१९६० साली महाराष्ट्राचा 'मंगल कलश' आला आणि अवघ्या सहा वर्षांतच 'मार्मिक' व्यंगचित्र साप्ताहिकाचे सर्वेसर्वा व्यंगचित्रकार बाळ केशव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी 'शिवसेना' या संघटनेची स्थापना केली. स्वत:च्या व्यंगचित्रांच्या रेषेची ताकद आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या अब्राह्मणी, परिवर्तनवादी चळवळीचे अग्रदूत केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव एवढेच भांडवल त्यांच्याकडे 'शिवसेना' स्थापनेच्या वेळी होते.
शिवसेनेच्या सभा होऊ लागल्या आणि बाळ ठाकरे यांच्या जिभेचा दांडपट्टा सरू झाला. बघता बघता सर्व मुंबईकर मराठी माणसांवर ठाकरी भाषेचं गारुड चढलं. त्यातच ६९ साली बेळगाव-कारवारसाठी मोरारजी देसाईंची गाडी अडवण्याचं निमित्त झालं आणि बघता बघता मुंबई पेटली! आठ दिवस मुंबई धगधगत होती. त्याआधी 'बजाव पुंगी, हटाव लुंगी'ने उडिपी, दक्षिणात्य फेरीवाले यांना झोडपून काढले होतेच. आजच्या 'खळ्ळ खटय़ाक्'च्या शंभर पटीने दहशत 'शिवसेना' या एका शब्दात त्यावेळी होती. या दंगलीनंतर 'राडा' हा सेनेला समान अर्थी शब्द झाला! आणि बाळ ठाकरेंचे 'बाळासाहेब ठाकरे' झाले. राज्यात सेना-भाजपची सत्ता आली तोवर हे 'राडेबाज' विशेषण सेनेने गौरवाने मिरवले.
युतीच्या सत्तेनंतर उद्धव ठाकरेंचा उदय, बाळासाहेबांनी बॅकसीट घेणे- या काळापासून 'शिवसेना' नावाच्या धगधगत्या सेनेचा राजकीय तडजोडी करणारा, पक्षांतर्गत कुरघोडी, किचन कॅबिनेटयुक्त, सत्तेच्या खेळात वाक् बगार असा 'प्रस्थापित' राजकीय पक्ष झाला होता. बाळासाहेब ठाकरे या एकमेवाद्वितीय सत्ताकेंद्राभोवती उद्धव, राज, सुभाष देसाई, संजय राऊत, पुढे मिलिंद नार्वेकर अशी आणखी सत्ताकेंद्रे तयार झाली. त्यातूनच नारायण राणे, गणेश नाईक यांच्यासारखे सुभेदार दरवाजाबाहेर जाण्याची 'व्यवस्था' करण्यात आली, तशीच धाकटी पाती राज ठाकरे यांच्यासाठीही करण्यात आली! परिणामस्वरूप शिवसेनेचा 'राडेबाज' चेहरा बदलून तो सभ्य, सुसंस्कृत, सौम्य, दरबारी राजकारणाचा झाला. 'साहेबां'च्या शब्दासाठी रस्त्यावर उतरून परिणामांची पर्वा न करता राडे करणाऱ्या रांगडय़ा सैनिकाला साहेबांच्या काळातल्या मातोश्रीचे उघडे दरवाजे बंद झाले आणि चार भिंतीआड 'खलबतखाने' चालवणाऱ्या 'व्हाइट कॉलर' नेत्यांचे प्रस्थ वाढत गेले. तरीही 'साहेबांसाठी कायपन' करायला तयार असलेला सैनिक गडकिल्ल्याच्या रखवालदारासारखा मातोश्रीच्या बाहेर सगळे अपमान गिळून साहेबांसाठीच ताठ कण्यानं उभा राहिला!
अशा सैनिकांच्या साहेबांची २३ जानेवारीला पहिली जयंती झाली. साहेब नाहीत म्हणजे कंप्लीट नायत! अशा स्थितीतली ही त्यांच्या वाढदिवसाची 'जयंती' झालेली पहिलीच सभा!
