Thursday, 16 January 2025

आपला मेंदू खरंच क्षमता गमावत चालला आहे का?

 


आपला मेंदू खरंच क्षमता गमावत चालला आहे का?

ब्रेन रॉट’ केवळ संकल्पना नाही. ते आज जवळपास सर्वांचेच वास्तव झाले आहे. असे का आणि मेंदू सुस्थितीत ठेवण्यासाठी काय करता येईल, याविषयी...

Written by अक्षय शेळके

Loksatta January 7, 2025 09:26 IST

 

ब्रेन रॉट हा शब्द आजकाल समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक आणि बौद्धिक नुकसान सूचित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो.

ब्रेन रॉट’ हा २०२४ या वर्षाचा ‘ऑक्सफर्ड वर्ड ऑफ दि इयर’ म्हणून घोषित करण्यात आला. आजच्या या डिजिटल युगात, आपण सर्वच ऑनलाइन माहितीचा वापर करत आहोत. समाजमाध्यमे, वेबसाईट आणि इतर ऑनलाईन माध्यमांवरून आपण असंख्य प्रकारची माहिती पाहतो, वाचतो, कित्येक तास रील्स पाहत बसतो. आणि या सर्व आपण पाहत असलेल्या माहितीमध्ये खूप कमी अशी माहिती असते जी आपल्या उपयोगाची असते आणि इतर माहिती अतिशय कमी दर्जाची आणि चुकीची असते किंवा आपला वेळ वाया घालवणारी असते.

ब्रेन रॉट म्हणजे नक्की काय ?

ब्रेन रॉट हा एक अनौपचारिक शब्द आहे. कमी दर्जाची माहिती मोबाईलवर पाहणे, वाचणे किंवा तासंतास रील्स स्क्रोल करणे, टीव्ही वरील अर्थहीन बातम्या पाहणे यामुळे आपल्या मेंदूचे नुकसान होते. यामुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

 

ब्रेन रॉट शब्दाचा इतिहास

 

ब्रेन रॉट हा शब्द आजकाल समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक आणि बौद्धिक नुकसान सूचित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. पण हा शब्द नवीन नाही. या शब्दचा वापर पहिल्यांदा १८५४ मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांनी आपल्या “वॉल्डन” या पुस्तकात केला होता. त्यांनी या शब्दाचा वापर बौद्धिक प्रयत्नांमध्ये घट होण्याच्या संदर्भात केला होता. त्यांच्या काळात, या शब्दाला अधिक व्यापक अर्थ होता आणि तो आजच्या अर्थापेक्षा थोडा वेगळा होता.

 

आधुनिक वापरामध्ये आजकाल हा शब्द विशेषतः समाजमाध्यमे आणि मोबाइलच्या अतिवापराशी संबधित आहे. जेव्हा आपण तासंतास निरर्थक व्हिडीओ पाहतो, स्क्रोल करत राहतो, एकसारख्या आणि कमी कालावधीचे व्हिडीओ पाहतो, तेव्हा आपला मेंदू विचार करण्याची क्षमता गमावू लागतो. आजच्या काळात समाजमाध्यमे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाली आहेत. परंतु त्यांचा अतिवापर आपल्या मानसिक आरोग्याला धोकादायक ठरत आहे. जी कामे करणे महत्त्वाचे असते, त्यांचा विसर पडल्यासारखे होते. समाजमाध्यमांवरील निरर्थक व्हिडीओ, फेक न्यूज, आणि सतत बदलणारी माहिती आपल्या मेंदूला गोंधळात टाकते आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, यालाच ब्रेन रॉट म्हणतात.

 

ब्रेन रॉट का धोकादायक आहे ?

(१) निर्णय घेण्याची क्षमता कमी होते

निर्णय घेण्याची क्षमता कमी होण्याची काही करणे आहेत.

माहितीचा भडीमार – समाजमाध्यमे आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यावर सतत नवीन माहितीचा भडीमार होत असतो. यामुळे आपल्या मेंदूला कोणती माहिती महत्वाची आहे आणि कोणती महत्वाची नाही हे ओळखण्यात अडचणी येतात.

 

लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते – युट्युब आणि इन्सटाग्रामवरील कमी कालावधीच्या व्हिडीओ आणि रील्स पाहून आपल्या मेंदूची एका विषयावर लक्ष केंद्रित करण्याची सवय कमी होते. त्यानुळे आपण एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही.

 

विश्लेषण करण्याची क्षमता कमी होते – एकाच प्रकारच्या गोष्टीची माहिती आपल्याला अनेक ठिकाणावरून वेगवेगळ्या प्रकारे मिळाल्यावर आपल्या मेंदूला त्या माहितीचे विश्लेषण करणे कठीण जाते. त्यामुळे आपण फक्त वरवरची माहिती पाहतो आणि त्यावरून निर्णय घेतो.

