Thursday, 18 December 2014

कोण करेल जात-धर्ममुक्त भारत? - तिरकी रेघ - संजय पवार

Published: Sunday, December 7, 2014





कालच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन झाला. त्यांना अभिवादन करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करून झाली. १९५६ नंतर अखंडपणे भीमसागर ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर बाबांना अभिवादन करायला जमतो. महाराष्ट्रभरातून सर्व वयोगटांतील लोक इथे येतात. पंढरपूरची वारीआणि ६ डिसेंबर यांतलं सातत्य, भक्ती, आत्मिक समाधान व जगण्याची ऊर्जा हे सगळं जवळपास समान आहे. पंढरीत सरकारी महापूजा होते. नव्या सरकारने '६ डिसेंबर'ला सरकारी पुण्यस्मरणात जोडून घेतल्याने याही बाबतीतले साम्य आता झाले.
फरक फक्त एकच आहे : महाराष्ट्राच्या विविध भागांतून 'वारकरी' वेगवेगळ्या रस्त्याने पायी पंढरपूरला पोहोचतात तेव्हा वाटेत त्यांच्या खाण्यापिण्याची, आरामाची, औषधपाण्याची सोय केली जाते. वारी करणाऱ्या वारकऱ्याला प्रत्यक्ष विठूचा प्रतिनिधी समजून त्याचे पाय धरले जातात. आता तर वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही 'वारी' करतात.
मात्र, ६ डिसेंबरला दादरला येणारे भीमसैनिक, अनुयायी दलित बांधव, भगिनी, मुलं हे सगळ्यांच्या तिरस्काराचे धनी असतात. दादर, शिवाजी पार्कमधील मध्यमवर्ग, अभिजन गमतीने धसक्याचा अभिनय करत म्हणतात- 'बाप रे! 'ते' लोक येणार, नाही का!' अनेक लोक त्या दोन दिवसांत दादरबाहेर राहण्याचा प्लान करतात. यंदा तर शनिवार-रविवार आल्याने अनेकांना हायसे वाटले असेल. आनंद पटवर्धनांनी 'जय भीम कॉम्रेड' नावाचा लघुपट बनवलाय; जो डीव्हीडीवर उपलब्ध आहे. त्यात सीसीडीत बसलेल्या तरुण-तरुणींच्या मते, 'ते' लोक खूप अस्वच्छ असतात. घाण करतात. त्यांना आरक्षणाऐवजी शिक्षण, स्वच्छता शिकवली पाहिजे. एक मध्यमवयीन, मध्यमवर्गीय (बहुधा गुजराती) बाई म्हणतात, त्यांच्या विष्ठेला वेगळीच दरुगधी येते! आणखीही काही लोक तावातावाने बोलताना दिसतात. याच लघुपटात पटवर्धन मुंबईचा कचरा, सांडपाणी याची विल्हेवाट लावणाऱ्या कामगारांचं ते काम करत असलेल्या जागांसह कैफियत मांडतात. ती दृश्यं कुठल्याही संवेदनशील माणसाला पूर्ण बघवणार नाहीत. आणि विशेष म्हणजे हे सगळे कामगार पूर्वाश्रमीचे महार, मांग, आत्ताचे बौद्ध. शंभर टक्के आरक्षण! तमाम दादरवासीयांसाठी, शिवाजी पार्कवासीयांसाठी 'जय भीम कॉम्रेड'चा एक शो खास शिवतीर्थावर करायला हवा. आपण आजही किती कोत्या मनाचे, भ्रामक कल्पनांचे, कट्टर पूर्वग्रहांचे आणि कृतघ्न आहोत हे या सर्वाना समजेल. कारण संपूर्ण मुंबई शहराचा मैला, कचरा, घाण जे लोक साफ करतात आणि सर्वाना मोकळा श्वास, स्वच्छ परिसर आणि न तुंबणारे संडास देतात, तेच या ६ डिसेंबरला आपल्या उद्धारकर्त्यांला अभिवादन करायला येतात. त्यांनी हे काम करायचं नाकारलं तर मुंबई खरा 'नरक' होईल!
यावर कुणी असं प्रतिपादन करेल, की मग कशाला करतात ते काम? त्यांनी शिकावं. दुसरे जॉब करावेत! दे शूड डिनाय! वगैरे. त्यांच्या माहितीसाठी पंढरपूरला जी वारी जाते, ती जेव्हा एकादशीला पंढरपुरात पोहोचते त्या दिवशी आणि त्याच्या आधीचे व नंतरचे दोन दिवस पंढरपुरात भक्तीच्या दुप्पट मानवी विष्ठेचं साम्राज्य असतं! आणि सुरुवातीपासून ही विष्ठा काढण्याचं काम मेहतर समाज करत असतो. या समाजाला कुठलीही आधुनिक साधनं सोडाच; उलट तो संपूर्ण मैला टोपलीतून डोक्यावर ठेवून वाहून न्यावा लागतो.. आजही २०१४ मध्ये! मागच्या वर्षी या मेहतरांनी काम बंदची हाक दिली तर प्रशासनासकट विठोबाच्याही पायाखालची वीट सरकली. मागण्यांना आश्वासनांचा बुक्का लावून त्यांना पुन्हा कामासाठी तयार करण्यात आलं!
पंढरपुरात का कोणी म्हणत नाही- हे वारकरी असे अस्वच्छ का? वारकऱ्यांच्या विष्ठेला चंदनाचा दरवळ येतो? डोक्यावरून मैला वाहून न्यायची प्रथा बंद होऊनही आजसुद्धा हा मैला त्या मेहतरांच्या डोक्यावर का लादला जातो?
भाईयो और बहनों! एकसो पच्चीस करोड भारतवासी ये ठान ले, की हम गंदगी नहीं फैलाएंगे तो दुनिया की कोई भी ताकद इस देश को.. मॅडिसन स्क्वेअरवरून आणि 'राखीव' रस्त्यावर स्वच्छ भारतासाठी पंतप्रधानांपासून तेंडुलकर, कमल हसन, सलमान, आमीर, गावस्कर, स्मृती इराणी, उमा भारती, शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई.. सगळे जे झाडून रस्त्यावर आले ना, त्या सर्वानी आषाढी एकादशीला पंढरपुरात झाडू घेऊन नुस्तं उभं राहून दाखवावं! माझं आव्हान आहे स्वच्छ भारत अभियानाच्या कर्त्यांना, त्यांच्या पुरस्कर्त्यांना! त्यांनी या अभियानांतर्गत सफाई कामगार म्हणून महार, मांग, मेहतर, भंगी यांना सक्तीची निवृत्ती देऊन इतर समाजांना संधी द्यावी. दाखवाच संडास, मुताऱ्या साफ करून, मेन होलमध्ये उतरून!
'फ्लश' करणं आणि अशा अभियानात 'फ्लॅश' पाडून घेणं सोप्पं आहे. ओला कचरा, सुका कचरा ही नाकाला फडकी लावून न्याल. पण मानवी मलमूत्राची विल्हेवाट लावून शहर, गाव स्वच्छ करून दाखवा. कुठेय जातीयता, म्हणणाऱ्यांनी एकदाच पालिका इस्पितळं, सार्वजनिक स्थळी भेटी देऊन तिथं मानवी मलमूत्राची विल्हेवाट लावणारे कोण आहेत, याचं सर्वेक्षण करावं, आणि नंतर घरी येऊन जेवून दाखवावं!
भारतातील जातव्यवस्था ही धर्मव्यवस्थेपेक्षा भीषण आणि गोचिडीसारखी रक्त शोषणारी आहे. जात पंचायतींच्या बातम्या आता उजेडात येऊ लागल्यात. कुठलाही शास्त्रीय आधार नसताना 'शुद्धते'च्या नावाखाली होणारे सजातीय विवाह म्हणजे आम्ही समारंभपूर्वक वरात काढून 'जात' घट्ट करतो. या देशातील एकही जात, धर्म, पंथ आपल्या जातीचं रक्त 'शुद्ध' असल्याचा दावा विज्ञानाच्या कसोटीवर करू शकणार नाही हे आंतरजातीय विवाह चळवळीचे जनक विलास वाघ यांनी प्रसिद्ध केलेल्या डॉ. प्रदीप गोखले आणि पंडित विद्यासागर या अभ्यासकांनी संशोधन करून आंतरजातीय विवाहानिमित्ताने भारतातील विविध जाती, धर्म, पंथ यांचे कसे संकर झालेले असून कुणीही 'शुद्ध' नाही, हे सप्रमाण एका पुस्तिकेत दाखवून दिले आहे. जिज्ञासूंनी विलास व उषा वाघांच्या सुगावा प्रकाशनाचा शोध घ्यावा.