गंमत म्हणजे बाळासाहेबांनी उभी हयात गांधी घराण्याच्या घराणेशाहीची रेवडी उडवण्यात घालवली. पण सरतेशेवटी त्यांच्या जागी उद्धव ठाकरेच आले. आणि त्यांच्या हयातीतच राज ठाकरेंनी नावारूपाला आणलेली भारतीय विद्यार्थी सेना बाजूला सारून युवा सेनेची स्थापना करून आदित्य ठाकरेंचीही प्रतिष्ठापना करून घेण्यात आली! तरीही परवा पुन्हा वडिलांचीच री ओढत उद्धव ठाकरेंनी गांधी घराण्याच्या घराणेशाहीवर टीका केली! वारसाहक्काने स्वत: आणि आपल्या मुलाला सेनेच्या गादीवर बसवलेल्या उद्धव ठाकरेंनी साहेबांच्या शब्दाखातर आयुष्य आणि घरादाराची राखरांगोळी केलेल्या सैनिकांना निष्ठेची शपथ घ्यायला लावून पाच पैशाचा 'शिवबंधन' धागा बांधायला लावणे, यासारखा विनोद नाही! हे बंधन म्हणजे लाखो, करोडो सैनिकांच्या एवढय़ा वर्षांच्या निष्ठेचा अपमानच आहे! आयुष्यभर स्लीपरवर घालवलेल्या सैनिकांना मर्सिडिझ, बीएमडब्ल्यूतून येऊन निष्ठेच्या शपथा देणं म्हणजे त्यांच्या धमन्या-धमन्यांत साहेबांसाठी खेळणाऱ्या रक्तावर मीठ चोळण्याचाच प्रकार! अर्थात पुन्हा 'साहेबांसाठीच' ही कुर्बानी त्यांनी लाखोंच्या संख्येने दिली.
बाळासाहेब ठाकरेंनी सभेत भाषणाची सुरवात- जी सामान्यपणे 'बंधू-भगिनीनो' अशी (आजही) होते, तिथे 'जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधु, भगिनी आणि मातांनो!' अशी नवी सुरुवात आणली. आपल्या आजवरच्या सार्वजनिक जीवनात हा मान कुठल्याच नेत्याने दिला नव्हता. (पुढच्या भाषणात ही सभ्यता कायम ठेवण्याचे बंधन मात्र त्यांनी कधीच पाळले नाही, तो भाग वेगळा! ठाकरी शैलीचा!) पण दुर्दैवाचा भाग म्हणजे याच बाळासाहेबांच्या पहिल्या जयंतीआधी काही दिवस बाळासाहेबांच्याच भाषेतल्या 'रणरागिणी'ना सेनेतल्याच पुरुष नेत्यांनी जीणं हराम करून सोडणं, त्यांच्यातल्या स्त्रीत्वाला असभ्य भाषेनं घेरणं, सार्वजनिक शौचालयात त्यांच्या चारित्र्याचे बाजार मांडणे, धमक्या देणे, अरेरावी करणे, त्यांच्या आप्तस्वकीयांसह पक्षातल्या इतर समजूतदार, सहानुभूतीदारांवर दहशत बसवणे असे प्रकार चालू होते. पक्षनेतृत्वाकडे तक्रार केल्यावरही पक्षनेतृत्वाला भेटीसाठी वेळ देता आला नाही. (ते 'निष्ठे'चे धागे वळत असतील!) शेवटी नगरसेविका शीतल म्हात्रेंना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. इस्पितळात दाखल करावं लागलं. तिथे माजी महापौर डॉ. शुभा राऊळ वगळता म्हात्रेंच्या बाजूने कुणी दुसरी रणरागिणी नव्हती! आमदार डॉ. नीलम गोऱ्हेंनी औपचारिक भेट दिली, पण तीही खूप उशिरा! '..आणि मातांनो!' अशी साद घालून वेगळे ठरलेल्या साहेबांच्या पक्षात ही अशी आणि इतकी पुरुषी अरेरावी?
पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंना 'मर्द' शब्दाचं काय आकर्षण आहे कुणास ठाऊक! येता-जाता सारखं 'मर्द मावळा', 'मर्दाची अवलाद', 'मर्दानगी' असं त्यांच्या भाषणात असतं. कदाचित त्यामुळेच घोसाळकरांसारखे 'मर्द' नेते आपली मर्दानगी जळी-स्थळी स्वपक्षीय 'मर्दानी झाशीवाल्या' नगरसेविकांवर दाखवत असावेत. या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत (हे लिहीपर्यंत तरी!) काहीच ठोस भूमिका घेतलेली नाही. तर समाजवादी, समतावादी विचारांतून युक्रांद, भारिप, काँग्रेस ते शिवसेना असा राजकीय प्रवास केलेल्या, आजही स्त्री-आधार केंद्रासारखी बिगर संसदीय संघटना चालवणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे याही या प्रश्नावर एका वृत्तवाहिनीवर बोलताना एखाद्या अभ्यासवर्गात बोलावे तसं राजकारण, महिलांचा सहभाग, महिला-महिलांमधलं राजकारण असं 'पोपट मेला आहे' असं थेट न सांगता विषयाभोवती पिंगा घालत बसल्या. पण याच कार्यक्रमात डॉ. शुभा राऊळ यांचा व्यक्त झालेला उद्वेग, संताप, हतबलता आणि दु:ख जगाने पाहिलं. पण राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांनाही शेवटी आवंढा गिळत नीलमताई व उद्धवजींवर विश्वास ठेवावा लागला!
शीतल म्हात्रे हे निमित्त आहे. पण पंचायती राज आणि सत्तेत महिलांना आरक्षण दिल्यापासून 'स्त्री'ला नामोहरम करायची सोपी युक्ती म्हणजे चारित्र्यहनन! ते एवढय़ा पातळीवर करायचं, की तिच्या प्रत्यक्ष नवऱ्याने प्रभू रामचंद्र होऊन तिला 'अग्निपरीक्षा' द्यायला लावावी!
आश्चर्य याचे वाटते की, एरव्ही हिंदुत्व , हिंदू संस्कृती यांच्या नावाने राडेबाज राजकारण करणाऱ्या, स्त्री-अत्याचाराबाबत कायदा-सुव्यवस्थेतून लढा देण्यापेक्षा महिलांना 'मिरची पावडर, रामपुरी चाकू पर्समध्ये ठेवा' म्हणणाऱ्या, तलवारीचे वाटप करणाऱ्या या पक्षातील शीतल म्हात्रे व डॉ. शुभा राऊळ यांना बोरीवली-दहिसरमध्ये मिरचीची भुकटी, रामपुरी मिळाले नाही की त्या पर्स वापरीत नाहीत? अभिजीत पानसेंसारखे 'मर्द' तलवारी वाटताना या दोघी कुठे होत्या? बाळासाहेब सांगत, 'थोबाड फोड आणि मग माझ्याकडे ये! मग बघतो मी काय करायचं कायदा नि पोलिसांचं!' त्यांच्या रणरागिणी आज समाजवाद्यांसारख्या अर्ज-विनंत्या, आश्वासनांवर शांत राहून इतरांचं वाढवण्याऐवजी स्वत:चंच बीपी वाढवून घेतात? एरव्ही दुसऱ्या पक्षातल्या वा संस्थेतल्या पुरुषाला काळं फासणाऱ्या, बांगडय़ा घालून वरात काढणाऱ्या सेनेतल्या सगळय़ा रणरागिणी या प्रकारात कुठे गेल्या? की त्याही आता गांधीगिरी करत घोसाळकरांना गुलाबपुष्प देणार आहेत? शिवराय, जिजाईचे पोवाडे गाणाऱ्यांनी आपल्याच पक्षातल्या भगिनी, मातांचं 'वस्त्रहरण' होताना धृतराष्ट्राची भूमिका घ्यावी, यासारखा लाजिरवाणा प्रकार नाही! याला 'शिवशाही' म्हणायचे?