 

भावनिक निर्णय – आपण सत्य माहितीऐवजी भावनिक होऊन निर्णय घेतो. आपल्याला कोणता निर्णय योग्य आहे हे समजत नाही.

 

(२) सत्य आणि असत्य यातील फरक ओळखणे कठीण होते –

सत्य- असत्य ओळखण्यात अडथळा – मेंदूवर सतत नवनवीन माहितीचा भडीमार होत असतो. यामुळे आपल्या मेंदूला योग्य माहिती कोणती हे ओळखण्यात अडचण येते, यामुळे अनेकदा आपला मेंदू चुकीच्या माहितीला सत्य समजू लागतो.

 

स्रोताची विश्वासार्हता – अनेक वेळा समाजमाध्यमांवर चुकीची माहिती पसरवली जाते आणि आपण त्या माहितीची सत्यता न पडताळताच ती माहिती सत्य मानून पुढे पाठवतो. आपण अशी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो जी आपल्या पूर्वग्रहाला बळकटी देईल, यामुळे सत्य माहितीकडे दुर्लक्ष होते.

 

फेक न्युज – समाजमाध्यमांवर फेक न्युजचा प्रसार खूप वेगाने होतो. फेक बातम्याच खऱ्या वाटू शकतात आणि आपण त्या सत्य मानून घेतो.

 

(३) मानसिक स्वास्थ्यावर परिणाम –

तणाव आणि चिंता – सततच्या अपडेट्स, लाईक्स, आणि कमेंट्सची अपेक्षा असणे तणाव आणि चिंता वाढवू शकते.

 

एकटेपणा – समाजमाध्यामांवर असंख्य मित्र असूनही, खरोखरच्या नातेसंबंधांची कमतरता जाणवू शकते.

 

नैराश्य – समाजमाध्यमांवर इतरांचे परिपूर्ण जीवन, सुंदर फोटो पाहून अनेकांना असुरक्षित वाटते आणि त्यतून नैराश्य येते.

 

निंदा, निद्रानाश, आत्महत्या – या तिन्ही गोष्टी एकमेकाशी संबधित आहेत समाजमाध्यामांवरील ट्रोलिंग आणि निंदा ही सामान्य गोष्ट बनली आहे, जी मानसिक स्वास्थ्याला अतिशय हानिकारक आहे.

 

रात्री उशीरपर्यंत मोबाइल फोनचा वापर केला तर झोपेच्या चक्रात बदल होऊ शकतो. काही अभ्यासकांच्या मते समाजमाध्यमांवरील ट्रोलिंगमुळे लोक आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होतात.

 

ब्रेन रॉट टाळण्यासाठी उपयोजना

ब्रेन रॉट टाळण्यासाठी आपण अनेक उपययोजना करू शकतो. समाजमाध्यमांचा अतिवापर आणि निरर्थक माहिती जाणून घेणे हे ब्रेन रॉटचे मुख्य कारण आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. खालील उपायांची अंमलबजावणी करून आपण ब्रेन रॉटपासून सुरक्षित राहू शकतो.

 

डिजिटल डिटॉक्स म्हणजे वेळोवेळी डिजिटल डिव्हाईस (स्मार्टफोन, हेडफोन, स्मार्टवॉच टॅब्लेट) पासून स्वतःला दूर ठेवावे.

 

नियमित व्यायाम केल्यास मानसिक आरोग्य सुधारू शकते.

नियमित आणि पुरेशी झोप घेतल्यास मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते.

पुस्तके वाचण्यामुळे सकारात्मकता वाढते.

नवीन कौशल्ये शिकून आपल्या मेंदूला सक्रीय ठेवता येते.

मित्र- कुटुंबियाबरोबर वेळ घालवून आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेता येऊ शकते.

समाजमाध्यमांचा वापर दिवसातून काही विशिष्ट वेळेपुरता मर्यादित ठेवावा.

नकारात्मक आणि हिंसक गोष्टी पाहणे टाळावे.

इतरांच्या जीवनाशी आपली तुलना करणे बंद करावे.

समाजमाध्यमांऐवजी वास्तविक जीवनातील नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करावे.

ब्रेन रॉट टाळण्यासाठी सर्वांत महत्वाचे म्हणजे मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याला मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत असे वाटल्यास मदत मागण्यास संकोच करू नये. आपले मानसिक आरोग्य बऱ्याच प्रमाणात आपल्याच हातात असते.

akshay111shelake@gmail.com

Tuesday, 14 January 2025

तत्व विवेक: पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं लोकाभिमुखीकरण

 


मनुष्यानं स्वायत्तपणे निर्माण केलेलं ‘मानवीय शहाणपण’ बहुप्रवाही आहे; त्यादृष्टीनं पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची संकल्पनात्मक मांडणी करणारं हे नवं सदर...