इतकी प्रचंड सुधारकांची (सर्वधर्मीय- जातीय- पंथीयांतील) फौज या देशात निर्माण झाल्यावर आज २०१४ सालीही सजातीय विवाह, जातीवार आरक्षण, जातवार तिकीट- वाटप, जातवार मंत्रिपदे हे सर्व कशासाठी? आठशे वर्षांनंतर स्वाभिमानी 'हिंदू' गादीवर बसला! महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 'तिसरा' ब्राह्मण मुख्यमंत्री! याच्या बातम्या का होतात? आजवर काँग्रेसने या देशात जातीपातीचे राजकारण आणि अल्पसंख्याकांचं लांगूलचालन केलं असं म्हणतात. त्यांना स्युडो सेक्युलर म्हणतात. पण मग परवापर्यंत उत्कृष्ट लोकप्रतिनिधी, निष्कलंक नेता, नि:स्पृह विरोधक असलेले फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत येताच त्यांचं 'ब्राह्मण' असणं फायद्याचं की तोटय़ाचं, ही चर्चा का सुरू होते? विनोद तावडे एरव्ही तरुण नेतृत्व, कोकणचा प्रतिनिधी आणि मोठय़ा पदाच्या चर्चेत भाजपचा 'मराठा' चेहरा, खडसे 'बहुजन' चेहरा, पंकजा मुंडे महिला, तरुण यापेक्षा 'वंजारी' म्हणून विचारात घेता! जानकर- धनगर, राजू शेट्टी- शेतकरी, मेटे- मराठा, आठवले- दलित.. का या सगळ्यांची कार्यक्षमता शेवटी 'जाती'वर मोजली जाते? आणि एरव्ही 'मी, आमचा पक्ष जातपात मानत नाही' म्हणणारे नेतेच आतून आपल्या जातीच्या चेहऱ्याचं प्रोजेक्शन करतात. मोदींना पण नजमा हेपतुल्लांना बाजूला करताना नकवींना आणावं लागतं. का? सांस्कृतिक कार्यक्रमात टोपी घालायला नकार देणारे मोदी मंत्रिमंडळ बनवताना मात्र ती टोपी फिट्ट करतात! तेव्हा कुठे जातो कणखरपणा या विकासपुरुषाचा? दलितांना आक्रस्ताळे, समाजवाद्यांना भाबडे आणि कम्युनिस्टांना पोथीनिष्ठ म्हणून भंगारात काढणं सोपं आहे; पण या तिन्ही विचारधारांनी या भारतात धर्म-जात-पंथ यापलीकडे जाण्याचं, वर्गीय, लिंगीय व आर्थिक विषमतेविरुद्ध आवाज उठवून ती बऱ्याच प्रमाणात कमी करायला लावून त्यासाठी धोरणं आखायला लावून, कायदे करायला लावून, भारतीय राज्यघटनेच्या अधीन संसदीय लोकशाहीतील संसदीय हत्यारं वापरून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या देशाच्या खऱ्या परंपरेला अखंडित ठेवलंय.
आज जे काही परिवर्तन, बदल, हक्क आपल्याला मिळालेत त्यामागे या सर्वाचा रेटा होता. त्यांना 'राजकीय' बळ तेवढे दाखवता आले नसेल, त्यांना सत्ता मिळाल्यावर ते भ्रष्टही झाले असतील, निष्ठा बदलल्या असतील; पण आज भारतीय स्त्री, जाती-धर्माने बहिष्कृत केलेले अस्पृश्य, शोषण केले गेलेले कामगार, शेतमजूर, असंघटित कामगार हे आज जो काही मानसन्मान, हक्क मिळवून आहेत ते यांच्यामुळेच- हे विसरून चालणार नाही. त्यांनी बऱ्यापैकी भारत बदलत आणला होता. पण ८० च्या दशकातील कमंडल-मंडल वादात या देशाचे राजकारण, समाजकारण, सांस्कृतिकीकरण हे सगळंच पुन्हा धर्म आणि जात या जुन्याच खुंट्टय़ांना बांधले गेले. मंदिर-मस्जिद वादाने हिंदू-मुस्लीम ही सनातन आग वणव्यात भडकली. त्याचा फायदा जागतिक इस्लामी दहशतवाद्यांनी घेतला. त्यासाठी पाकिस्तान आणि पडद्याआडून अमेरिका खतपाणी घालत राहिले. आमचा अभिजन आणि नवश्रीमंत मध्यमवर्ग 'मुसलमान, पाकिस्तान यांना कायमचे संपवा' म्हणून ५६ इंची छाती फुगवतो. पण मुलाच्या घरी जाऊन नायगारा फॉल बघताना, डिस्नेलॅण्ड बघताना, वॉलस्ट्रीट बघताना, मॅकडोनाल्ड, वॉलमार्टची वर्णनं करताना थकत नाही. 'तिकडे कसं सगळं मेरिटवर चालतं, रिझव्‍‌र्हेशन वगैरे काहीऽऽनाही' म्हणणाऱ्यांच्या, मेणबत्त्या लावणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की, पाकिस्तान दाऊद, मसूद देत नाही, तशीच अमेरिका हेडली देत नाही! पण पाकिस्तान संपवा आणि ओबामाच्या आरत्या गा! कारण ग्रीनकार्ड, डॉलर आणि तिथे अल्पसंख्याक म्हणून विशेषाधिकार! याच अमेरिकेने ९/११ नंतर एकदा पाकिस्तान जितक्या निर्दयतेने आपले मच्छीमार पकडतो, तसंच आपले इंजिनीअर स्त्री-पुरुष एका रात्री तुरुंगात डांबून त्यांचे व्हिसा-पासपोर्ट जप्त केले होते!
तेव्हा आम्हाला अमेरिका कशी 'रेसिस्ट' आहे याचा साक्षात्कार झाला. पण ६ डिसेंबर, १४ एप्रिलला आपण कसे वागतो? खरं तर हे सगळं वातावरण बदलण्यासाठी भारतातील विविध जाती-जमातींची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पाहणी करून त्याआधारे सर्वसमावेशक विकास योजना तयार करण्यासाठी मंडल आयोग नेमलेला होता. त्यातून जातींचा इतिहास, त्यांच्या 'मागास'पणाचं कारण यांचाही अभ्यास होऊन या पिछडय़ांची आकडेवारी प्रसिद्ध झाली. यातला मूळ उद्देश राहिला बाजूला आणि प्रत्येक जात-जमातीला आपली लोकसंख्या कळली, त्याआधारे मतदानाची किंमत कळली, सवलतींची जंत्री कळली. आर्थिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे 'राजकीय' ताकद कळली. आणि पूर्ण भारत पुन्हा 'जातीयवादी' झाला.
संपूर्ण प्रचारभर विकास, समान संधी, भ्रष्टाचार, माँ-बेटे की सरकार, काळा पैसा यावर बोलणाऱ्या मोदींनी शेवटच्या टप्प्यात प्रियांका गांधींचं एक वाक्य पकडून 'मी ओबीसी तेली म्हणून मला त्या नीच म्हणाल्या..' अशी वेदना बोलून आपली जात, ओबीसीपण अधोरेखित केलं! नितीन गडकरींनी तर एकदा कबूलच केलं, की या देशात जातीशिवाय राजकारण करता येणार नाही. वसंतराव भागवतांनी 'माधव' (माळी/ धनगर/ वंजारी) या सूत्राने वंजारी गोपीनाथरावांना भाजपचा बहुजन चेहरा बनवलं. शरद पवार फुले- शाहू- आंबडेकर म्हणत ब्राह्मणांना झोडपतात आणि मराठय़ांना गोंजारतात! काँग्रेसवाल्यांना आपण हिंदूहिताचं किंवा दलित/ मुस्लीम यांना न्यूनगंडातून बाहेर येण्याचं बोललो तर सत्ता मिळणार नाही असं वाटतं. आणि विनय सहस्रबुद्धेंनासुद्धा स्मृती इराणींच्या समावेशाने 'पारशी' या अल्पसंख्य जमातीला प्रतिनिधित्व मिळालं असं सांगावं लागतं, हे कशाचं द्योतक आहे? असं म्हणतात विशीतला कॉम्रेड चाळिशीत भांडवलदार होतो. तसं हे सर्व एकेकाळचे परिवर्तनवादी, जाती-धर्माच्या राजकारणाविरोधात, लांगूलचालनाच्या विरोधात बोलणारे सत्ता येताच धर्म-जात लांगूलचालनवादी का होतात? काँग्रेसने मदरशांना मदत केल्यावर हिरवे- काळे- निळे होत बोंबलणारे भाजपवाले जेटलींच्या पहिल्याच अर्थसंकल्पात मदरशांसाठी १०० कोटी का दिले, याचं उत्तर देत नाहीत. आणि मागणी नसताना खडसे शालेय अभ्यासक्रमात उर्दूचा समावेश करण्याची घोषणा करतात!
महाराष्ट्रातलं अल्पमतातलं सरकार वाचवायला समाजवादी पार्टी, ओवेसी यांच्या दोन आमदारांची गरज लागली तर उर्दू शिक्षण कामाला येईल, हा विचार त्यामागे आहे का? का वक्फ बोर्डाच्या जमिनी हव्यात?
आज प्रत्यक्ष मनू जरी आला आणि म्हणाला- मनुस्मृतीत काळानुरूप बदल करू या, तर त्याला हाकलून देतील; इतकं जातीयवादी वातावरण आज देशात आहे. वरच्या जातींनी जाती अभियानाची खालची पातळी गाठलीय आणि खालच्या जातींनी जाती अभियानाची, अभिनिवेशाची वरची पातळी गाठलीय. जाता नाही जात, जातीसाठी माती खावी, अस्पृश्यता सोडली तर जातीव्यवस्था ही आदर्श ग्रामव्यवस्था असं म्हणत आम्ही पुन्हा जातींकडे चाललोय! उद्धव ठाकरे विविध विभाग, वर्ग, जाती यांतून निवडून आलेल्या शिवसेना आमदारांना कोळी व कायस्थांच्या एकवीरा देवीच्या दर्शनाला घेऊन जातात! आणि पंतप्रधान मोदी संसदेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याऐवजी संसदेच्या पायरीवर लोकशाहीचं 'मंदिर' म्हणून डोकं ठेवतात! तेव्हा ज्या शाळेचा हेडमास्तरच चुकीच्या दरवाजाने आत गेल्यावर त्या शाळेतली मुलं कुठल्या दरवाजाने काय घेऊन बाहेर पडणार?
भारत खरंच स्वच्छ करायचा असेल तर भारत जात-धर्ममुक्त करावा लागेल. कारण आमची मने त्याच जळमटात असतील तर आमच्या हाती झाडू गांधी देवोत, गाडगेबाबा देवोत की मोदी देवोत, त्याने काही काळ 'झाडू'चा बाजार वधारेल, पण खरी घाण जी मना-मनांत आहे ती तशीच राहील.
विष्ठेच्या दरुगधीलाही जातीचं लेबल लावणाऱ्या देशात कोण माईचा लाल निपजेल का- जो हा देश जाती-धर्ममुक्त करील? माध्यमं आणि जाहिराततज्ज्ञ हाताशी धरून, करोडो रुपये खर्च करून या देशातील भांडवलदारांनी अशी एक टेस्ट-टय़ूब बेबी जन्माला घालावी, जी हे जाती-धर्ममुक्त भारत अभियानाची तार छेडेल. अर्थात ते ही जबाबदारी घेणार नाहीत. कारण ते म्हणजे कृष्णजन्माचं प्लॅनिंग स्वत: कंसानेच केल्यासारखं होईल!
शेवटची सरळ रेघ- माणसाच्या हातून कळत-नकळत अशा काही गोष्टी होतात, की तो स्वत:च स्वत:ची प्रतिमा तयार करतानाच काही दोष राहून जातात. रिपाई नेते अर्जुन डांगळे हे रिपाईतून बाहेर पडून नवीन पक्षाची स्थापना करून बसलेत. हा नवा पक्ष म्हणजे वेगळं दुकान नसून, हा सर्व विचारांचा 'मॉल' आहे असं ते म्हणाले. आता या मॉलमध्ये खरेदीला कोण कोण येतात, यावर हा मॉल चालतो की 'ओव्हरहेड'च्या लोडने बंद करावा लागतो, हे काळच ठरवेल. मात्र, स्वत:च्या पक्षाला मॉल म्हणणाऱ्या डांगळेंच्या नव्या पक्षाचं नाव 'महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी' असं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'मनसे' झालं तसं डांगळेंचं 'मरिपा.' आणि मनसेच टठर झालं तसं 'मरिपा'चं 'टफढ' होणार! आधीच्या दलित नेतृत्वावर विकाऊपणाचा शिक्का असताना पक्षाची आद्याक्षरेच टफढ व्हावीत याला काय म्हणावं!    