या प्रकरणात राज्य महिला आयोगाने तप्तरता दाखवणं राजकीय कुरघोडीचा एक सायलेंट प्रकार होता. सत्ताधारी पक्षात असं झाल्यावर आयोग इतका कार्यतत्पर झाला असता? निर्मला सामंत प्रभावळकरांची तळमळ मात्र खरी होती! कारण त्यांनी काँग्रेस नामक पक्षातील असलं वातावरण चांगलंच अनुभवलं असणार! अशावेळी त्यांनी पुढाकार घेऊन 'स्त्रीच स्त्रीची शत्रू असते' या जुन्या गृहितकाला छेद दिला. मात्र, उद्धव ठाकरेंनी 'महिला आयोगाने इतर बायकांचे प्रश्न बघावेत, आमचं आम्ही बघून घेऊ,' असा सरंजामी शेरा त्यावर मारला!
हा प्रश्न 'शीतल मात्रे विरुद्ध घोसाळकर' एवढय़ापुरताच मर्यादित नाही. सर्वच पक्ष आणि बिगर संसदीय संघटनांतही पुरुष नेते/कार्यकर्त्यांची पुरुषी मानसिकता हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे! संघात जशी सेविका समिती वेगळी, तशी पॉलिट ब्यूरोच्या पोलादी पडद्याआडची दुय्यमत्वाची खदखदही तेवढीच तीव्र! राजकारणासह समाजकारण, खेळ, नोकरी, व्यवसाय.. सर्वच क्षेत्रांत अधिकारपद, सत्तापद मिळवलेल्या महिलेबद्दल कौतुक जास्त, आदर कमी! तिच्या हाताखाली काम करण्यात कमीपणा मानण्यात मूळ पुरुषी वृत्तीत दडलेलं लैंगिक वर्चस्व अधिक तीव्र असतं. 'बायका जरा बिनडोकच असतात', किंवा 'बायका मूर्खासारख्याच गाडी चालवतात,' ही प्रतिक्रिया पुरुषांएवढीच बायकांचीही असते!
आज स्त्री-पुरुष हे खांद्याला खांदा लावून समाजात वावरताना अनेकदा कर्तृत्वाने स्त्रीचा खांदा वर जातो आणि पुरुषप्रधानता आक्रमक होते. या आक्रमकतेला आता हिंसक स्वरूप लाभतंय. या हिंसेला खतपाणी घालण्यात काही स्त्रियाच स्त्रीविरुद्ध सनातनी पुरुषांच्या मागे उभ्या राहताहेत. राहुल गांधींना सत्ताबाह्य केंद्र म्हणून हिणवणाऱ्या पक्षात 'शीतल म्हात्रेंना रश्मीताई लवकरच भेटतील,' असं जाहीरपणे सांगणारे पक्षप्रवक्ते रश्मी ठाकरेंचं सेनेतलं अधिकारपद सांगतील का?
थोडक्यात, 'मिरचीची भुकटी ठेवा' म्हणणाऱ्यांनीच त्याचं भुस्काट केलंय!
शेवटची सरळ रेघ : इंदिरा गांधींच्या राजवटीत त्यांना म्हणे प्रत्येक गोष्टीत 'परकीय हात' दिसे. अगदी सकाळच्या चहातदेखील परकीय हात नाही ना? अशी शंका त्या घेत- असा विनोद प्रचलित होता. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री 'आम आदमी' केजरीवाल सकाळी तोंड धुऊन लगेच लॅपटॉप उघडून सोशल मीडियावर सार्वमत घेत असावेत.. 'सीएमनी चहा प्यावा की न प्यावा?' पाठवा एसएमएस!
No comments:
Post a Comment