Written by शरद बाविस्कर

January 6, 2025

 

‘तत्त्वज्ञानाला लवकरात लवकर लोकाभिमुख आणि लोकप्रिय केलं गेलं पाहिजे.’ – दनी दिदरो (१७५३)

वर्तमानपत्र म्हणजे दैनंदिन मानवी व्यवहाराला प्रतिबिंबित करणारा अवकाश आणि तत्त्वज्ञान म्हणजे दैनंदिन व्यवहाराशी संबंधित नसलेली, गूढ आणि अव्यवहारी समजली जाणारी गोष्ट. या प्रचलित धारणांनुसार पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची मराठीत- त्यातही, वृत्तपत्रासारख्या अवकाशात मांडणी करण्याचा प्रयत्न म्हणजे दुहेरी कसरत होय. वर्तमानपत्राची भाषा आणि तत्त्वज्ञानाची ‘दुर्बोध’ भाषा यांतील दरीसोबतच पाश्चात्त्य परंपरा आणि भारतीय परंपरेमधील ‘निषिद्ध’ मानण्यात आलेली दरीदेखील आहे. प्रस्तुत लेखमालेचं उद्दिष्ट पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची संकल्पनात्मक मांडणी करणं आहे. विषयप्रवेशाच्या निमित्तानं या लेखमालेची प्रासंगिकता अधोरेखित करताना त्या ‘दुहेरी कसरती’विषयी सविस्तर चर्चा करणं गरजेचं आहे. खरंतर, ही दुहेरी कसरत पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या एकूणच चरित्राशी आणि वाटचालीशी संबंधित आहे.

(अ) पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या संकल्पनेचं लोकाभिमुख स्थित्यंतर :

मध्ययुगीन युरोपात एकंदर लोकसंख्येपैकी मोजक्याच लोकांच्या समूहाला ‘समाज’ या संकल्पनेचा दर्जा होता. मात्र १५व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १६व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये रनेसाँरूपी आधुनिकतेची पहाट होते. रनेसाँच्या दीर्घ प्रक्रियेत ‘मानव’ आणि ‘समाज’ या संकल्पनांत मूलभूत स्थित्यंतर घडून येतं. आधुनिकतेच्या प्रक्रियेत बंदिस्त, संकीर्ण समाजाच्या संकल्पनेचं विघटन होऊन त्याजागी सर्वसमावेशक समाजाच्या संकल्पनेचा उदय होतो. या आधुनिक समाजाच्या निर्मितीची पूर्वअट म्हणजे सार्वजनिक अवकाशाची निर्मिती, जिथं आधुनिक मूल्यांच्या आधारे ‘खासगी’ माणसांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडते. युरोपात कुटुंबसंस्था, धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांच्या प्रभावापासून लांब वर्तमानपत्रं, नियतकालिके, पॅम्फ्लेट, क्लब, कॅफे, सालों आणि विविध विषयांना वाहिलेल्या अकादमी इत्यादींच्या मदतीनं सार्वजनिक अवकाशाची निर्मिती आणि विस्तार होतो; त्यातून आधुनिक चर्चाविश्व उदयास येतं. विविध क्षेत्रांतला ज्ञानव्यवहार आणि त्यांची समग्रपणे मांडणी करू पाहणारी तत्त्वज्ञानं मोजक्या लोकांपुरती न राहता सार्वजनिक अवकाशात प्रवेशतात. लोकशाहीकरणाच्या या दीर्घ प्रक्रियेत तत्त्वज्ञान हे फक्त मोजक्यांनाच शक्य आणि मोजक्यांसाठीची गोष्ट राहिली नसून सगळ्यांना शक्य आणि सगळ्यांसाठी आवश्यक असं मूलभूत साधन आणि साध्य म्हणून मांडलं जातं. खरंतर सार्वजनिक अवकाशातील चर्चाविश्वात वर्तमानपत्रं, पॅम्फ्लेट्स, नियतकालिकं आदी माध्यमांनी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. तत्त्वज्ञानातले महत्त्वाचे प्रश्न वर्तमानपत्रासारख्या अवकाशात साध्यासोप्या भाषेत चर्चिले गेले. उदा.- ‘प्रबोधन म्हणजे काय?’ हा ऐतिहासिक निबंध इमॅन्युएल कांटनं (१७२४- १८०४) वर्तमानपत्रीय शैलीत लिहिला आहे. ‘माणसांमधील विषमतेच्या मुळांची कारणमीमांसा करणारं संभाषित’ हा निबंध रूसोनंही (१७१२- १७७८) वर्तमानपत्रीय शैलीतच लिहिला; त्याची प्रखर चर्चा तत्कालीन सार्वजनिक अवकाशात झालेली दिसते. थोडक्यात, तत्त्वज्ञानाची भाषा आणि वर्तमानपत्राची भाषा यांतला भेद कमी करण्याची कसरत आधुनिकतेच्या प्रक्रियेत मध्यवर्ती राहिली आहे.

