे, मला व्यवस्था बदलायचीय..' असं ते म्हणत राहिले. राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटसारखी केजरीवालांची 'व्यवस्था' हे एक गूढच आहे. केजरीवाल आता वेड पांघरून पेडगावला जायच्याही पलीकडे गेलेत. ते काय पांघरतील नि कुठे जातील, हे सीआयएलाही कळणार नाही, इतका त्यांचा भोवरा गरगरवणारा आहे. योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासारख्या संघटनात्मक लोकशाही मानणाऱ्या आणि विचारपूर्वक मांडणी करणाऱ्या लोकांना केजरीवाल पक्षप्रमुख म्हणून सहन करणे आणि त्यांच्या अराजकी कृतींचे समर्थन करणे दिवसेंदिवस कठीण जाणार आहे. केजरीवाल बदलू पाहणारी 'व्यवस्था' नेमकी कुठली, हे निदान त्यांना तरी माहीत असेल अशी वेडी आशा करायला काहीच हरकत नाही. 
लोकपाल आंदोलनापासून केजरीवालांना इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया यांचे सामथ्र्य जसे कळले तसेच त्यांचे उपद्रवमूल्यही कळले. इलेक्ट्रॉनिक मीडियाला सनसनाटी हवी असते. तर सोशल मीडियाला कुणीतरी कुणालातरी नागवे करतोय हे ज्याम भारी वाटते. पाकीटमाराला पकडलेल्या गर्दीत एरवी झुरळही न मारणारे हात धुऊन घेतात तसे या सोशल मीडियावर घरबसल्या तत्त्वज्ञान झोडण्यापासून कमरेखालचे शेरे, विनोद काही सेकंदांत जगभर पसरवून प्रसंगी 'विकृत' आनंद घेणाऱ्यांची प्रवृत्ती वाढती आहे. (या दोन्ही माध्यमांचा सकारात्मक वापरही होतो. पण त्याचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे.) केजरीवाल या दोन्ही माध्यमांना योग्य ते खाद्य पुरवतात. 
केजरीवालांच्या मुलाखती म्हणजे आटय़ापाटय़ा असतात. त्यात थेट उत्तर नसते. कशाचेही समर्थन असते. आपण किती 'परोपकारी गोपाळ' आहोत, हा भाव कायम चेहऱ्यावर. त्यांच्या मुलाखतीमधील प्रश्नोत्तरे साधारण पुढीलप्रमाणे असतात.
प्रश्न : तुम्ही काँग्रेसचा पाठिंबा घेतलात.. 
उत्तर : आम्ही घेतला नाही, त्यांनी दिला. 
प्रश्न : तुम्ही निवडणुकीआधी खूप आश्वासने दिली होती.. 
उत्तर : त्यातली बरीच पूर्ण केली. वीज दरकपात, वाढीव पाणी, इस्पितळांत औषधे, पोलिसांनी पैसे खाणे कमी केले. वाहन परवान्यातला भ्रष्टाचार थांबला.. 
प्रश्न : तुम्ही जनलोकपाल बिल मांडताना घटनात्मक गोष्टी पाळल्या नाहीत.. 
उत्तर : कुठल्या गोष्टी? घटनेत कुठे असे लिहिलेय? मी वाचलीय घटना. घटनेत असे कुठेही लिहिलेले नाही..
प्रश्न : पण घटनातज्ज्ञही म्हणताहेत.. 
उत्तर : तज्ज्ञ काय म्हणतात, यापेक्षा घटनेत काय लिहिलेय, हे महत्त्वाचे. 
तरीही पत्रकार 'घटना, घटनात्मक' करत राहिला तर केजरीवालांचे ठरलेले अस्त्र बाहेर काढतात. ते थेट त्या पत्रकाराला विचारतात : तुम्ही घटना वाचलीय? ते कलम माहितीय? तुम्ही पाहिजे तर पुन्हा वाचा नि माझ्याकडे या! 