इथे सुबक नक्षलवादी बनवून मिळतील!

Published: Sunday, November 23, 2014

प्रभु भल कीन्ह मोहि सिख दीन्ही। मरजादा पुनि तुम्हरी कीन्ही॥
ढोल गँवार शूद्र पसू नारी। सकल ताडना के अधिकारी॥
(सुंदराखंड। तुलसीदासकृत 'रामचरितमानस'मधील एक चौपाई)
संत तुलसीदासाच्या रामचरितमानसात 'ताडना'चे म्हणजेच बडविण्याचे अधिकारी म्हणजेच अलीकडच्या शासकीय भाषेत 'लाभार्थी' कोण? तर ढोल, गँवार म्हणजे अशिक्षित, शूद्र म्हणजे अस्पृश्य जाती, पशू म्हणजे प्राणी आणि नारी म्हणजे स्त्री! ('उठता लाथ, बसता बुक्की' हा त्याचा पुढचा अवतार असावा!) नेहमीप्रमाणे तुलसीदासाचा 'ताडना' म्हणजे 'तारणे' असा असलेला खरा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावून 'ताडना' म्हणजे 'बडविणे' असं पसरवून तुलसीदास व रामचरितमानस नाहक बदनाम केलंय, असा युक्तिवाद काही लोक करतात. अशिक्षित, शूद्र, पशू, नारी यांना 'ताडना' म्हणजे 'तारणे' समजू शकतो; पण मग 'ढोल' कसा 'तारणार' आणि कशासाठी?
कालौघात 'ढोल' बडविण्याला सेलिब्रेशनचे स्वरूप आले. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ढोलवादन इतके वाढले, की प्रत्यक्ष ढोलवादन डेसिबलमध्ये मोजून बंदी आणावी लागली.
अशिक्षिताला बडवणे ही त्याच्या शिक्षित न होण्याची शिक्षा समजूया. पण अलीकडे शिक्षितच अशिक्षितासारखे वागत असल्याने अशिक्षित बडवून घेण्यापासून वाचलेत.
मनेका गांधी, पेटा इत्यादी एनजीओंमुळे 'पशूं'ची बडवण्यापासून सुटका झाली. यात भटक्या कुत्र्यांचे उखळ पांढरे झाले. निवासी मनुष्यास चावणे हा भटक्या कुत्र्यांचा हक्क झाला.
शूद्र आणि स्त्रिया मात्र आजही बडवले, नागवले जाताहेत. दोघांनाही आजही बडवण्याचे एक समान कारण- या दोन्ही पायातल्या वहाणा हल्ली आपली पायातली जागा सोडून डोक्याच्या दिशेने सरकू लागल्यात. साहजिकच त्यांना पायात ठेवणे गरजेचे झालेय.
आपल्याकडे एखादी घटना घडली की 'असं ते सगळं रामायण!' किंवा 'एवढं महाभारत पडद्यामागे घडलं' असं म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे थेट 'रामचरितमानस' गाठायचं कारण गेल्या काही वर्षांत व अलीकडे काही महिन्यांत शूद्र- म्हणजे दलितांवर झालेले निर्घृण हल्ले. (याला समांतर स्त्री-अत्याचारांची मालिका आहेच.) या हल्ल्यांच्या दलित, दलितेतर, राजकीय, सामाजिक आणि माध्यमांतून उमटलेल्या प्रतिक्रियांचं एक रामायणच घडलंय.
महाराष्ट्र पोलीस हा एक कर्तबगार शासकीय विभाग आहे. मुंबई पोलिसांची तुलना थेट स्कॉटलंड यार्डशी होते. पण खैरलांजी ते जवखेडा व्हाया खर्डा आणि इतर हल्ले यांतील गुन्हेगारांना जेरबंद करताना ते कमालीचे अयशस्वी, गोंधळलेले आणि वेळकाढूपणा करत राहिलेत. डॉ. दाभोलकरांचे मारेकरी शोधायला त्यांनी थेट प्लँचेट केले. तिथे दाभोलकर आले; खुनी नाही. मग पोलिसांच्या लक्षात आले- आपण दाभोलकरांना उगाच बोलावले. त्यांना थोडीच अटक करायची होती? खुन्यांना बोलवायला हवे! पूर्वी आणि आताही अनेकदा काही गोष्टी घडल्या की 'संघाचा हात आहे' अशा बातम्या येत. नंतर 'अंडरवर्ल्ड'चा हात आला. पुढे खलिस्तानी, एलटीटीई यांचे हात-पाय आणि हल्ली कायमस्वरूपी अल-कायदा, लष्करे तोयबा, इ.चे हात असतात. यात आता नवं नाव आलंय- नक्षलवादी!
नक्षलवादाचा जन्म, त्याचा बीमोड आणि पुन्हा त्याची भरभराट हा स्वतंत्र विषय आहे. पण खैरलांजीचं  अमानुष हत्याकांड उघड उघड जातीय विद्वेष आणि पुरुषी लिंगगंडातून झालेले असताना महाराष्ट्राचे तत्कालीन लक्ष्यवेधी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्या घटनेवरील दलित प्रतिक्रियेला नक्षलवादाशी जोडून दिले! खैरलांजी विदर्भात असल्याने नक्षलवादाचे नेपथ्य तिथे तयारच होते. आता जवखेडच्या हत्याकांडावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर 'मपो' म्हणतेय, यात नक्षलवादी घुसलेत आणि ते दंगली घडवतील. आता 'मपो'ना हे कळलंच आहे, तर त्यांना पकडून तुरुंगात न टाकता 'अंदाज' वर्तवण्यात नेमका काय उद्देश? की सिनेमाच्या शूटिंगला झालेली बघ्यांची गर्दी जशी 'तू पायला का सलमान? मला दिसलावता' असं म्हणते, तसं 'मपो' सांगताहेत, 'दिसला बरं का, त्या गर्दीतही नक्षलवादी दिसला.. असं आहे होय रे चोरांनो? बघतोच तुम्हाला!'
नक्षलवाद हा हिंसेचे तत्त्वज्ञान मांडतो आणि व्यवस्था उलथवण्याची- तीही हिंसेने- त्यांची कार्यशैली आहे. जगभरातल्या सर्वच हिंसक चळवळींसारखी तीही एक अपयशी विचारसरणी आहे. तरीही समाजातील काही बुद्धिवादी, विचारवंत, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आणि मुख्यत: विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षिले जातात. त्यांचे अनुयायी होतात. जंगलात जातात. विस्फोटक कारवाया करतात. पकडले किंवा मारले जातात. हताश, निराश होतात. प्रसंगी शरण येतात.
महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या लढाईत आजवर युक्रांद, दलित पँथर, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना यांच्यात नक्षलवाद्यांनी शिरकाव केल्याचे ठपके ठेवण्यात आले. पोलिसांची जशी यांच्यावर 'नजर' होती, तशीच कार्यकर्त्यांमध्येही एकमेकांकडे संशयाने पाहण्याची ती वेळ होती. युक्रांदची एक फूट 'नक्षलवाद' या विषयावरच झाली! त्यावेळचा एक गमतीदार किस्सा आहे. आजच्या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे तेव्हा युक्रांदमध्ये होत्या. युक्रांद फुटली होती आणि नीलम गोऱ्हे ज्या गटात होत्या, त्या गटातल्या शांताराम पंदेरेंवर नक्षलवादाचा ठपका ठेवला गेला होता. नीलम गोऱ्हेंकडे दिवस-रात्र यावर चर्चा झडत. तेव्हा त्यांची मुलगी मुक्ता लहान होती. पण आईजवळ बसून येता-जाता चर्चा ऐकून तिने एकदा नीलम गोऱ्हेंना विचारले, 'आई, आपण ब्राह्मण आहोत की नक्षलवादी?' हे सांगताना नीलम गोऱ्हेंनाही हसू आवरत नसे. कारण यातला एक- त्यावेळच्या त्यांच्या विचाराप्रमाणे शोषक, तर दुसरा- शोषितांचा प्रतिनिधी. आणि त्या स्वत: जन्माने शोषक आणि कर्माने शोषितांच्या प्रतिनिधी होत्या!

