Sunday, 12 January 2014

बारा बाळंतपणांत बारा पोरीच - उत्तम कांबळे

 सप्तरंग, सकाळ--- रविवार, 12 जानेवारी 2014

राघू आणि तानाबाई...मावळतीकडं झुकलेलं सत्तरीतलं जोडपं...तब्बल 12 पोरींचे हे माय-बाप! एवढ्या पोरी जन्माला घालण्यामागची तानाबाईची भूमिका स्पष्ट आहे. तिचं म्हणणं - "पोरी काय; एके दिवशी नवऱ्याच्या घरी निघून जातील...मग म्हातारपणी तोंडात पाणी घालायला पोरगा नको का?' पोराच्या आशेवर तिची बाळंतपणं होत राहिली आणि पोरी जन्मत राहिल्या... तर "एवढ्या पोरी होणं ही "पांडुरंगाची कृपा' ' असं राघूचं मत! त्याचं हे मत तसं वरकरणीच...कारण, त्यालाही "वंशाचा दिवा' पाहिजेच होता...पण तसं झालं नाही...मात्र, त्याच्या पोरींनी "वंशाच्या दिव्या'ची कर्तव्यं चोख बजावली!

मो ठी कुटुंब मी पाहिली नाहीत, असं नाही. आपल्या भोवताली अनेक संयुक्त कुटुंब आजही, पडत-झडत का होईना; पण आहेत. एकाच जोडप्याला अनेक मुलं असणारी कुटुंबही मी पाहिली आहेत. पूर्वी अशा कुटुंबांचं नवल वाटायचं नाही. भरमसाट मुलं जन्माला घालण्यामागं कारणंही अनेक होती. एक - जन्माला आलेली मुलं जगण्याचा दर कमी होता. रोगराई आणि कुपोषणामुळं जन्मलेली अनेक मुलं मरायची. तसं होऊ नये व काही मुलं तरी आपल्या पदरात राहावीत म्हणूनही जास्त मुलांना जन्माला घातलं जायचं. दोन - मुलं माणूस नव्हे; तर देव देतो, अशी धारणा असल्यानं होतील तेवढी मुलं जन्माला घातली जायची. तीन - मूल म्हणजे मनुष्यबळ असतं. ते जेवढं जास्त, तेवढा कुटुंबाचा विकास. चार - वंशाचा दिवा टिकवण्यासाठी एखादा मुलगा तरी हवाच म्हणून तो जन्माला येईपर्यंत बायकांची बाळंतपणं चालू ठेवायची आणि पाच - संतती-नियमनाच्या साधनांचा अभावही असायचा. शिवाय, ती वापरणं पाप, गुन्हा मानलं जायचं. कर्वेंच्या सुनेनं पुण्यात अशा साधनाचा वापर केल्यानंतर काय घडलं, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तिच्यावर मध्ये एक चित्रपटही येऊन गेला. अनेक कारणांमुळं मुलं भरमसाट जन्माला येत होती. एकाच कुटुंबात म्हणजे एकाच मातेच्या पोटी डझनाहून अधिक मुलं जन्माला येण्याच्या घटना अलीकडच्या काळात तशा दुर्मिळच म्हणाव्या लागतील. कुटुंबनियोजन सक्तीचं आहे, ते न केल्यास वेगवेगळ्या प्रकारची शिक्षाही होते. उदाहरणार्थ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभं राहता येत नाही. काही शासकीय सवलतींना मुकावं लागतं इत्यादी... पण, याही परिस्थितीत अनेक लेकरं जन्माला घालणाऱ्या आया आहेत, वडील आहेत. एखाद्या देशाची लोकसंख्या भरमसाट झाल्यानंतर विकास होतो की देशात भकासपण वाढतं? लोकसंख्येला गुंतवणूक समजावं की वाढता तोटा समजावं? चीननं लोकसंख्येच्या जोरावरही देशाचा विकास करून दाखवला आणि भारतासारखे अनेक देश वाढत्या लोकसंख्येमुळं दारिद्य्रात फेकले गेले. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला सुंदर जगण्याची, स्वतःचा आणि देशाचा विकास घडवण्याची संधी मिळाली, तर लोकसंख्येचं रूपांतर भांडवलात होईल आणि ते नाही मिळालं तर दारिद्य्र वाढंल. अनेक प्रश्‍न लोकसंख्येशी जोडले गेले आहेत. नेमकं उत्तर कधी आणि कोण शोधून काढणार, हे कुणालाच सांगता येणार नाही. 