आता इलेक्ट्रॉनिक मीडियातला पत्रकार घटना वाचून पुन्हा येईल, हे म्हणजे अडवाणींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यासारखे होईल, हे केजरीवाल चांगलेच जाणतात. अशा जुगलबंदीने त्यांचा दर्शक व 'नेटकरी' खूश होतो, हेही त्यांना माहीत असेल. 
फार पूर्वी दूरदर्शनवर इ/ह जमान्यात 'जनवाणी' नावाचा कार्यक्रम विनोद दुआ सादर करीत. सरकारी माध्यम असून मंत्र्यांना अडचणीत आणणारे प्रश्न दुआ शांतपणे, प्रसंगी समोरच्याला डिवचत विचारीत. तेव्हा विनोद दुआ असेच हीरो झाले होते. आज प्रश्न तेच आहेत, राजकारणीही तेच आहेत. त्यावेळचे हीरो विनोद दुआ कुठल्याशा वाहिनीवर 'इंडिया का जायका' नावाचा कार्यक्रम सादर करतात.. म्हणजे भारतातले रसनावैविध्य! प्रशांत दामलेंच्या 'आम्ही सारे खवय्ये'सारखेच हे प्रकरण. प्रणव रॉयच्या बरोबरीने वावरणारे विनोद दुआ आज 'कहाँ गए वो लोग'च्या यादीत आहेत! 
सध्याच्या कमालीच्या निराशाजनक, अराजकसदृश पर्यावरणात केजरीवालसारखा काजवाही सूर्य भासू लागतो, यावरून समर्थ पर्यायाची निकड लक्षात यावी. हजारेंसकट या मंडळींनी काही आशा निर्माण केली होती. पण हजारेंसकट केजरीवालांनी त्यावर पाणी टाकले. 
आज केजरीवाल काय बोलताहेत? तर काँग्रेस, भाजप मुकेश अंबानींनी विकत घेतलेत. हा देश मुकेश अंबानी चालवतात. दुसरीकडे कॉपरेरेटना माझा विरोध नाही, काही चांगले उद्योजकही आहेत, असंही ते म्हणतात. म्हणजे आयएसआयसारखे केजरीवाल मार्क असेल तर स्वच्छ, शुद्ध, पारदर्शी उद्योग! साध्या घरात राहतो सांगून पाच बेडरूमचे दोन बंगले स्वत:च पत्र लिहून मागायचे? कायदा मोडणाऱ्या मंत्र्याच्या बाजूने उभे राहताना 'मंत्र्याने रात्री फिरू नये, कुठे गुन्हा होत असेल तर जाऊ नये, पोलिसांना आदेश देऊ नयेत, जागेवरच न्याय करू नये, असे कुठे लिहिलेय? आम्ही मंत्री, मुख्यमंत्री, सचिवालय.. सगळेच आम्हाला वाटेल तसे चालवू. आम्ही तेच करायला आलोय. मुख्यमंत्र्यांनी धरणे धरू नये, रात्री रस्त्यावर झोपणे यात घटनाबाह्य काय? रस्त्यावर बसून फायलींचा निपटारा केला तर त्यात बोंबाबोंब कशाला? आम्ही कुठे निवडणुका लढतोय? लोक लढवताहेत. आम्ही कुठे मंत्री, मुख्यमंत्री झालो? लोक झाले! मला पंतप्रधान नाही व्हायचे, पण लोकांना वाटत असेल तर लोक करतील. लोक ठरवतील. मी साधा माणूस आहे. मला काही नको. सामान्य माणसाला द्या. माझी विचारसरणी विचारू नका. माझे धोरण विचारू नका. पक्षसंघटन विचारू नका. संस्थापक, उमेदवार, प्रचारक, प्रवक्ता यातला फरक विचारू नका. आमचे काही चुकत नाही. तुम्हीच आमच्याकडे चुकीच्या पद्धतीने बघता. तुम्ही तुमचा चष्मा बदला. काँग्रेस, बीजेपीच्या चष्म्यातून बघू नका. कारण त्यांना अंबानीने चष्मा दिलाय. मला साधा आम आदमीचा चष्मा हवाय. '
यू-टय़ूबने केजरीवालांच्या चष्म्याच्या आतले डोळे आणि त्या डोळय़ांतले भिंग लोकांसमोर ठेवलंय. केजरीवाल मात्र म्हणतात, त्यात काहीच वावगे नाहीए! आपने आता 'झाडू'प्रमाणे केजरीवाल चष्मेही वाटावेत! 