हे विषयांतर एवढय़ासाठीच केले, कारण नक्षलवादी, अतिरेकी, दहशतवादी, धार्मिक आतंकवादी यांतल्या सीमारेषा आपण समजून घ्यायला हव्यात. अंडरवर्ल्डमधला एखादा शार्पशूटर एन्काऊंटरमध्ये मारणे आणि नक्षलवादी मारणे यात तुलनात्मक फरक आहे. अंडरवर्ल्डची उत्पत्ती आणि खूनबाजी, धार्मिक दहशतवादाची उत्पत्ती आणि संहार यापेक्षा नक्षलवादाची उत्पत्ती आणि हिंसा ही वेगळी आहे. बंगालसारख्या समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राज्यात बुद्धिवाद्यांच्या विचारांतून पनपलेला नक्षलवाद नंतर गरिबी आणि शोषणाची परिसीमा असलेल्या तेलंगणापर्यंत पसरला. लाखो शिक्षित युवकांचे बळी गेले. (वाचा : 'हजार चुराशीर माँ'- महादेवी वर्मा) आणि आता पुन्हा परिवर्तनाचा मोठा इतिहास असलेल्या महाराष्ट्रात तो डोकं वर काढतोय.
एकेकाळच्या 'बिमारू' (बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, यूपी) राज्यांत नक्षलवाद कधी वाढला नाही. आजही महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर उघडपणे नक्षलवादाचे समर्थन करतात.. अगदी वृत्तवाहिन्यांवरही करतात. मध्यंतरी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी, 'दलित पँथर आणि नक्षलवाद्यांनी एकत्र यावं,' असा लेख चर्चेसाठी खुला केला होता. पँथर भागवत जाधव स्मृती समारोहात त्यावर चर्चाही ठेवली होती; ज्यात मी, भाई, श्याम गायकवाड वक्ते होतो. भाईंच्या भूमिकेला श्याम आणि मी दोघांनी तात्त्विक विरोध केला. आयोजक सुमेध जाधवला मी म्हणालो, 'हा परिसंवाद घेतला म्हणूनही पोलीस आपणा सर्वाना नक्षलवादी ठरवून मारून टाकतील!' चळवळी संपवण्यासाठी अशी सोपी समीकरणे करतात. पोलीस, शासन तसेच राजकारण्यांनी भांडवलदारांच्या विरोधात उभी राहिलेली लाल बावटय़ाखालची कामगार शक्ती चिरडण्यासाठी पहिल्यांदा शिवसेनेचा आणि नंतर अंडरवर्ल्डचा आधार घेतला.
मुद्दा असा आहे- गावगाडय़ातल्या सरंजामी व्यवस्थेला आता विचार, तत्त्वांचा, चालीरीतींचा दाखला देत प्रगत दलितांना संविधानिक संधींपासून रोखणे कठीण जाऊ लागले आहे. त्यामुळे दहशत बसेल अशी क्रूर हत्याकांडं घडवणे हे त्यांच्या सरंजामी अस्तित्वासाठी आवश्यक झालंय. त्यासाठी प्रसंगी तुरुंगात जाणे (नंतर जामिनावर सुटून उरलेल्यांना संपवणे) त्यांना राजकीय लागेबांध्यामुळे सहज-सोपे वाटते.
बरं, मधल्या काळात झालंय काय, की जातीय उतरंडीसह आता नवे वर्ग उदयाला आलेत. गर्भश्रीमंत, श्रीमंत, नवश्रीमंत, सरंजामी, सधन शेतकरी आणि मग शेतकरी, शेतमजूर.. जातव्यवस्थेत आता वरचे ब्राह्मण आणि खालचे महार-मांग यांच्यापेक्षा मध्यम जातींनी राजकीय- सामाजिक अवकाश व्यापलाय आणि याच नेपथ्यरचनेत आर्थिक उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण यांचाही प्रयोग जोमाने सुरू आहे. परिणामस्वरूप पाटलाच्या पोरीकडे मोबायल आणि म्हाराच्या पोराकडे पण मोबायल! मग फेसबुक नि व्हॉटस्अ‍ॅपवरून प्रेमाच्या आणाभाका, ती ओढ, हिंडणे, फिरणे.. गावात चर्चा.. 'मुलगी शिकली, प्रगती झाली' इथवर ठीक; पण महाराने, मांगाने तिला बाटवली? सर्व संतमहात्मे, चळवळी, कायदेकानू सुरनळी करून ठेवून खुलेआम, अगदी झुंडींनी जाऊन त्यांचा चेंदामेंदा करणे आणि वर राजकीय ताकदीच्या जोरावर- बघतो कोण आम्हाला पकडतो, ही अक्कड!
बिहार, यूपीत असे 'बाहुबली' असतात. महाराष्ट्रातही इलेक्टिव्ह मेरिटमुळे तालुक्यापासून महानगरांपर्यंत असे बाहुबली तयार झालेत. पुरोगामी, परिवर्तनवादी महाराष्ट्रात हे मध्ययुगीन पुनरुज्जीवन आश्चर्यकारक व धोकादायक आहे. परवाच बेळगावात भाजप समर्थकांनी प्रेमाला मदत करणाऱ्यांना नागवं करून मारलं. भाजपसह कुठलाच राजकीय पक्ष या रोगापासून
दूर नाही.
याच महाराष्ट्रात महाडचं चवदार तळं सामाजिक इतिहास सांगतं. नामांतरित विद्यापीठ समतेची लढाई अधोरेखित करते. बाबा आढावांचं 'एक गाव, एक पाणवठा', हमाल पंचायत, कष्टाची भाकर, मोलकरीण संघटना, कागद-काच-पत्रा वेचणारे, लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, लक्ष्मण गायकवाड यांनी भटक्यांना दिलेला आवाज, स्त्री-मुक्ती संघटना, जनवादी संघटना, स्त्री आधार केंद्र, नारी समता मंच ते 'राइट टू पी', रिपब्लिकन पक्ष, पँथर, आंबेडकराइट सोशल मीडिया ग्रुप ते आंबेडकर इंटरनॅशनल मिशन.. हा सगळाच इतिहास वर्तमान नक्षलवादाचं लेबल लावून नेस्तनाबूत करायचा?
नव्या आर्थिक धोरणांचे लाभार्थी कोण? 'वर्ग बदलला की जात जाईल' म्हणणारे आणि 'समता' ऐवजी 'समरसता', 'आदिवासी' ऐवजी 'वनवासी' करून साधलं काय? बदललं कोण? कवी लोकनाथ यशवंत विचारतात, 'शेतकरी आत्महत्या करतो, पण शेतमजूर नाही करत. असं का?' सेन्सेक्स उंचावला म्हणून कुणा बजाज, मित्तल, मफतलालची मुलगी उच्चविद्याविभूषित मागासवर्गीयाला मिळेलच असं नाही! आजही पहिल्या पानावर 'स्वजातीय, अनुरूप जोडीदार निवडा' अशा जाहिराती झळकतात. वर वर चित्र बदललंय, पण आत आत तेच आहे.
एवढे अत्याचार घडताहेत; मग इतिहासाची पुनर्माडणी करू पाहणारे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, शिवसंग्राम, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष हे 'आरक्षणा'पुरते मागास होतात आणि मात्र दलित हत्याकांडात आपल्या जातीचा आरोपी ठरला, की अ‍ॅट्रॉसिटीला यांचा विरोध! आता उच्च जातींची नाही, तर मध्यम, सधन जातींची समतेच्या लढय़ासाठी मोठी गरज आहे.
आजच्या शिक्षित दलित तरुणाला नव्या व्यवस्थेतही जातीवरून सट्ल शेरेबाजी सहन करावी लागते. 'टाइमपास', 'दुनियादारी'सारखे प्रेम 'फँड्री'त होत नाही, हे समाजवास्तव! गावात सरंजामी राज्यकर्ते मान वर करू देत नाहीत आणि शहरात आवाज उठवला तर आता नक्षलवादी ठरवून संपविण्याची सोपी चाल! ही चहूबाजूंनी घेरल्याची भावना, राजकीय निर्नायकी, सामाजिक लढाईत जातीअंतापेक्षा 'भ्रष्टाचार' आणि 'स्वच्छ भारत' अशा दिखाऊ अभियानांची चलती! ऐन स्वातंत्र्यलढय़ाच्या भरात महात्मा गांधींना 'गांधीजी, आय हॅव नो होम-लँड!' असं सांगून बाबासाहेबांनी अप्रत्यक्षपणे 'मी कुणासाठी लढू?' असा भेदक प्रश्न केला होता.
नव्या धोरणात गृहसंकुले उभी राहिली. मॉल्स, मल्टिप्लेक्स आले. शेअर बाजार वधारले. मल्टिनॅशनल बँका आल्या. एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन आली. मंगळावर गेलो. पण मनातला गावगाडा तसाच! त्या गावगाडय़ातला दलित तसाच चिरडला जातोय- जसा इतिहासात चिरडला गेला. त्याविरोधात उभं राहणाऱ्यांना नक्षलवादी ठरवणं हे प्रश्नाचं सुलभीकरण, सुबक रूप देणं झालं! अर्थात दिवाळीला दुप्पट उत्साहाने आपल्या टाचेने बळीला पाताळात पाठवणाऱ्या समाजाकडून अपेक्षा तरी किती करणार?
शेवटची सरळ रेघ: पुण्यात हेल्मेट न वापरणाऱ्यांना पोलिसांनी दंड करायला सुरुवात करताच काहींनी विरोधाचे दंड थोपटले. हेल्मेट'सक्ती' नको, म्हणाले. पोलीस म्हणाले, 'आम्ही सक्ती नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करतोय.' हेल्मेट वापरावरून पुणेकरांतच दोन गट. आजही अनेकजण ते स्वेच्छेने वापरतात. या सुरक्षेबद्दल जनतेतही थोडी जागरूकता दिसली. पण कोथरूडच्या नवनिर्वाचित प्राध्यापिका आमदार मेधा कुलकर्णीनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून 'पोलिसांना ही सक्ती थांबवायचे आदेश द्या,' म्हणाल्या. मुख्यमंत्रीही सत्वर 'हो' म्हणाले! भाजपपर्वाचे काही कळत नाही. गडकरी म्हणतात, 'वाहतूक, रस्ते, कायदे कडक करणार.' मोदी म्हणतात, 'मी कायदे मोडतो.' पुण्याचे पोलीस मात्र म्हणत असतील, ''सरकार बदललं खरं, पण पूर्वी दादांचा फोन यायचा आणि कारवाई थांबायची. आता 'दादां' ऐवजी 'नानां'चा फोन! बाकी सारे तेच!''    