...तर मी सांगत होतो, एकाच कुटुंबात मोठ्या प्रमाणात असलेली भावंडं मला दोन-तीन ठिकाणी पाहायला मिळाली. मी हायस्कूलला असताना मला एक मित्र होता. त्याला 11 भाऊ आणि दोन बहिणी होत्या. देवाची देणगी आणि कुटुंब नियोजनाचा अभाव यांतून ही एवढी संतती जन्माला आली होती. दुसरं कुटुंब मला नाशिकमध्येच भेटलं होतं. मध्यंतरी मी "फिरस्ती'मध्ये लिहिलं होतं. गवंडीकाम करणाऱ्या एकाला पंचवीसेक मुलं होती. अर्थात, ती एका पत्नीपासून जन्माला आलेली नव्हती, तर आठ-नऊ पत्नींपासून जन्माला आलेली होती. आता सांगतोय ती अगदी अलीकडचीच गोष्ट. या गोष्टीतल्या या नवऱ्याला न अडखळता आपल्या पोरांची आणि बायकांची नावं सांगता आली नाहीत. प्रत्येक बाईबरोबर त्यानं कायदेशीर लग्न केलं आहे; गंधर्वविवाह वगैरे नव्हे. 

तीन डिसेंबरला मनोज बांगळे या सामाजिक जाणिवांनी भरलेल्या, प्रयोगशील आणि संवेदनशील शिक्षकाबरोबर असंच खूप मुलं असलेलं कुटुंब पाहायला निघालो होतो मावळ (जि. पुणे) तालुक्‍यातल्या भोयरे या गावी. या गावाची जत्रा होती. बहुतेक कानिफनाथाची असावी. पारावर लोककलांचा कार्यक्रम सकाळी सकाळी सुरू होता. गावातल्या प्रत्येक मुलाच्या मागं 300 रुपये याप्रमाणं वर्गणी जमा केली जाते. मुलं, महिला, म्हातारेकोतारे यांच्याकडून वर्गणी वसूल केली जात नाही. वर्गणी गोळा करण्याची प्रत्येक गावात त्यांची त्यांची म्हणून एक रीत असते. भोयरे गावात ही अशी पोरामागं 300 रुपये वसूल करण्याची रीत. 

75 वर्षांच्या राघूला शोधण्यास तसा वेळ नाही लागला. एका दगड-मातीच्या घरात भिंतीला पाठ टेकून तो खाटंवर बसला होता. खरंतर तो अलीकडंच लग्न झालेल्या आपल्या एका लेकीच्या घरी आला होता. त्याचं मूळ गाव शिरे. आदरा नदीवर बांधलेल्या धरणात त्याचं घर-दार बुडालं. भावकीत असलेली त्याची 40 एकर जमीन पाण्याखाली गेली. 13 लाख रुपयांची भरपाई मिळाली; पण तिचे तुकडे होत होत एकेकाला 90 हजार रुपये मिळाले. खूप तुटपुंजी रक्कम. शेळीच्या शेपटासारखी. माश्‍या मारता येत नाहीत आणि लाज झाकता येत नाही. तुटपुंज्या रकमेत काहीच होणार नव्हतं आणि वाढीव भरपाई या क्षणापर्यंत मिळालेली नाही. राघू आणि त्याची बायको तानाबाई (वय अंदाजे 70) यांच्या पदरात 12 पोरी होत्या. त्यातली एक मरण पावली होती. एवढ्या साऱ्या पोरी जगवायच्या कशा आणि वाढवायच्या कशा, हा खरं तर सर्वांत मोठा प्रश्‍न; पण राघूला त्याची फिकीर वाटली नसावी. त्याच्या मते ही सारी पांडुरंगाची कृपा आहे. तोच लेकरं देतो आणि तोच त्यांचा विचारही करतो. राघूनं आपले सगळे प्रश्‍न पांडुरंगाच्या खुंटीवर टांगले होते. जो चोची देतो, तोच चारा देतो, या न्यायानं तो मुली जन्माला घालत राहिला. 