शेवटची सरळ रेघ : हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध खलनायक अजित विशिष्ट शैलीमुळे मिमिक्री आयटममधले एक अनिवार्य पात्र झाले. त्यांच्या नावावरचे खास त्यांच्या स्टाईलमधले संवाद प्रसिद्ध झाले. परवा राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीविरोधातही उमेदवार उभे केले. ते वाचून वाटले, राज ठाकरे महायुतीच्या पांडवांना अजित स्टाईल म्हणताहेत : मैं तुम्हें लिक्विड ऑक्सिजन में डाल दूँगा.. लिक्विड तुम्हें जीने नहीं देगा, ऑक्सिजन तुम्हें मरने नहीं देगा! 

Wednesday, 12 March 2014

माझ्या प्रिय मैत्रीणी

मी कधीपासून वाट पाहतो आहे
माझ्या प्रिय मैत्रीणी
एका टोटल डिझास्टरची
तुझ्याकडून...

अजून किती काळ तू
ही धीराची वात लांबवत नेणार आहेस
या सनातन युध्दात?
शतकानुशतकांचे तह करून
तुझ्या विजयावर होत नाहीए शिक्कामोर्तब
दोन पावलं पुढे जाण्यासाठी
दोन पावलं मागे घेण्याची
ही तुझी रणनीती
तुलाच किती पावलं मागे घेवून गेलीय
हे तुझ्या लक्षात कधी येणार
माझ्या प्रिय मैत्रीणी?

मोहेंजोदरोच्या दरबारातील
नग्न नर्तीका ते लेडज बार
किती लांब हा तुझा सांस्कृतीक दुपट्टा
गादीचा कापूस टाक्यासहीत सांभाळण्याचे
सनातन भरतकाम
आणि मातृत्वाच्या नवरात्र उत्सवातले
उत्सवी दांडीया रास आणि
तुझी छाती फुटतेय घागर फुंकून...

तू का घालत नाहीस खो
त्यांच्या सात मिनीटांच्या खेळाला?
तू का धरत नाहीस तंगडी
आणि जिंकत बिछान्यातली कबड्डी?
तूला टोकावर तोलणारे मलखांब
व तुझी तारेवरची कसरत
ट्रॅडिशनल जन्मॅस्टिकमध्ये
तू का नाहीस फोडत
जेंडरची लगोरी?

तू ही का जात नाहीस
घरदार, पोरंबाळं सोडून संन्याशांसारखी
न सांगता निघून जाण्याची
त्यांची परंपरा गौतमापासूनची
पण माझ्या प्रिय मैत्रीणी,
एखादाच गौतम परतताना बुध्द होतो
बाकी साले कॉमिक्समधले फँटम
छटाक पेगने यांची विमाने उडतात
नी रात्री बेरात्री येऊन बायकोला कुथवतात
म्हणून का यांना तू सूपरमॅन म्हणणार
आणि त्यांच्याच गोष्टी सांगत
पोरांना थोपटवत झोपवणार?
या थोपटवण्याचा पेटंट तू का नाही
टाकत आहेस विकून
या इंटरनॅशनल मार्केटमध्ये?