एकाच जगातील दोन 'जगं'

Published: Sunday, November 9, 2014

'लग्न आयुष्यात एकदाच होतं!' असं एक लंगडं, पण भावनिक समर्थन खर्चिक लग्न करणारी मंडळी करत असतात. त्याच पद्धतीने राज्यभरातून जाहीर निषेध, नाराजी व्यक्त झालेली असतानाही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून पहिल्यावहिल्या भाजप मुख्यमंत्री व मंत्र्यांचा 'शाही' शपथविधी वानखेडेवर पार पडला.
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतील आक्रमक, अभ्यासू व तळमळीने प्रश्न मांडणारे आमदार म्हणून ओळख असलेले सद्गृहस्थ आहेत. पण मोदीपुरस्कृत 'इव्हेन्टशाही'ला बळी पडत त्यांनीही ही 'शाही' शपथ घेतली.
हीच गोष्ट जर 'आघाडी' सरकारने केली असती तर निषेधाचा वरचा स्वर देवेंद्रनीच लावला असता आणि कॅमेराग्रस्त किरीट सोमय्या वानखेडेसमोरच्या रस्त्यावर आडवे पडून धाय मोकलून रडले असते! असो. सत्ता भल्याभल्याना ३६० अंश फिरवते. त्यात भाजप मुळातच रिव्हॉल्िंव्हग चेअरसारखा 'दिशा' बघून फिरणारा पक्ष! तरीही राज्यात चौथ्या क्रमांकावरून सर्वात मोठा पक्ष होऊन अल्पमतातले का होईना, पण भाजपचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी जे बरे-वाईट परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! (आज तरी हे लिहीपर्यंत) 'भाजपचे' सरकार आहे. पुढे शिवसेनेच्या सहभागानंतर ते 'युतीचे' सरकार होणार की 'भाजपचे'च राहणार, हे भाजपचे चाणक्य ठरवतीलच! 
दरम्यान, महायुतीतल्या पांडवांपैकी सेना आधीच बाहेर पडली होती आणि आठवलेंसह राजू शेट्टी, जानकर, मेटे भाजपसोबतच राहिले. त्यातूनही आठवले आणि जानकर पुढच्या रांगेत शिरतात तरी! राजू शेट्टी आणि मेटे यांची अवस्था मात्र नकुल-सहदेवासारखी झालीय. म्हणजे बेरजेपुरते ते पांडव म्हणून उरलेत.
आठवले, शेट्टी, जानकर, मेटे हे तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करत असताना मर्द मावळ्यांच्या शिवसेनेला मात्र भाजपने व्यवस्थित तोंड उघडवून बुक्क्य़ांचा मार दिलाय! सेनेचा एवढा अपमान- तोही महाराष्ट्रात आणि खुद्द मुंबईत- आजवर कुणी केला नसेल. राष्ट्रवादीने टाकलेल्या गुगलीवर भाजपने 'वेल प्लेड' अशी खेळी केली, पण सेना मात्र 'क्लीनबोल्ड' झाली!
अल्पमतातल्या भाजपला आपल्या ६३ आमदारांची गरजच नाही, हे सत्य सेनेला पचवणं जड गेलं. काय भूमिका घ्यावी, यावर त्यांची अशी काही गोची भाजप-राष्ट्रवादीने केली, की वाघाची शेळी नाही, तर मांजर झाली!
भाजपने नंतर या मांजराला असे खेळवले, की मांजराला कळेना- आपल्याला गोंजारताहेत की चेष्टा करताहेत! निवडणुकीत मराठी अस्मितेची, स्वाभिमानी बाण्याची डरकाळी देणाऱ्या सेनेने हळूहळू एक-एक कवचकुंडल उतरवत 'काही करा, पण मला तुमची म्हणा' अशी बैठकीची लावणी साक्षात् अफजलखानाच्या शाही शामियान्यात जाऊन गायली! उद्धव ठाकरे बाळासाहेबांनंतरची लढाई ६३ आमदार निवडून आणून जिंकले खरे; पण नंतरच्या तहात त्यांनी मराठी अस्मितेचा लिलावच केला. उद्या सरकारात सामील झालेल्या सेनेचं रूप घोडय़ांच्या टापा वाजवत विराजमान झालेल्या राजासारखं नाही, तर सपशेल शरणागती पत्करलेल्या मांडलिक राजासारखंच राहणार! राष्ट्रवादीचं आँचल 'मैला' न होता तर सेनेचं थेट वस्त्रहरणच झालं असतं.
अमूल बॉय देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पहिल्या दिवसापासूनच ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलं आहे. गडकरीपुरस्कृत अस्तनीतले निखारे, तावडेंचा माध्यम- धोरणीपणा, खडसेंची खान्देशी केळीची सुकलेली बाग आणि मास लीडर व मेट्रो लीडर असे पंकजा पालवे-मुंडेंचे चिमखडे बोल अशा कॅबिनेटला घेऊन त्यांना कारभार करायचाय. निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले 'सक्षम' उमेदवार, त्यांचे राजकीय चारित्र्य आणि पक्षांतर्गत उभे राहिलेले वाडा, महाल, बंगला, पालं यांच्या आव्हानातून स्वत:ला सांभाळत पुढे जाताना त्यांचा मनमोहनसिंग किंवा पृथ्वीराज होऊ नये, हीच सदिच्छा! पण खरी गोष्ट पुढे आहे..
मेमध्ये केंद्र शासन स्थापन झालं. आता महाराष्ट्रातही सरकार स्थापन झालंय. देशाप्रमाणे राज्यातही मोदीपर्व सुरू झालंय. काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना सत्तेवरून घालवणं गरजेचं होतं. त्याला पर्याय म्हणून लोकांनी मोदीपर्वाची निवड केली खरी; पण या मोदीपर्वात लोकशाहीची सर्वसाधारण लक्षणं अथवा प्रमुख अंगांना विकास व उत्तम प्रशासन या नावाखाली एकाधिकारशाही, 'हम करे सो कायदा' ही वृत्ती बळावत असून विरोधकांचा राजकीय खातमाच नाही, तर त्यांचं अस्तित्वच पुसून टाकायचं अत्यंत चलाख असं धोरण राबवलं जात आहे.
बहुमताचा अहंकार आणि स्वप्रेमाने भारित असं नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व लगाम नसलेल्या घोडय़ासारखं चौखूर उधळतंय. आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षाध्यक्ष अमित शहांसोबत संपूर्ण भाजप फरफटत चाललाय. माध्यमं नंदीबैलासारखी माना डोलावताहेत. आणि उद्योगपती एखादा मोठा संप बारगळल्यानंतर होणाऱ्या आसुरी आनंदाच्या उकळ्यांनी मार्केटची धोरणं लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर लादत आहेत. विषमता या देशात हजारो वर्षांपूर्वीपासून आहे. परंतु ती कमी करण्यासाठी संत, महात्मे, सुधारक, दूरदृष्टीचे राजकीय नेते यांनी टप्प्याटप्प्याने, पण ठोस बदल, परिवर्तन केले. या देशाची वीण बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक, बहुपंथीय, प्रादेशिक राहील याचा रचनात्मक विचार त्यांनी केला. पण आताचे मोदीपर्व या सगळ्याला एक वेगळाच रंग देऊ पाहतंय. यातील गंभीर बाब अशी की, विकासाचा मुखवटा लावून या गोष्टी मूळ चेहरा लपवून बेमालूमपणे केल्या जाताहेत. कमंडल वादानंतर देशात झालेल्या उभ्या फाळणीपेक्षा विकासाचे हे नवे प्रारूप भारताला भीषण अराजकाकडे घेऊन जाऊ शकते.
वाचताना हे अतिशयोक्त, एकांगी, पूर्वग्रहांनी भरलेले आणि टोकाचे विधान वाटेल. पण शांतपणे घटनाक्रम पाहिले तर गोष्टी लक्षात येऊ लागतील. मात्र, त्यासाठी एक तटस्थ नजर तयार करावी लागेल.
मोदी आणि भाजपचा विजय हा ऐतिहासिक व उत्साहवर्धकच आहे. ३० वर्षांनंतर देशात स्थिर सरकार येणं हे देशाच्या प्रगतीसाठी चांगलंच आहे. त्याचे प्राथमिक परिणाम दिसूही लागलेत. पण छोटय़ा गोष्टी मोठय़ा करून दाखवायच्या आणि मोठय़ा गोष्टी नुसत्या छोटय़ा नाही, तर अस्तित्वातच नाहीत अशा करायच्या- असं हे खास जाहिरात, विपणन तंत्र आहे.
यूपीए १ आलं तेव्हा त्याला असलेला डाव्यांचा भरभक्कम पाठिंबा दिसताच शेअर मार्केट धाडकन् 'कोसळवलं' गेलं! अगदी तसंच मोदींची उमेदवारी जाहीर झाल्यापासून निर्देशांक सतत वाढता आहे.. सरकार योजनांमागून योजना जाहीर करतेय. पण रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर व्याजदर कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे चिदंबरम् यांच्याप्रमाणेच जेटलींचीही गव्हर्नरांवरची चिडचीड वाढलीय.
याचाच अर्थ मोदी म्हणाले म्हणून 'अच्छे दिन' लगेच सुरू होणार नाहीत. जनधन योजना असो, स्वच्छता अभियान असो की गांधींचे नाव घेत वल्लभभाई पटेलांचे भाजपपुरस्कृत सोयीस्कर उदात्तीकरण असो. मोदीपर्वामुळे आता विवेकानंदांनाही बरे दिवस येतील. महापुरुषांची अशी पक्षीय, प्रांतीय, धार्मिक, जातीय विभागणी क्लेशदायक आहे. काँग्रेसचाच पाढा पुढे भाजपने रेटावा याचा अर्थ सत्ताधारी व्हायचं तर हे सगळे हिणकस खेळ खेळा!
मोदीपर्वातील सर्वात भयानक गोष्ट आहे ती प्राधान्यक्रम बदलायची. त्यासाठी त्यांना माध्यमांचीही साथ मिळतेय. निवडणूक काळात बारा दिवसांतल्या दहा दिवसांत मोदी घसा फोडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे सांगत होते. विजेची गणितं सांगत होते. उद्योगांची आरती गात होते. पण स्वपक्षीय सरकारचा शपथविधी करताना त्यांनी हे सर्व नजरेआड करून आपली 'इव्हेन्ट' पद्धतीच दामटून राबवली. पुन्हा मुख्यमंत्री निवडला तो विदर्भाचा. ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे भांडवल करून भाजप सत्तेत आली, ती विदर्भातच दुसरी दिवाळी साजरी करते. सरकार स्थापनेदरम्यान जवखेडय़ाला भीषण असे दलित हत्याकांड झालं. पण शाही शपथविधीत गर्क असलेल्या भाजपला तिकडे बघायला वेळ नाही! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान 'माळीण'ची घटना घडली. लगेच देशाचे गृहमंत्री धावून आले! आणि जवखेडय़ाला काळी दिवाळी असताना इकडे गृहमंत्री, मुख्यमंत्री निवडीत भाजप गुंतला होता. निवडणुकीदरम्यान धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या रासप नेत्यांचे उपोषण सोडायला भाजप नेते प्रवक्त्यांसह मोसंबी रस घेऊन धावले होते. आणि जवखेडय़ाला संघर्षयात्रा-फेम मास लीडर पंकजा मुंडेंना सवड मिळाली ती मंत्रिपदाची शपथ घेतल्यावरच!
मुळात फुले- शाहू- आंबेडकरांच्या नावाचा जप करणाऱ्या आघाडी सरकारने खैरलांजी, खर्डा अशा ठिकाणी 'अ‍ॅट्रोसिटी'चे कलमच लावले नाही. उलट, खैरलांजीला तंटामुक्त गावाचा पुरस्कार दिला.