एक सांगायचं राहून गेलं. तानाबाईबरोबर झालेलं हे राघूचं दुसरं लग्न. त्याची पहिली पत्नी देऊबाई. तिला एक मुलगी झाली. त्यानंतर तिचा घटस्फोट झाला. दुसऱ्या लग्नात तिला दोन मुलगे आणि एक मुलगी झाली. 

मध्येच ही माहिती देण्याचं कारण म्हणजे राघूला एकूण तेरा मुली झाल्या. देऊबाईला एक आणि तानाबाईला बारा. साऱ्या मुली पांडुरंगाच्या कृपेमुळे झाल्या असल्या, तरी एखादा तरी मुलगा व्हावा, ही भावना मात्र राघू आणि तानाबाईच्या मनात होतीच; पण मुलगा काही झाला नाही. त्याबाबतची एक खोल खंत त्यांच्या बोलण्यातून आढळून आली. राघूनं ती स्पष्ट केली नाही. भोयरेपासून दहा किलोमीटरवर असलेल्या बेलज गावी जाऊन तानाबाईची भेट घेतली. ती नवऱ्यासह मुलीच्याच घरी राहते. धरणात गाव बुडाल्यानंतर त्यांना नवं घर बांधता आलं नाही. मुलगा का असावा, याविषयी अतिशय मोकळेपणानं बोलताना तानाबाई म्हणाली ः ""असता एखादा पोरगा तर बरं झालं असतं. लग्नानंतर साऱ्या पोरी त्यांच्या त्यांच्या नवऱ्याच्या घरी जातील. म्हातारपणी तोंडात पाणी घालायला तरी एखादा पोरगा असायला हवा; पण आता नशिबातच नाही, त्याला कोण काय करणार?'' तोंडात पाणी घालायला मुलगाच पाहिजे, ही एक सनातन आशा तिच्याही काळजाला चिकटून आहे. 