 

(ब) फिलॉसफी शब्दाच्या अर्थछटा :

पाश्चात्त्य तत्त्वज्ञान मराठीत अभिव्यक्त करताना येणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पाश्चात्त्य संकल्पनांसाठी मराठीत समाधानकारक शब्द शोधणं. उदाहरणार्थ, फिलॉसफी शब्दासाठी मराठीत तत्त्वज्ञान हा शब्द रूढार्थाने वापरला जातो. पण वास्तवात हे दोन शब्द वेगवेगळ्या गोष्टी सूचित करतात. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक मे. पुं. रेगेंच्या मते प्राचीन भारतीय परंपरेत चतुर्विध पुरुषार्थी तात्त्विक परंपरांसाठी ‘दर्शनशास्त्र’ हा शब्द वापरला जात असे. या ‘चपखल’ शब्दाऐवजी तत्त्वज्ञान हा मराठी शब्द रेगेंच्या दृष्टीने असमाधानकारक आहे, कारण हा शब्द प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेशी फारकत घेऊन आधुनिक महाराष्ट्रातील विचारविश्वात काहीतरी नवीन मांडू पाहात आहे.

दुसऱ्या बाजूला, दर्शनशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे शब्द फिलॉसफी या शब्दाची ऐतिहासिक वाटचाल आणि त्यातून येणारा गर्भितार्थ पुरेसा सूचित करत नाहीत. फिलॉसफी हा शब्द ‘फिलिया’ आणि ‘सोफिया’ या दोन ग्रीक शब्दांनी बनलेला आहे. ‘फिलिया’त प्रेम, मैत्री, आनंद, लालसा अशा अर्थछटा दडलेल्या आहेत आणि ‘सोफिया’चा अर्थ ज्ञान, शहाणपण असा होतो. त्याअर्थी फिलॉसफी म्हणजे ज्ञानाशी मैत्री आणि ज्ञानावर प्रेम करणं. फिलॉसफी शब्दातच मैत्री, प्रेम, आनंद, लालसा सारख्या मानवी भावनांचा अंतर्भाव करून सॉक्रेटिस आणि प्लेटोसारख्या प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी धर्मशास्त्र आणि मिथकशास्त्रांपासून निर्णायकपणे फारकत घेऊन, फिलॉसफीला स्वायत्तता आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फिलॉसफी या शब्दातच ज्ञान प्रक्रियेला आकाशातून जमिनीवर आणण्याचा प्रयत्नही अभिप्रेत आहे. प्लेटो ‘सिंपोझिअम’ मध्ये लिहितो, ‘No God philosophizes or desires to be wise; for he is.’

 

सॉक्रटिसला तर ईश्वरनिंदा आणि तरुणांना नीतिभ्रष्ट करण्याच्या आरोपाखाली हेमलॉक प्राशन करून देहदंडाची शिक्षा भोगावी लागली. त्याचा शिष्य प्लेटोनं होमरवर अर्थात मिथकशास्त्रांवर प्रखर टीका करून एकूणच मिथकशास्त्रीय आकलनाला ज्ञानाचा दर्जा नाकारला. प्लेटो लिखित ‘अपॉलजी’ या संवादात फिलॉसफी म्हणजे मनुष्याने स्वायत्तपणे निर्माण केलेलं आणि मनुष्याचं माणूसपण अधोरेखित करणारं ‘मानवीय शहाणपण’ होय.

हेदेखील तितकंच खरं की, मध्ययुगाच्या सुरुवातीलाच फिलॉसफी शब्दातील मानवतावादी अर्थछटा मिटवून, फिलॉसफीला कॅथोलिक चर्चची- अर्थात धर्मशास्त्राची- अंकित बनविण्यात येतं. त्यामुळे प्राचीन काळातील मिळवलेली स्वायत्तता फिलॉसफी गमावून बसते. नंतर तब्बल हजार वर्षांनी म्हणजे पंधराव्या शतकात रनेसाँच्या अर्थात पाश्चात्त्य आधुनिकतेच्या दीर्घ पहाटेत फिलॉसफीला आपला हरवलेला मानवतावादी चेहरा आणि स्वायत्तता परत मिळते.