९५ ला सरकारात असलेल्या युतीने तर अ‍ॅट्रोसिटी कायदाच रद्द केला होता. त्यामुळे आता ते काय करतील, हे वेगळं सांगायला नको!
भाजपची ओबीसी चळवळ ही या समाजाला फुले- शाहू-आंबेडकर, बुद्ध किंवा मार्क्‍स यांच्याकडे जाण्यापासून परावृत्त करून 'हिंदुत्वा'च्या नावाखाली मुस्लिमांच्या विरोधात वापरण्यासाठीची वानरसेना म्हणून हवीय. गुजरात, उ. प्रदेश इथल्या दंगलींत हा प्रयोग यशस्वी झालाय. मराठा समाजात आता इतिहासबदलाचे वारे वाहू लागल्याने भाजपला जानकर, मेटे यांची गरज लागणार. आठवलेंना तर आताच बौद्ध भिख्खूंचे चिवर, त्यातला भगवा आणि मोदींच्या हिंदुत्वाचा भगवा यांत साम्य दिसू लागलंय.
मोदीपर्वाचे टार्गेट फक्त काँग्रेस नाही, तर काँग्रेससहित फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध, कम्युनिस्ट, समाजवादी हे सगळे आहेत. भारतीयत्व हिंदुत्वात बदलण्याची ही विषारी खेळी आहे.
मोदीपर्व सुरू झाल्यावर उ. प्रदेशात छोटय़ा-मोठय़ा ६०० दंगली झाल्या. अलीकडे बडोदाही चार दिवस पेटत होतं. 'लव्ह जिहाद' हा जबरदस्तीने करायला लावलेला कांगावा होता असं त्या तरुणीनेच सांगितलं. गोव्याचे मंत्री म्हणाले, स्त्रियांनी बिकिनी घालू नये. उत्तर प्रदेशात हिंदू महासभा आणि तत्सम संघटनांनी- मुलींनी स्कर्टस्-जीन्स घालू नये, असे फर्मान काढले.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे विवाहोत्तर छळ प्रतिबंधक कायदा ४९८ (अ)- ज्यात लगेचच कारवाई होऊन नवरा, तसेच आवश्यक असल्यास सासू, सासरे, दीर यांना अटक होत असे. ही अटकेची कारवाई होण्याआधी पोलिसांनी फेरविचार करावा, लगेच अटक करू नये, असे निर्देश पोलिसांना देशाचे गृहमंत्री खुद्द राजनाथ सिंह यांनीच दिले आहेत.
या सर्व बातम्या माध्यमात आल्याच नाहीत. आल्या तरी त्यांचा पाठपुरावा झाला नाही. ४९८ (अ) प्रमाणेच अ‍ॅट्रोसिटीलाही विरोध होत आलाय. आणि केंद्र व राज्य सरकारची विचारसरणी पाहता ते काय निर्णय घेतील, हे वेगळे सांगायला नको.
शाही शपथविधीला विरोध करणाऱ्यांची व जवखेडय़ासाठी निदर्शने करणाऱ्यांची दृश्ये शपथविधी सोहळा संपल्यावरच वाहिन्यांवर दिसू लागली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर मोदीसमर्थक उद्योगपतींनी घेतलेला कब्जा इथून पुढे 'दुसरं जग' दिसणार नाही याचीच काळजी घेणार.
आता आणखी दोन गोष्टी! या निवडणुकीत 'एमआयएम'चा उदय झाला म्हणून माध्यमांसकट राजकीय पक्ष 'अगं बाई अरेच्चा!' थाटात बोलू लागलेत. ओवेसी म्हणजे दुसरा जीना असल्याचं ते म्हणताहेत. एमआयएमचा प्रचार जहरी असेल तर सनातन प्रभातचा प्रचार काय आहे? ओवेसीला बेडय़ा घाला म्हणणारे दाभोलकर हत्येनंतर 'देवाने शिक्षा दिली, असेच मरण येणार' असं लिहिणाऱ्या 'सनातन'च्या आठवलेंवर कारवाई करा, असे म्हणतील? उद्या सनातन प्रभात अथवा अभिनव भारतने निवडणुका लढविल्या तर ते जिंकणार नाहीत? एमआयएम 'जहर' आहे, तर सनातन प्रभात, अभिनव भारत हे काय 'अमृत' आहे?
दुसरी गोष्ट दिल्लीच्या शाही इमामांच्या नव्या वारसाच्या सोहळ्याची. या सोहळ्याला नवाज शरीफना निमंत्रण; पण मोदींना नाही. पंतप्रधानांना निमंत्रण दिलं नाही म्हणून सर्वानी- अगदी मुस्लिमांनीही इमामांना लक्ष्य केलं. पण शाही इमामांच्या एका प्रश्नाचे उत्तर कुणाकडे नाही. त्यांनी विचारलं, 'मोदींनी स्वत:च्या शपथविधीसाठी सर्व धर्मगुरूंसह नवाज शरीफना बोलावलं, पण मला निमंत्रण दिलं नाही. ते आमच्या कुठल्याच प्रतीकांचा स्वीकार करीत नाहीत. मग मी त्यांना का बोलवावं?'
हा देश विषमतेतून समता, बहुविविधतेतून एकता राखत अखंड राहिलाय. पण नव्या राज्यकर्त्यांना या अखंडातच खंड पाडून या परिवर्तनीय मूळ ढाचालाच नष्ट करायचंय. राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष ही वरवरची लक्ष्यं आहेत. खरं लक्ष्य वेगळंच आहे.
पण हा देश शंबूक, एकलव्य, चार्वाक, चक्रधर, चोखामेळा, सीता, द्रौपदी अशा न-नायक-नायिकांचा आहे. सवाल विचारण्याची परंपरा खंडित झाली, नामशेष झाली, या भ्रमात नवधर्माध, भांडवलदारांनी, शोषणकर्त्यांनी राहू नये. तुम्ही प्रतिमा नाहीशी कराल, प्रतिभा नाही. माणसं संपवाल, पण विचार नाही.
संविधानिक शपथ घेताना ईश्वराला स्मरणे आणि गुन्हेगारी आरोप असलेले महाराज धर्मगुरू म्हणून मंचावर असणे- यातून एकाच जगातली दोन जगं स्पष्ट झालीत. उद्याच्या लढाईतले शत्रू स्पष्ट झालेत. तेव्हा विकासाच्या मुखवटय़ाआडचं विनाशकारी राजकारण सामोरं आणत राहायला हवं. त्याविरुद्ध आवाज उठवत राहिलं पाहिजे. 
शेवटची सरळ रेष : 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात एक जादूचा फोन दिला जाई. त्यावरून त्या सेलिब्रेटीने कुणाही जिवंत/ मृत व्यक्तीला फोन लावायचा असे. एका भागात अशोक हांडे यांनी स्वर्गीय बाळासाहेबांना फोन लावला. त्यांच्याशी बोलता बोलता हमसून हमसून रडत 'बाळासाहेब परत या, परत या' असं ते म्हणाले. तेच अशोक हांडे परवा शाही शपथविधी सोहळ्यात सेनेचा नि:पात करून त्यांना दाती तृण धरायला लावणाऱ्या, 'बाळासाहेबांचा की मोदींचा करिश्मा?' असं आव्हान देणाऱ्या भाजपवासीयांसमोर 'मराठी बाणा' सादर करीत होते! कलाकाराला जात, धर्म, प्रांत, पक्ष नसतो, 'शो मस्ट गो ऑन' हे तत्त्व अशोकजींना महत्त्वाचं वाटलं असणार. आणि आंब्याच्या मोसमात चिकू विकायचा अव्यवहारीपणा त्यांच्यातला मूळ फळविक्रेता कधीच करणार नाही! 