तू व्हर्जिन मेरी होवून येशूला थोपटलेस
यशोधरा होवून बुध्दाला थोपटलेस
कुंती होवून अग्नी गोलालाच शांत केलेस
सावित्री, रमा होवून फुले, आंबेडकरांना थोपाटलेस
कस्तुरबा होवून गांधीही जोजवलेस
आता पाळण्याच्या दोरीची वात करून
उडवून दे भडका
लालबायला करून टाक बाय बाय
आता इथून पुढे मारून टाक
तुझ्याच नाळेला गाठ
एरव्ही हे साले तुझी सोडणार नाहीत पाठ

पाठ आणि पोट यांच्या
स्पेअर कपॅसिटीच्या जाहीराती देणं
आता तू बंद कर
तू भूलू नकोस यांच्या ओव्या, अभंगांना
समानतेचे आणि सहजीवनाचे पोवाडे ऐकून
ऊर भरून येऊ देऊ नकोस
या पोवाड्यातही तूला
जीरं रं जीरं रं जी जी म्हणण्याशिवाय
विशेष भूमिका नाहीए
हे तुझ्या लक्षात येतंय का
माझ्या प्रिय मैत्रीणी?

पारंपारीक सौभाग्य वस्तू भांडारातली
सौभाग्य टिकली
आणि महापुरूषांच्या सावलीचे पुरोगामी वस्त्रभांडार
एक घराजवळ, दूसरं गल्लीच्या टोकावर
एवढंच अंतर, मधला रस्ता तोच
म्हणून म्हणतो,
जरा थंडा दिमागसे सोच,
ऐ मेरे दोस्त

हे असे शिळेची अहिल्या होण्याचे कोर्सेस
त्यांचे ठरावीक सिलॅबस
आणि सुधारकी विद्यापीठांची मोहोर
यातून कुणाचे होतेय शिक्षण?
अशा पदवीदानांच्या डगल्यांनी झाकून शरीर
किती काळ झळकशील मातींच्या भिंतींवर ?
मला वाटलं होतं
तू भिंतीशीच घेशील टक्कर

स्वातंत्र्य कुणी देत नाही
माझ्या प्रिय मैत्रीणी,
ते मिळवावं लागतं
कुणी ते पाणी पेटवून मिळवतं
कुणी ते मीठ उचलून मिळवतं
तू कशाची तयार केली आहेस मैत्रीणी?
अस्पृश्यांच्या पंगतीत बसवलेली तू
किंचित सुधारकीच्या स्पर्शानेही
किती मोहरतेस तू!
कसे फुलतात लगेच तुझ्या गाली गुलाब
आणि कशी गातेस तू गोड गोड गाणी
गणिकांच्या बाजारांपासून
लेदर करंसीच्या करंट मार्केटपर्यंत
कशी घेतेस तू ही XXX गाढवं अंगावर
किती अमोघ हे तुझे सामर्थ्य
ट्रॅक बदलून मी म्हणू का तुझ्यासाठी
वंदे मातरम

बेलगाम शुक्रजंतूंच्या फौजा
निर्वासितांच्या लोंढ्यांसारख्या
अखिल करूणेनं तू घेतेस सामावून
तुझ्या ओटीपोटात
आणि तुझ्या योनीमार्गावर
सनातन पहारे बसवून
श्रीमंत राष्ट्रांच्या फौजांसारखी
त्यांची दबावयुक्त घुसखोरी
कुठल्याही नवीन भौगोलिक सीमा भेदून
हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कट कारस्थान
तुझ्या लक्षात कसं येत नाही माझ्या प्रिय मैत्रीणी

विसर तुझी काया, विसर तुझी माया,
विसर तू होतीस शतकानुशतकांची आया
तू किती सहज चुलीत घातलेस
तुझ्या जवळचे होते नव्हते आरडीएक्स
तू साक्षात ह्यूमन बाँब
सती म्हणून चितेवर चढत होतीस तेव्हापासून
आता फक्त एक कर
जळत्या अंगानिशी उडी बाहेर मार
लग्न आडवं आलं त्याला मिठी मार
कुटुंब आडवं आलं त्याला मिठी मार
संस्कृती आडवी आली तर तिला मिठी मार
आता आग बाहेर येवू दे
आगीला शरण जाऊ नको
आगीवर हो स्वार
माझ्या प्रिय मैत्रीणी
एकवार तरी आवाज चढवून म्हण
भाड मे गया तेरा चूल्हा,
भाड मे गयी तेरी संतान
मै तो चली, जिधर चले रस्ता