(क) तत्त्वपरंपरेतील आदानप्रदानाच्या शक्यता :

कालौघात वैचारिक पंरपरांमध्ये स्थित्यंतरं, संवाद, विसंवाद होताना दिसून येतात. कुठलीही परंपरा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बंदिस्त, एकजिनसी, अपरिवर्तनीय आणि ‘शुद्ध’ नसते. ‘शुद्ध’ परंपरांच्या अस्तित्वाला इतिहासात आधार सापडत नाही- राजकीय, धार्मिक कथानकं आणि मिथकं मात्र जरूर सापडतात; जे तत्त्वज्ञानाच्या कुतूहलाचे आणि विश्लेषणाचे विषय आहेत. कुतूहल आणि विस्मय तत्त्वज्ञानाच्या प्रेरकशक्ती, तर कर्मठ आणि हटवादी पूर्वग्रह मारकशक्ती समजल्या जातात. कुठल्याही दोन वैचारिक परंपरांत फरक असतोच जो ‘इतरत्वा’चा निर्देशक समजला जातो. तसं पाहता कुठलीही परंपरा स्वत: एकजिनसी नसल्यानं तिच्याआतही इतरत्व दडलेलं असतं, जे राजकीय कथानकं सपाट करू पाहतात. किंवा स्वत:त दडलेल्या इतरत्वाच्या आधारे विषम समाजाची निर्मिती आणि दृढीकरण करताना दिसतात. म्हणून इतरत्व फक्त तटस्थ ज्ञानप्रक्रियेचा विषय नसून अर्थकारण आणि राजकारणासारख्या गतिशील सत्तासंबंधाचा आधारही असतं.

तत्त्वज्ञानासारख्या क्षेत्रातील अनुवादाच्या शक्यतांच्या संदर्भात फ्रेंच तत्त्वज्ञ बार्बरा कासांने ‘In Praise of Translation’ या पुस्तकात तीन भिन्न दृष्टिकोनांची चर्चा केली आहे. बार्बारा कासां लिहिते की पहिल्या दृष्टिकोनानुसार प्रत्येक परंपरा आणि भाषा एकामेवाद्वितीय असल्याने भाषिक शुद्धता आणि पावित्र्य भाषांतरित होऊच शकत नाही. हा दृष्टिकोन सत्ताशास्त्रीय देशीवादाचं द्याोतक समजला जातो. पुढे कासां नमूद करते की जर्मन फासीवादाची पाळंमुळंदेखील अशा बंदिस्त/ ताठर तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोनात आहेत. असाच ताठर, कर्मठ दृष्टिकोन मूलतत्त्ववादी धर्मांध, आत्मसंतुष्ट आणि वर्चस्ववादी मानसिकतेला खतपाणी घालत असतो. या दृष्टिकोनाच्या दुसऱ्या टोकाला साम्राज्यवादी ‘मेल्टिंग पॉट’ दृष्टिकोन आढळून येतो ज्यानुसार फक्त साम्राज्यवादी भाषा, संस्कृती, परंपरांकडे इतर संस्कृती, भाषा आणि लहानमोठ्या परंपरा सामावून घेण्याची म्हणजेच भस्म करण्याची ‘ईश्वरदत्त’ क्षमता आणि ‘नैतिक’ अधिकार असतो. या दृष्टिकोनानुसार पाश्चात्त्य ज्ञान-परंपरेला ऐतिहासिक भान, दिशा आणि गती असल्यानं जगाचं नेतृत्व करण्याचा आणि जगाला वाचवण्याचा नैतिक अधिकार पाश्चात्त्य परंपरेकडे (उदा.- आजच्या संदर्भात अमेरिकेकडे) आहे.

पण तिसरा दृष्टिकोन असा की, प्रत्येक भाषेत इतर कुठल्याही भाषेला सामावून घेण्याची अंगभूत क्षमता असते. त्यासाठी शब्दांच्या वाच्यार्थाला सर्वार्थ न मानता व्युत्पत्तीशास्त्र, कालौघात बदलत जाणारे विविध संदर्भ आणि अर्थछटांचा विचार करून त्यांचं सर्जनशीलपणे पुनर्वसन करता येतं. अशा प्रक्रियेत अनुवादकाला एकाच वेळी विचारवंत आणि सर्जनशील लेखक अशीही तिहेरी भूमिका पार पाडावी लागते. या दृष्टिकोनाचा अवलंब करून बार्बरा कासांच्या मार्गदर्शनाखाली ‘डिक्शनरी ऑफ अनट्रान्स्लेटेबल्स : अ फिलॉसॉफिकल लेक्सिकॉन’ सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला. खरंतर, या तिसऱ्या चौकटीशी युरोपचा संबंध रेनेसाँपासूनचाच.

‘रेनेसाँ’ या ऐतिहासिक प्रक्रियेचं श्रेय अशी तिहेरी भूमिका बजावणाऱ्या तत्कालीन विचारवंत-लेखक- अनुवादकांना जातं, ज्यांनी रेनेसाँच्या सुरुवातीच्या टप्प्यात (१५ वं शतक) आत्मविश्वास निर्माण केला की, कुठल्याही जिवंत भाषेत इतर कुठल्याही वैचारिक परंपरांना अभिव्यक्त करता येतं.प्राचीन हिब्रू आणि ग्रीक, रोमन परंपरांतल्या संहिता इटालियन, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन यांसारख्या जनसामान्यांच्या भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्या रेनेसाँच्या या आद्या मानवतावादी विचारवंत-लेखक-अनुवादकांमुळे पंधराव्या शतकात युरोपीय समाजातल्या ‘मध्ययुगा’चा शेवट होऊन आधुनिकतेच्या दीर्घ पहाटेची सुरुवात होते.