पक्ष हरले, मतदार जिंकले!

Published: Sunday, October 26, 2014

मतदान झाले. मतमोजणी झाली. निकाल लागले. भाजप स्वबळावर अल्पमतातलं सरकार बनवणार, हे स्पष्ट झाले. पूर्ण बहुमतासाठी फक्त २०-२२ आमदार त्यांना कमी पडले. त्यामुळे हा लेख लिहीपर्यंत (आणि कदाचित प्रसिद्ध होईपर्यंत) कुणाच्या पाठिंब्यावर सरकार बनणार आणि मुख्यमंत्री कोण, हे कदाचित स्पष्ट झालेलं असेल अथवा नसेल. कारण केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह यांनी 'दीपावली के बाद' महाराष्ट्रात येणार असे सांगितलेय.
मतदानपूर्व, मतदानोत्तर चाचण्या यांसह संपूर्ण प्रचारकाळ आणि पंधरा ते एकोणीस ऑक्टोबर सकाळपर्यंत विश्लेषक, प्रवक्ते, भाष्यकार आपापल्या परीने पतंग उडवीत होते. लोकांना वाटत होतं, जाहीर प्रचाराप्रमाणे या चर्चानाही बंदी घालायला हवी. नव्या सोसायटीतले नवीन मध्यमवयीन नवश्रीमंत सभासद गणपतीच्या निमित्ताने डोळे बांधून गाढवाला शेपूट लावण्याचा खेळ उत्साहाने खेळतात, तशाच या चर्चा होत्या. कारण प्रत्येकाच्या प्रतिपादनाचा शेवट- 'शेवटी निकाल काय लागतील त्यावरच ठरेल!' असाच असायचा. मग कशाला बोलता? थांबा तोवर! पण नाही.
निकाल लागेपर्यंत भाजप 'जर-तर'ची भाषा अतिआत्मविश्वासाने ठोकरून 'आम्ही पूर्ण बहुमतच नाही, तर १५०-१७० पर्यंत जाऊ,' असंच सांगत होता. उद्धव ठाकरे 'भगवा फडकणार', 'मीच मुख्यमंत्री होणार!' असं म्हणत. आणि मोठय़ा टाईपातल्या मथळ्याखाली बारीक टाईपात उपशीर्षक असावे तसे कु. आदित्य ठाकरे 'उद्धवजीच मुख्यमंत्री होणार!' हे रिपीट करत असे. राष्ट्रवादी यावेळी कुणीही यावे टपली मारून जावे या स्थितीत होता. 'जगातलं जे काही भ्रष्ट ते म्हणजे राष्ट्रवादी' इतपत माध्यमं, सोशल मीडियातून त्यांना लक्ष्य केलं गेलं होतं. आपले पंतप्रधान तर भर बारामतीत त्यांना 'नॅशनल करप्ट पार्टी' म्हणूनच थांबले नाहीत, तर घडय़ाळातले दहा वाजून दहा मिनिटे म्हणजे गुणिले दहा भ्रष्टाचार- असंही म्हणाले! काँग्रेस फक्त दक्षिण कराडमधूनच लढतेय इतपतच प्रचारात होती. पृथ्वीराज चव्हाण स्वत: एकटेच उभे राहिल्यासारखे वावरत होते.
या फुटलेल्या जोडय़ांच्या चौकोनाचा पाचवा कोन मनसे- म्हणजेच राज ठाकरे 'माझ्या हातात महाराष्ट्र द्या, बघा सुतासारखा सरळ करतो!' असं धमकीवजा आवाहन करत होते. म्हणजे भाजप जाहिरातीतून 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?' असं विचारायचा आणि राज ठाकरे 'महाराष्ट्र माझ्या हातात द्या' म्हणायचे! भाजपने यावेळी थेट शिवाजी महाराजांना प्रचारात उतरवलं. 'छत्रपतींचा आशीर्वाद, द्या मोदींना साथ'! स्वत: शिवाजी महाराजही दाढीत हसले असतील आणि मोदींना सभेत जिरेटोप घालून भाषण करायला लावलं नाही म्हणून नि:श्वास टाकून बसले असतील. मोदींना भाषण करण्याची जी चटक लागलीय ती घसा पार बसला तरी त्यांनी सभा, माइक आणि भाषण सोडले नाही. 
भाजपने युती तोडल्यामुळे एरव्हीचे संयमी उद्धव ठाकरे चवताळले आणि आधीचं सरकार भाजप व मोदींचे असल्यासारखेच ते या दोघांवरच बरसत आणि शेवटी बरळत राहिले. यामध्ये भाजपने रणनीती आखून 'मुंबईसह महाराष्ट्र' ताब्यात घेण्याची जी योजना बनविली, ती त्यांनी फक्त गुजराती-मराठीपुरती मर्यादित करून पुन्हा एकदा मराठीची फोडणी हिंदुत्वाच्या आमटीला देऊन पाहिली. भाजपने ना हिंदुत्व आळवलं, ना राम मंदिर, ना स्वतंत्र मुंबई. उलट, जाहीरनाम्यातून स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा वगळून राजकीय चलाखी मात्र केली. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याची जादू संघमुशीतून तयार झालेल्यांना जमते. तेवढय़ासाठी तरी उद्धव ठाकरेंनी नागपूरला जाऊन क्रॅश कोर्स करायला हरकत नाही. लांबचा प्रवास झेपणार नसेल तर कु. आदित्यला जवळच म्हाळगी प्रबोधिनीत पाठवावं. कारण विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यात दिसत नाही, असं पत्रकारांनी आक्रमकपणे विचारताच भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी अजिबात विचलित न होता शांतपणे म्हणाले, 'यात ज्याचा उल्लेख नाही ते करायचेच नाही असे कुठे आहे?' हे असे आणि अशा प्रकारे बोलायला संघ-शिकवणच हवी. याचाच पुढचा भाग म्हणजे बाळासाहेबांना दैवत करून उद्धवसह संपूर्ण सेनेकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करून काँग्रेस-एनसीपीवर मोदींच्या घणाघाती तोफा धडाडत ठेवल्या आणि उद्धव ठाकरेंना भरकटवत ठेवले.
एका पंतप्रधानाने असं एका राज्यात ठाण मांडून बसणं अनेकांना पसंत पडलं नाही. त्याचं प्रतिबिंब निकालात पडलं. मोदींनी सभा घेतलेल्या २० ठिकाणी भाजप उमेदवार पडले. १४५ ची मॅजिक फिगर गाठता आली नाही. पूर्ण बहुमत नाही, तर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला भाजप. लोकसभेच्या यशाच्या पाश्र्वभूमीवर विधानसभेचं यश हे शत-प्रतिशत नसून त्याला किंचित अपयशाची किनार आहे.
आता सगळा धुरळा खाली बसल्यावर शांतपणे महाराष्ट्राच्या राजकीय चित्राकडे बघितले तर काय दिसते? सर्व पक्ष हरले आणि मतदार जिंकले!
मतदारांनी भाजपच्या उन्मादाला चाप लावून त्यांना इतरांच्या मदतीची पाचर मारून ठेवली. शिवसेनेला मराठी की हिंदुत्व, छोटा भाऊ की मोठा भाऊ, लोकसभा विजयाचे शिल्पकार बाळासाहेब की मोदी, याचे उत्तर ६३ आमदार निवडून देऊन परस्पर देऊन टाकले. काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांनी 'तुम्हे ऐसी जगह मारूँगा जहाँ पानी तो होगा, मगर पिलानेवाला कोई नहीं होगा' अशा अवस्थेत नेऊन सोडलं. संजय लीला भन्साळीचा 'सावरियाँ' एकेकाळी ब्लू फिल्म म्हणून (रंगावरून) गाजला आणि पडला. राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटची अशीच वाताहत मतदारांनी लावली. मनसे स्थापनेनंतर राज ठाकरे कालपर्यंत 'मी एकटा, मला कुणी नको, ना मी कुठे जाणार' असं म्हणत. ते लोकांनी इतकं मनावर घेतलं, की त्यांचा एकच आमदार निवडून दिला आणि म्हणाले, 'जा एकटा!'
बाकी जागावाटपाच्या वेळी जवळपास १३०-१४० जागांची मागणी करणारे राजू शेट्टी, जानकर, आठवले, मेटे यांनी किती जागा लढवल्या आणि किती जिंकल्या, हे ऐकण्यात मतदारांनाच काय, भाजपलाही स्वारस्य नव्हते. महायुतीच्या विजयात भाजपचेच झेंडे फडकले. उपचारापुरतेदेखील या दोस्तांना कुणी पुढे आणले नाही.
खूप शांत आणि तटस्थपणे विचार केला तर काय दिसतं? भाजप १२३ आमदारांसह सत्ताधारी होणार. त्याचवेळी सेना ६३ + काँग्रेस ४२ + राष्ट्रवादी ४१ + १ मनसे + १५ अपक्ष असे १६२ आमदार विरोधात निवडून आलेत. २८८ आमदारांच्या सदनात आकडेवारीत विरोधी आकडेवारी जास्त आहे!
मोदी लाट, पंधरा वर्षांचा भ्रष्ट कारभार असूनही २८८ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे ८३ आमदार पुन्हा निवडून आलेत. लोकसभेच्या यशाच्या पाश्र्वभूमीवर तर भाजपचे हे अपयशच म्हणायला हवे. म्हणजे लोकसभेला युती नसती तर निकाल बदलले असते! सहकारी पक्षांना संपवताना महाराष्ट्रात तरी भाजपला सहकारी आणि सत्ताधारी पक्षांना म्हणावं तितकं नामोहरम करता आलेलं नाही. २५ आमदारांची जुळवाजुळव करताना त्यांना घोडेबाजार तेजीत आणावा लागेल. भाजपचं आणखी एक अपयश म्हणजे या  १२३ मध्ये त्यांनी आयात केलेल्या ५९ पैकी २०-२२ जण आहेत. २००९ च्या ४६ च्या तिप्पट आमदार निवडून आणले, असं सांगताना आजवरची त्यांची महाराष्ट्रातली (युती सरकारच्या वेळची) ६० च्या पुढची फिगर ते लपवतात. म्हणजे या बेरजा- वजाबाक्या केल्या तर दहा दिवस मोदींनी ठाण मांडून जास्तीच्या फक्त ३०-४० जागाच मिळाल्यात आणि सत्ताधाऱ्यांच्या साधारण तेवढय़ाच कमी! थोडक्यात, भाजप शत-प्रतिशत नाही आणि सत्ताधाऱ्यांचं पानिपतही नाही. 
पण शेवटी 'यश' हे 'यश' असतं असं म्हणतात. भाजपला १२३ जागा मिळताच राष्ट्रवादीने लगेचच बिनशर्त पाठिंबा दिला. तर ६३ आकडय़ाने जमिनीवर आलेले उद्धव ठाकरे 'प्रस्ताव आला तर-' इथपासून सुरू करून मोदी-शहांना अभिनंदनाचे फोन करूनच थांबले नाहीत, तर दोन देसाईंना दिल्लीदरबारी तहासाठी धाडले व स्वत: चहावाल्याला मुख्यमंत्री न होता भेटायला जायला तयार झाले!
कालपर्यंत 'अफझल खानाच्या फौजा, दिल्लीच्या तालावर नाचणार नाही, उंदीर कोण कळेल' असं मर्द मावळ्याच्या आवेशात बोलणारे उद्धव ठाकरे एकदम मवाळ मावळे झाले! महाराजांनी आग्य्राहून सुटका करून घेतली; पण हे स्वत:च बंदिवान होऊन आग्य््रााला निघालेत! अफझल खानाचा कोथळा काढणारे आता दिवाळी फराळाचं ताट घेऊन दिल्लीदरबारी रुजू होतील. या मवाळपणाचं कारण एकच : मोदींच्या याच झंझावाताने मुंबई महापालिकेच्या २६०० कोटी रुपये बजेटच्या पालिकेचा ताबा घेतला तर सेनेची रसद तुटून ती रस्त्यावर येईल. ठाणे, कल्याण सगळ्याच ठिकाणच्या सुभेदाऱ्या जातील. आणि नरेंद्र मोदी एक-एक गोष्टीचा हिशोब व्याजासह परत करणारे गृहस्थ आहेत. अमित शहा त्यांचे मुनीम आहेत. रंगशारदात आदित्यला पाठवायचे समर्थन करणारे उद्धव ठाकरे आता दिल्लीला का नाही पाठवत युवराजांना?