मी किती अधिरतेने वाट पाहतोय
तू करणाऱ्या स्फोटाची
ऊत्तुंग इमारतीसारखे
पुरूषी लिंग गंड नामशेष होताना
उडणाऱ्या धुरळ्यातही
मी जीवाचे कान करून ऐकत राहीन
तुझ्या विजयी टापांचे आवाज
यातूनही जमलंच तर
पुरूषी साम्राज्य जळताना
निरो व्हायला आवडेल मला
मी फिडेलेवर तुझ्या मुक्तीचे गाणे वाजवीन

नीरो, साम्राज्य, फिडेल
सगळ्याच कंसेप्ट बदलत जातानाची
धुंवाधार बारीश
किती आतुरतेने मी वाट पाहतो आहे
माझ्या प्रिय मैत्रीणी
एका टोटल डिझास्टरची
तुझ्याकडून...


----- संजय पवार 

दाग अच्छे है.. 'अन्ना' है ना!

पुल मागे एकदा म्हणाले होते, ''पुढे होऊन वाकून पाया पडावे असे पायच हल्ली दिसत नाहीत!'' आज पुल नाहीत. पण असते तर, पुढे होऊन वाकून पाया पडणाऱ्यांची फलटण त्यांना दिसली असती. त्यात सध्याच्या निवडणुकीच्या हंगामात तर अशा अडल्या हरींची संख्या कितीतरी!
स्मरणरंजनावरच आपलं संपूर्ण साहित्य निर्माण करणाऱ्या पुलंना नव्याचं कौतुक होतं; पण जुन्याचा गहिवर जरा जास्तच होता. त्यामुळे त्यांना वाकून नमस्कार करण्यायोग्य पाय अस्तंगत होत चालल्याचं दु:खं होणं स्वाभाविक होतं.
जगरहाटी नावाची गोष्ट ना पुलंसाठी थांबत, ना नमस्कारयोग्य पायांसाठी. ती आपले नवनवे पर्याय तयार करीत असते. तसं नसतं तर प. बंगालच्या मुख्यमंत्री आधुनिक दुर्गावतार ममता बॅनर्जी यांना १२० कोटींच्या भारतात राळेगणसिद्धी नामक ग्रामे वसतीस असलेल्या अण्णा हजारेंचे पाय दिसलेच नसते! आज प्रत्येक राजकीय पक्ष, त्यांचे पक्षप्रमुख नव्या-जुन्या भिडूच्या शोधात असताना ममतादीदीने शोधले अण्णा हजारे!
अण्णा हजारे हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. हल्ली असा एकही पुरस्कार नसेल- जो अण्णांना मिळाला नसेल. मध्यंतरी राळेगणच्या ग्रामस्थांनी अण्णांच्या उपस्थितीतच त्यांना 'महात्मा' पदवी द्यावी असा प्रस्ताव मांडला होता. अण्णा आता थेट महात्माच होणार म्हणून सरकारने त्यांना 'भारतरत्न' वगैरे देऊन अपमान करू नये यास्तव तसा प्रस्तावच तयार केला नाही. त्यातली दुसरी अडचण अशी की, सगळे राजकारणी, पक्ष, सरकारे चोर, लुटेरे, भ्रष्टाचारी असल्याने अगदी राष्ट्रपतींच्या हस्तेही 'भारतरत्न' स्वीकारायला त्यांनी नकार दिला असता. मग प्रोटोकॉलप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अण्णांचं मन वळवायला गेले असते. तेव्हा मग अण्णांनी ''भारतरत्न' स्वीकारेन; पण मला मंजूर अशा लोकपालाकडून!' अशी मागणी केली असती! एका व्यक्तीला 'भारतरत्न' देण्यासाठी लोकपाल नियुक्त करणं सरकारला परवडलं नसतं. त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला.