राघूनं आपला प्रश्‍न पांडुरंगाच्या, तर तानाबाईनं तो नशिबाच्या खुंटीवर लटकवला. नशीब नावाची कल्पना आहे म्हणून ठीकंय; अन्यथा हे सारे प्रश्‍न लोकांनी कुठं टाकले असते? नशीब असल्यानं आता खूप सोय झाली आहे. जे काही घडतं, ते सटवीनं लिहिलेल्या नशिबानुसारच, या भावनेनं तानाबाई जगत होती. 
""वारंवार बाळंत होण्यानं त्रास नाही का झाला?'' या प्रश्‍नावर ती म्हणाली - ""का नाही होणार? माणूस म्हटल्यावर होणारच की त्रास. सुरवातीला भीती वाटायची; पण पुढं बाळंतपण अंगवळणी पडलं. दर दीड वर्षाला एक बाळंतपण, मग काही वाटंना झालं.'' 
तानाबाई एकाही बाळंतपणासाठी कोणत्या दवाखान्यात गेली नव्हती, की पूर्वी सरकारी दवाखान्यात मिळणारं लाल रंगाचं औषध तिनं घेतलं नव्हतं. कसल्याही धोक्‍याशिवाय गावातल्या सुईणीनं तिची बाळंतपणं केली होती. फक्त चोळी-बांगडीच्या मोबदल्यात... राघूचा पांडुरंगावर भरवसा होता. तो दरवर्षी वाऱ्या करायचा. तानाबाई सुईणीवर भरवसा ठेवायची आणि नशिबाबरोबर बोलत बसायची. सीता नावाची तिची एक मुलगी वयाच्या सोळाव्या वर्षी मरण पावली. विशेष म्हणजे ती सातवी-आठवीपर्यंत शिकलेली होती. पहिल्या तीन मुली वगळल्या, तर बाकी साऱ्या जणी शाळेत गेल्या. लिहायला-वाचायला शिकल्या; पण सातवी-आठवीपलीकडं त्या झेप मारू शकल्या नाहीत. लग्न आणि दारिद्य्र या दोन प्रश्‍नांनी त्यांचं शिक्षण रोखून धरलं होतं. दहाव्या नंबरची रूपाली फक्त पुढं गेली आणि शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगत ती डीएड शिकते आहे. तानाबाईला आपल्या साऱ्या लेकींची नावं फाडफाड घेता येतात. माहिती सांगताना राघूचा काही वेळा गोंधळ होतो. तानाबाईनं क्रमानं आपल्या लेकींची नावं सांगितली - 1) चंद्रभागा (वय 43), 2) सुलोचना (42), 3) फुलाबाई (42), 4) हौसाबाई (40), 5) सत्यभामा (38), 6) शीतल (36), 7) रेणुका (34), 8) वैशाली (31), 9) सीमा (सोळाव्या वर्षी निधन), 10) रूपाली (18), 11) पुष्पा (15), 12) अनिता (14). काही मुलींनी आपापल्या भागात रोजगार शोधला. शिक्षण खूप नसल्यानं चांगला रोजगार मिळत नाही. काही मुली घरकामासाठी मुंबईत गेल्या. एक जाऊन परत आली. तिचं लग्न झालं. आता दुसरी गेली. तीन मुली अविवाहित आहेत. त्यांना बरोबर घेऊन राघू आणि तानाबाई संसार करत आहेत. त्यांच्या जगण्याचं वय कमी कमी होत चाललंय आणि मुलींचं खर्चाचं वय वाढत निघालंय. सर्व मुलींना झालेल्या लेकरांची संख्या मोजली तर राघूच्या ओट्यात 20-25 नातवंडं आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या एकाही मुलीनं चारांपेक्षा जास्त लेकरांना जन्म दिलेला नाही. विशेष म्हणजे प्रत्येक मुलीला एक तरी मुलगा आहे. 

राघू ज्या काळात बाप बनत होता, त्या काळात पुरुषांना जबरदस्तीनं नसबंदी करण्यासाठी नेलं जायचं. राघूला मात्र कुणी बोलावलं नाही. तो आपला पांडुरंग आणि वारीच्या नादात असायचा. आत्तापर्यंत त्यानं 36 वाऱ्या केल्या आहेत. नसबंदीमुळं पुरुष अधू होतो, अशी त्या वेळी भावना होती. नसबंदीसाठी नेल्या जाणाऱ्या पुरुषामागं बायका रडत-ओरडत धावायच्या. "माझं ऑपरेशन करा, धन्याचं नको' अशी विनवणी करायच्या. 

पांडुरंगानं दिल्या म्हणून मुली घेतल्या, असं राघू सांगत असला, तरी त्याला वंशाचा दिवा पाहिजे होता. सुरवातीलाच त्याला एक-दोन मुलगे झाले असते, तर तानाबाईला एवढी सारी बाळंतपणं करावी लागली असती का? तानाबाईनं या प्रश्‍नाचं उत्तर दिलं होतं आणि ते म्हणजे मायंदळ लेकरं जन्माला घालूच नयेत. ते वाईटच असतं. तानाबाईच्या बहुतेक मुली जगल्या असल्या, तरी ते जगणं किती कठीण आहे, हा प्रश्‍न उरतोच. 

आणि हो, एक मात्र खरंच, की राघूच्या साऱ्या मुलींनी मुलाची भूमिका करून दाखवलीय... मुलग्याचा आग्रह धरत गर्भातच मुली मारणाऱ्या पालकांनी एवढी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवीच...अर्थातच संख्या विसरून..

No comments:

Post a Comment