(चित्रअंश: डेथ ऑफ सॉक्रेटिस : जॅकलुई डेव्हिड, १७८७) 

तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…

 


या पूर्वप्राप्त निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित तपशिलांनी ओतप्रोत भरलेल्या अवस्थेत प्रत्येक व्यक्तीचा प्रवेश एखाद्या आगंतुकासारखा होत असतो.

Written by शरद बाविस्कर

आपल्या चहूबाजूंना असलेल्या दृश्य तपशिलांच्या वेढ्याला तत्त्वज्ञानाच्या भाषेत ‘पूर्वप्राप्त मानवी अवस्था’ म्हणतात. या पूर्वप्राप्त निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित तपशिलांनी ओतप्रोत भरलेल्या अवस्थेत प्रत्येक व्यक्तीचा प्रवेश एखाद्या आगंतुकासारखा होत असतो. दृश्य तपशील स्वत:च्या अर्थाची पाटी घेऊन उभे नसतात. त्यांचा सतत प्रयत्नपूर्वक अर्थ लावावा लागतो. काही ज्ञानपरंपरा या दृश्य तपशिलांचा अदृश्य अर्थ शोधण्यासाठी आकाशाकडे झेप घेऊन आकाशापलीकडे जातात तर काही तपशिलांच्या मुळाशी जाऊन तळ गाठतात. मात्र पाश्चात्त्य ज्ञान परंपरेतील या दोन परस्परविरोधी प्रवाहांची प्राप्त मानवी अवस्थेविषयी किमान एकवाक्यता आहे. ती अशी की, प्राप्त मानवी अवस्थेतील दृश्य तपशिलांमध्ये आगंतुकपणा विखुरलेपण, खंडितपणा, विरोधाभास, क्षणभंगुरता, अपुरेपणा, सापेक्षता, अनिश्चितता, चंचलता आहे. त्यामुळे प्राप्त मानवी अवस्थेचं वर्णन करताना पाश्चात्त्य परंपरेत अभावदर्शक संकल्पनांचा वापर करण्यात आला आहे.

पूर्वप्राप्त मानवी अवस्थेचं वर्णन प्लेटोने गुहाजीवन, सेंट ऑगस्टिनने पतित जीवन, देकार्तने निराधार जीवन, पास्कलने एकाकी जीवन, रूसोने भ्रष्ट जीवन, मार्क्सने परात्म जीवन, फ्रॉइडने बेचैन जीवन, वेबरने बकाल जीवन, हायडेगरने विस्मृतीग्रस्त जीवन, सार्त्रने आगंतुक जीवन तर काम्यूने अब्सर्ड जीवन असं केलं आहे. एका प्रकारे ही अभावदर्शक संकल्पनांची शृंखला पाश्चात्त्य परंपरेतील ‘सब्बम दुख:म् ’ म्हणता येईल.

प्राप्त मानवी अवस्थेच्या आगंतुक, क्षणभंगुर, विखुरलेल्या, खंडित, विरोधाभासी, अस्पष्ट, चंचल तपशिलांची पूर्वनिर्धारित चौकटींमध्ये व्यवस्था लावलेली असते आणि अशा स्थलकाल सापेक्ष पूर्वनिर्धारित चौकटीत प्रत्येकाचा जन्म होतो. कुठल्याही प्राप्त चौकटीची तुलना इतर स्थळ आणि काळातल्या चौकटींशी करताना त्यांच्यातली सापेक्षता समोर येते. पण हा तुलनात्मक दृष्टिकोन मोजक्यांनाच लाभतो.

अ) श्रमाची कामं आणि बुद्धीची कामं यांतली दरी :

मध्ययुगीन बंदिस्त युरोपियन समाजात बुद्धीची कामं आणि श्रमाची कामं यात विभागणी करून श्रमाच्या कामांना ज्ञानाचा दर्जा नाकारलेला होता. त्यामुळे श्रमिक समाजाला- जवळपास ८० टक्के लोकांना- ज्ञानकक्षेबाहेर ढकलण्यात आलं होतं. मात्र १८ व्या शतकात प्रबोधन चळवळीच्या क्रांतिकारक वातावरणात बुद्धी आणि श्रम यांतील दरी हळूहळू कमी होत कुठलाही भेदभाव न करता समग्र मानवी व्यवहारातील प्रत्येक कला, कृती, उद्याोग, व्यवसायाला तत्त्वत: ज्ञानाचा दर्जा बहाल करण्यात आला. त्याचं ऐतिहासिक उदाहरण म्हणजे दनी दिदरो (१७१३-१७८४) या फ्रेंच विचारवंतांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला ‘एनसायक्लोपिडिया’ नावाचा महत्त्वाकांक्षी ज्ञानप्रकल्प. या ज्ञानप्रकल्पाअंतर्गत मानवी व्यवहारातील प्रत्येक पैलूंवर तज्ज्ञांकडून संशोधनात्मक नोंदी लिहून घेतल्या गेल्या.