असं म्हणतात- एकदा तोंडाला 'मेकअप' लावला, की मरेपर्यंत त्याला रंगभूमी खुणावत राहते. एकदा का त्या रंगाची चटक म्हणा, नशा म्हणा- लागली, की ती सुटता सुटत नाही. ती आतून धडका मारतच राहते. तसं हल्ली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना वर्तमानपत्रांच्या मथळ्यांत किंवा न्यूज चॅनेलच्या 'बाइट'मध्ये राहण्याची चटक लागलीय. ही नशा चढली की मग आपल्यावरचा प्रकाशझोत जरा जरी दूर झाला, तरी त्यांची अस्वस्थता वाढते. आणि दुर्दैवाने अण्णांसारखा प्रस्तावित महात्माही याला अपवाद नाही!
राळेगणसिद्धी नामक गावात अण्णांनी ग्रामस्थांच्या मदतीने गावात स्वावलंबन आणि सरकारी योजना यांचा समन्वय करून राळेगणला आदर्श गाव केले. अण्णांचा हा प्रयोग कर्णोपकर्णी झाला. अनेक सरपंच, ग्रामस्थ यांनी भेटी देऊन हा प्रयोग आपापल्या गावी केला. अण्णांच्या आधीही असे प्रयोग अनेकांनी केले. अनेक सवरेदयी, गांधीवादी कार्यकर्त्यांपासून ते नानाजी देशमुख ते प्रयोग परिवारचे दाभोळकर ते अगदी अलीकडचे हिवरे बाजारचे पोपटराव पवार, तिकडे गडचिरोली, चंद्रपुरात 'आमच्या गावात आमचे सरकार' अशी आंदोलनेही यशस्वी झालीत. थोडक्यात, 'राळेगण' हे आदर्श गाव असलं तरी ते 'एकमेव' नाही. अण्णांसारखे त्या- त्या ठिकाणी नेतृत्वही आहे, पण त्यांना प्रसिद्धीचा वारा लागलेला नाही, किंवा त्यांनी तो लावून घेतला नाही. 
अण्णांचा प्रसिद्धीशी संबंध आला तो सरकारी योजनांतून पैसा मिळवताना त्यांच्या लक्षात आलेल्या त्या- त्या खात्यातील भ्रष्टाचारामुळे. या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आवाज उठवला आणि अण्णा रातोरात महाराष्ट्रभर पोहोचले. त्यानंतर अण्णांचे ग्रामविकासाचे ध्यासपर्व संपले आणि भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन, उपोषण करून संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेणे- याचे प्रसिद्धीपर्व सुरू झाले. यात प्रथम 'युती' सरकारचे काही मंत्री गेले, नंतर 'आघाडी' सरकारमधले काही मंत्री गेले.
भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला आव्हान देणारा कुणीतरी सच्छिल गांधीवादी पुढे आला म्हणून अण्णांना सर्व महाराष्ट्रातून पािठबा मिळू लागला. बाबा आढाव, कुमार सप्तर्षि, अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा, अविनाश धर्माधिकारी, विजय कुवळेकरांसारखे पत्रकार.. यादी मोठी होती. सडलेल्या राजकीय व्यवस्थेला जनआंदोलनाने ताळय़ावर आणता येईल, या उद्देशाने या सर्व मंडळींनी आपली पत, अनुभव, पक्ष, संघटना बाजूला ठेवून अण्णांचे नेतृत्व स्वीकारले. खरे तर यापैकी अनेकांचा जनआंदोलनांतला अनुभव, वकूब आणि समस्यांची समज, अभ्यास अण्णांपेक्षा अधिक होता. तरीही अण्णांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले होते. पण अण्णांना हा भार पेलला नाही. अण्णांना समजावणे कठीण होऊ लागले. समस्येच्या मुळाशी जाण्याऐवजी 'कर आरोप, माग राजीनामा' हे सत्र सुरू झाले. परिणामत: विचारपूर्वक आंदोलन चालवण्याचा आग्रह धरणारे हळूहळू या आंदोलनापासून दूर झाले. आणि अण्णांचे 'एकला चलो रे' हे वेगळय़ा अर्थाने चालू राहिले. परवाच्या लोकपाल आंदोलनापर्यंत ते 'हम करे सो कायदा' या प्रवृत्तीपर्यंत बदलत गेले.
हळूहळू अण्णांनी आरोप करायचे, वर्तमानपत्रांचे मथळे व्यापायचे, वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढवायचा, विरोधी पक्षांनी सरकारला घेरायचे, सरकारने प्रतिनिधी पाठवायचा, तहाची कलमे तयार केली जायची, आणि मग ल्िंाबू सरबताच्या फोटोने सगळय़ाची इतिश्री.. हा घटनाक्रम सगळय़ांनाच पाठ झाला. प्रत्येक वेळी अण्णा 'आमरण' उपोषण करायचे. मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध व्हायचे. पण गोष्टी पुढे जाण्याआधीच लिंबू सरबताची व्यवस्था व्हायची. अण्णांच्या 'आमरण उपोषणा'च्या घोषणेला ऐकून पुढे पुढे लिंबू सरबतही मनातल्या मनात म्हणत असावे- 'एक बुंद निंबू की ताकद तुम क्या जानो अन्नाजी!' 
पुढे तर असे ऐकू येऊ लागले, की अंतर्गत राजकीय कुरघोडीसाठी राजकीय नेतेच एकमेकांच्या फायली अण्णांकडे पाठवू लागलेत. आणि मग अण्णाही आली फाइल, की घे पत्रकार परिषद, कर आरोप आणि बसा उपोषणाला.. अशा सिलॅबसप्रमाणे आंदोलन करू लागले. या उतावळेपणातून बबनराव घोलपांसारख्या नेत्याने अण्णांना अब्रुनुकसानीच्या आरोपाखाली कोर्टात खेचून थेट 'जेल'चा रस्ता दाखवला. तर सुरेश जैन यांच्या विरोधात अण्णांनी तक्रार केल्यावर जैन यांनी अण्णांच्याच संस्थांतील गैरकारभार पुराव्यानिशी बाहेर काढला. अण्णांनी ते थोडे कार्यकर्त्यांवर, तर थोडे 'अनियमितता' असे म्हणून आपले अंग काढून घेतले. त्यातून एक समीकरण तयार झाले : अण्णांकडून काही गफलत झाली तर ती 'अनियमितता', पण राजकारण्यांकडून झाली तर 'भ्रष्टाचार'! 


या सर्व प्रवासामुळे अण्णांची धार कमी झाली. ते पहिल्या पानावरून आतल्या पानावर गेले. पण अण्णांचा हा प्रसिद्धी वनवास फार काळ लांबला नाही. कोणी एक केजरीवाल किरण बेदी वगैरेंसह अण्णांकडे आले. केवळ महाराष्ट्र नव्हे, तर भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर सशक्त लोकपाल हवा, त्यासाठी जनआंदोलन हवे. पण ते यादवबाबा मंदिरात नाही, तर दिल्लीत जंतरमंतरवर. महाराष्ट्राऐवजी भारत भ्रष्टाचारमुक्त- तेही लोकपालने. आणि तो लोकपाल आणायला लावायचा आपण! या नव्या मुलांमुळे अण्णा उत्साहात आले. पुढचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. त्या काळात अण्णा म्हणजे महात्मा गांधी, केजरीवाल म्हणजे महादेवभाई व किरण बेदी म्हणजे मीराबेन असेच चित्र उभे राहिले होते. राजकारण्यांना शेलक्या शब्दांत हिणवले जात होते. राजकारण, राजकीय पक्ष यांना क्रूर खलनायक ठरवून त्यांचा खातमा करायचाच, असा आवेश होता. अण्णांचे उपोषण व इतर नेते व कार्यकर्त्यांसाठी अखंड 'रसोई'- असे हे अभूतपूर्व आंदोलन होते. पुढे केजरीवालांनी सरकारला भरायचे राहिलेले पैसे भरून स्वत:ची 'अनियमितता' दूर केली. तर किरण बेदींनी हवाई भाडे घेऊन रेल्वेप्रवास केल्याच्या दु:खद प्रवासवर्णनांचा खुलासाही केला. 
पुढे अण्णांना मुंबई फ्लॉप शो मार्गे राळेगणला पाठवून केजरीवाल आम आदमी पार्टी स्थापून भारतीय राजकारणातले डावीकडून तिसरे झाले. किरण बेदी केजरीवालांना सोडून अण्णांना धरून होत्या. शेवटी त्यांचाही धीर सुटून त्या मोदीप्रणीत भाजपात सामील होण्याचे संकेत देत आहेत. अशा पद्धतीने हे 'पोस्ट मॉडर्न गांधीपर्व' संपले. 
पण असे म्हणतात, गांधींना कितीही मारा, ते मरत नाहीत. तसं झालं, आणि ममता बॅॅनर्जीनी अण्णांच्या अठरा कलमांना मान्यता दिली. ममता या केजरीवालांच्या स्त्री-अवतार आहेत. फक्त त्या केजरीवालांसारखं डोईवरून मफलर घेत खोकत बोलत नाहीत. पण मुख्यमंत्री असताना पोलीस स्टेशनात जाणे, कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात मारून पुन्हा त्याला जवळ घेणे, भाववाढ केली म्हणून केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेणे, टाटांना पिटाळून लावणे, तृणमूल कार्यकर्त्यांची दहशत पसरवणे, बंगला- गाडी न वापरणे- असे अनेक 'केजरीवाल डीएनए' त्यांच्यात त्या काँग्रेसमध्ये होत्या तेव्हापासून आहेत. 
अण्णांच्या लक्षात आले, ममता तर केजरीवाल पर्वाची जननी आहे. पुन्हा ती साधी, सरळ, निरलस आणि मुख्य म्हणजे पंतप्रधानपदाला योग्य उमेदवार आहे! तिबेटमध्ये 'लामा'ची निवड करायचे संकेत मिळतात, मग त्या संकेतानुसार त्या मुलाचा शोध घेतला जातो व पुढे त्याला विधीवत 'लामा' केले जाते. हे तिबेटी संकेतज्ञान यादवबाबा मंदिरात अण्णांना प्राप्त झाले असावे. आणि देशाचा पंतप्रधान शोधत ते थेट प. बंगालमध्ये पोहोचले! ममताजींनी पण कोलकाताऐवजी भर दिल्लीच्या रस्त्यात अण्णांचे पाय धरले, आशीर्वाद घेतला. 'जो आपल्या पायाशी, त्याला घे डोक्याशी' या अण्णा-वचनाचा लगेच प्रत्यय आला आणि मोदी वि. राहुल गांधी यांच्यामध्ये 'अण्णा सर्टिफाय' ममता दाखल झाल्या! ममतांनी वेळ साधून अण्णांवर गवताची कांडी फिरवली! आता ममतांचे उत्तर भारत व पश्चिम भारतातील उमेदवार अण्णाच निवडणार. त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या कुणीही 'अण्णा-स्नाना'त सहभागी व्हावे, उमेदवारी मिळवावी, निवडणूक लढवावी. काय माहीत, तुम्ही पूर्वाश्रमीचे वाल्या कोळी असाल; पण अण्णांच्या आशीर्वादाने वाल्मीकी व्हाल. त्यामुळे 'दागी' लोकांनो, चिंता नको. व्हा पुढे, अन्ना है ना!
शेवटची सरळ रेघ : पुण्याचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना खासदार व्हायचंय. त्यासाठी कुठलाही पक्ष ते अपक्ष अशी त्यांची तयारी आहे. खासदार का व्हायचंय, याच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे- त्यांना घरांच्या किमती कमी करायच्यात! याच तत्त्वाला धरून उद्या एखादा मिठाईवाला म्हणाला की, मला मिठाईचे दर कमी करण्यासाठी साखर कारखाना काढायचाय, तर तेही आपण 'गोड' मानून घ्यायला हवे!