खरंतर १८ व्या शतकापर्यंत आजच्यासारख्या अनेक ज्ञानशाखा अस्तित्वात नव्हत्या. म्हणून तुलनेनं ज्ञान क्षेत्राचा आकार लहान होता. त्याकाळी एकाच वेळी साहित्यिक, विचारवंत, वैज्ञानिक होता येत होतं. समग्र ज्ञानव्यवहार फिलॉसफी या शब्दाने ओळखला जात असे. नैसर्गिक तथ्यांचा अभ्यास नॅचरल फिलॉसफी अंतर्गत मोडत असे. उदाहरणार्थ विज्ञानात पायाभूत ठरलेल्या आयझॅक न्यूटनच्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘द मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसफी’ हे होतं. आजदेखील नैसर्गिक, मानवनिर्मित, मानव्य आणि सामाजिक तथ्यांच्या तळाशी जाऊन केलेला सखोल अभ्यास फिलॉसफी अंतर्गतच मोडत असतो. त्यामुळे ज्ञान क्षेत्रातील सगळ्या विषयांमधील सर्वोच्च पदवीला पीएचडी म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसफी म्हटलं जातं. खरंतर, डॉक्टर हा शब्द लॅटिन क्रियापद docere पासून बनलेला आहे. डॉक्टर शब्दाचा मूळ अर्थ शिक्षक होतो. आणि डॉक्टर ऑफ फिलॉसफी म्हणजे असा शिक्षक ज्याने त्याचा विषय मुळापासून अभ्यासलेला असतो.

ब) इंद्रियगम्य तपशील आणि बुद्धिगम्य ज्ञान यांतली दरी :

वरच्या विवेचनात श्रम आणि बुद्धीला विभागणाऱ्या मध्ययुगीन दरीसोबतच मानवी व्यवहारातील असंख्य तपशील आणि त्या दृश्य तपशिलांना अदृश्य तळापासून वेगळी करणारी आधुनिक दरी, अशा दोन दऱ्यांचा निर्देश करण्यात आला आहे. या दोन्ही दऱ्यांची चर्चा तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेतर यात अस्तित्वात असलेल्या दऱ्यांचं स्वरूप समजण्यासाठी महत्त्वाची आहे. खरं तर आजचे स्वयंघोषित तत्त्वज्ञ एका प्रकारे बुद्धी आणि श्रम या मध्ययुगीन दरीचाच वारसा चालवताना आढळतात. वास्तवात, प्रत्येक माणूस तत्त्वज्ञ असतो. तत्त्वज्ञेतर असं कुणी नसतं. फरक एवढाच की स्वयंघोषित तत्त्वज्ञेतर त्यांच्या खासगी तत्त्वज्ञानाची मांडणी करताना तपशिलांची वरकरणी व्यवस्था लावतात. आपापल्या परीनं वैयक्तिक पातळीवर समग्रतेचे आडाखे बांधत असतात. मात्र तपशिलांची व्यवस्था लावताना अपरिहार्यपणे कळत-नकळतपणे अशा नियामक तत्त्वांचा आणि संदर्भबिंदूंचा वापर करतात, जे खासगी नसतात. फ्रेंच तत्त्वज्ञ लुई अल्तुसर म्हणतो की, तत्त्वज्ञानातील वैचारिक झटापटी समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञेतरांच्या अबोध तत्त्वज्ञानाचा सामूहिक संदर्भबिंदू किंवा नियामक तत्त्वांचा शोध घेणं आवश्यक आहे. तत्त्वज्ञानाचे संदर्भबिंदू सरकले किंवा बदलले तर पूर्ण चौकटच हलते किंवा बदलते. तत्त्वज्ञान हे एकार्थाने गृहीत धरलेल्या संदर्भबिंदूंचा शोध, अभ्यास आणि पडताळणी असते.

बहुसंख्य लोकांना पूर्वप्राप्त चौकटीतच आपापल्या परीनं जीवनातील विखुरलेल्या तपशिलांची व्यवस्था लावावी लागते. तपशिलांच्या तळाशी असणारं नियामक तत्त्व मात्र त्यांच्यासाठी एखाद्या खोल डोहाच्या तळासारखं अदृश्य राहतं. त्याचं स्वरूप आणि अर्थ न उमगल्यास, तपशिलांच्या वरकरणी व्यवस्थापनेत केवळ यांत्रिकपणा उरतो. प्रत्येक तत्त्वज्ञेतराला अधूनमधून जगण्यातील यांत्रिकपणाची निरर्थकता जाणवतदेखील असते. पण प्रयत्नपूर्वक सवयींचा यांत्रिकपणा टिकवून ठेवला जातो. केव्हातरी जाणीव होते की आपण केवळ एक यंत्र नसून त्यापलीकडे जाऊन काहीतरी आहोत. तेव्हा मात्र जगण्यातल्या निरर्थक यांत्रिकपणाचा थकवा येतो. आणि नियमित सवयींचा यांत्रिकपणा खंडित होऊन एक फट निर्माण होते. जिथून वास्तव डोळे वटारून पाहतं. त्या विस्मृतीतल्या वास्तवाविषयी विचार करण्याची सवय नसल्यानं खिंडीत सापडल्यागत अवस्था होते.

मग अस्तित्वावादी प्रश्न पडतात. ‘हे सगळं कशासाठी? अशा निरर्थक यंत्राप्रमाणे जगण्याला काही अर्थ आहे काय ?’ आल्बेर काम्यू म्हणतो की, ‘अशी खिंडीत सापडल्यागत मन:स्थिती आणि प्राप्त मानवी अवस्थेच्या अपुरेपणाची आणि विखुरलेपणाची भावना केवळ तत्त्ववेत्त्यांच्या ठायी नसून ती वैश्विक भावना आहे.’ ही भावना कुणाचाही पिच्छा सोडत नसते. म्हणून या भावनेच्या बाबतीत तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेतर असा भेद करता येत नाही.

क) माणसाचा जन्म म्हणजे अनंताला पडलेली भेग

मिथ ऑफ सिसिफस’ या तत्त्वज्ञानात्मक पुस्तकात काम्यू लिहितो की, ‘एका बाजूला माणसांमध्ये समग्रतेची, पूर्णत्वेची, अनंतेची ओढ आणि भूक असते; तर दुसऱ्या बाजूला मात्र माणसं स्वत:ला नेहमी खंडित, अपूर्ण आणि सान्त अवस्थेत पाहतात. माणसाचा जन्म म्हणजे अनंताला पडलेली भेग. ही भेगच राहिली नसती किंवा या भेगेची जाणीवच नसती तर माणूस इतर आगंतुक तपशिलांपैकीच एक तपशील राहिला असता. …एकार्थाने अनंताशी एकरूप ठरला असता. सुखदु:खातीत वस्तू ठरला असता. पण या भेगेच्या स्मृती-विस्मृतीच्या ऊन-सावलीत माणूस आपलं प्राप्त जीवन जगत असतो’. एकाचवेळी ही भेग माणसाच्या दु:खाचं आणि उदात्ततेचं कारण बनलेली आहे. माणसाची ही द्विधा मन:स्थिती शेक्सपियरनं हॅम्लेटच्या ‘टु बी ऑर नॉट टु बी, दॅट्स द क्वेश्चन’ या स्वगतात व्यक्त केली आहे. शेक्सपियरचं हे प्रसिद्ध स्वगत माणसाची निसर्गातलीच एक वस्तू असण्याची क्षुल्लकता आणि सोबतच निसर्गातीत असण्याची उदात्तता अधोरेखित करतं. याच वैश्विक प्रश्नाला काम्यूनं ‘मिथ ऑफ सिसिफस’ च्या पहिल्याच पानावर तत्त्वज्ञानातील एकमेव गंभीर प्रश्न म्हटलं आहे. काम्यू लिहितो की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती, जगाच्या मिती किती आहेत… यासारख्या प्रश्नांना वळसा देत लोक हजारो वर्षे जगत आली आहेत. पण जगणं खरंच अनिवार्य आहे का, या प्रश्नाला कुणी वळसा देऊ शकत नाही. तत्त्वज्ञ असो की तत्त्वज्ञेतर; ‘जगावं की मरावं’ या प्रश्नाला काहीतरी उत्तर देणं अनिवार्य आहे. काम्यू जगण्याच्या तसंच मरण्याच्याही प्रकारांची चर्चा करतो. काहींच्या जगण्यातील उत्कटता कमी होत जाते तर काहींची वाढत जाते. काही जगण्याकडे पाठ फिरवून निवृत्तीमार्ग पत्करतात तर काही जीवनाभिमुख होऊन प्रवृत्तीमार्ग. काही या क्षणभंगुर, विरोधाभासी चंचल तपशिलांनी ओतप्रोत जीवनाला मिथ्या म्हणतात, तर काही या प्राप्त मानवी अवस्थेतच मोक्ष आहे अशी मांडणी करतात. थोडक्यात, जगताना निवडलेला कुठलाही मार्ग म्हणजे मनुष्यानं अनिवार्यपणे अनंताच्या भेगेला दिलेलं तत्त्वज्ञानात्मक उत्तर.