फार पूर्वी मी बाळासाहेबांची मुलाखत घेतली होती. साधारण ८५ साली. तेव्हा बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, 'मी पुनर्जन्म वगैरे मानत नाही. माझ्यानंतर सेनेचं काय होणार, याचाही विचार मी करत नाही. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत सेनेत माझाच शब्द चालणार!' तेव्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं स्वप्न, पुण्याई, त्यांचा आत्मा याचं भांडवल करू नये. स्वत: बाळासाहेब असताना मनोहर जोशी, नवलकर, वामनराव, दत्ताजी साळवी, सरपोतदार असे दमदार वक्ते सोबत वागवीत. प्रसंगी त्यांच्या स्वतंत्र सभा लावीत. आदित्यला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याऐवजी चंद्रकांत खरे, गीते, दिवाकर रावते, अरविंद सावंत यांना भाषणं करायला का लावली नाहीत? का त्यांच्या सभा लावल्या नाहीत? नीलम गोऱ्हे, शिवतरे, श्वेता परुळेकर यांनी नक्कीच सभा गाजवल्या असत्या. शेतकरी, कामगार, महिला यांचे प्रश्न त्यांनी मांडले असते. नेतृत्वाची फळी दिसली असती. वेगळे विषय बोलले गेले असते.
जी चूक राज ठाकरेंनी केली तीच उद्धव ठाकरेंनी केली. पीएच्या जिवावर पक्ष चालवता येत नसतो. आज सेनेत जी सेकंड रँक लीडरशिप आहे ती उद्धव यांना सर्वार्थाने सीनियर आहे! मग राहुल गांधी आणि तुमच्यात काय फरक? वारसा हक्क जन्मदाखल्याने मिळवता येतो; पण वारसा सांभाळायला कर्तृत्वच लागते. या निवडणुकीतून एवढे शिकले तरी पुरे.
राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा देऊन अटकपूर्व जामीन अर्ज भरलाय, असं गमतीने उपहासाने म्हटलं जातंय. पण भ्रष्टाचार, घोटाळे यांची चौकशी होऊन जेलमध्ये जावे लागेल या भीतीने शरद पवार काही करत असतील असं समजणं भाबडेपणाचं ठरेल!
९५ ला युतीचं सरकार आलं तेव्हा मुंडेंनी शरद पवारांवर असेच आरोप केले होते. भूखंडांचे श्रीखंड, एन्रॉन, दाऊद, ट्रकभर पुरावे सगळं होतं. राज्यात व केंद्रात 'भाजप' सहभागी सरकारं होती. चांगली पाच वर्षे होती. पवारांना काही होणं सोडाच; युती सरकार सत्तेत येण्यासाठी अपक्षांची फौज पवारांनीच पाठवली होती. 'हेलिकॉप्टरमधून गुंड आणले' म्हणणारे गडकरी वगैरेच नंतर पवारांसोबत हेलिकॉप्टरमधून बसून फिरून आलेत. कितीही एकमेकांवर टीका केली तरी महाराष्ट्रात युतीचं सरकार असताना केंद्रात पवार आपत्ती व्यवस्थापन हा विभाग केंद्रीय मंत्र्याचा दर्जा घेऊन सांभाळत होते!
त्यामुळे उद्या भाजपने 'राष्ट्रवादीचा पाठिंबा हा आपदधर्म आहे आणि घोटाळ्यांची चौकशी करून त्यांना तरुंगात धाडणे हा शाश्वत धर्म आहे,' असं सांगितल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. 
म्हणूनच यावेळी सर्व पक्ष हरले असून मतदार जिंकलेत! त्यांनी महाराष्ट्र कुठे आहे आणि तुम्हा सर्वाच्या जागा कुठे, हे नीट दाखवलंय.


शेवटची सरळ रेघ- 'पाठिंबा सेनेचा घ्या अथवा राष्ट्रवादीचा- मला महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री, विधान परिषद, महामंडळे द्या,' हे आपलं भरतवाक्य रामदास आठवले कधी (आणि किती वेळा) म्हणणार? त्यांना एकाच वेळी ही सर्व पदे 'अपवाद' म्हणून द्यायला काय हरकत आहे. 

महाराष्ट्रच नेऊन ठेवेल..

Published: Sunday, October 12, 2014

खरं तर गोष्ट फार सोपी होती. एक वटवृक्ष उन्मळून पडल्यावर उर्वरित झाडेझुडपे साफ करायला फार ताकदीची, कष्टाची आणि वेळेचीही गरज नव्हती. १६ मे नंतर वातावरण पूर्ण बदललं होतं. नव्या अपेक्षा, उत्साह यात देश न्हाऊन निघत होता. महाराष्ट्रही याला अपवाद नव्हता. पुढच्या सहा महिन्यांतच होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल १६ मेलाच लागला होता. युतीची महायुती झाल्याने सोशल इंजिनीअरिंगही व्यवस्थित झालं होतं. महायुतीतल्या घटक पक्षांची ताकद मर्यादित असली तरी ताकद होती. भाजपमध्ये राहूनही मध्यम कनिष्ठ जाती, भटके विमुक्त, मुस्लिम यांची मोट बांधण्याचे कसब गोपीनाथ मुंडेंनी कमवले होते. युतीची महायुती करण्याची रणनीती यशस्वी ठरली होती. पण मुंडेंच्या आकस्मिक निधनाने बसलेला चटका विधानसभेच्या विजयात परावर्तित करण्याच्या मन:स्थितीत, महायुतीच्या मतदारांसह महाराष्ट्रातली तमाम जनता आघाडी सरकारच्या विसर्जनाची औपचारिकता पार पाडण्यासाठी निवांत झाली होती. प्रचाराला १२ दिवसच मिळणार या बातमीचा मतदारांवर काहीच परिणाम झाला नाही, कारण मनोमन त्यांनी लावायचा त्यांचा निकाल लावला होता. १२ दिवस काय, दोन दिवसांतही त्यांनी स्पष्ट कौल दिला असता.
पण अश्वमेधावर आरूढ भाजपचे सरदार घोडय़ापेक्षा जास्त फुरफुरू लागले! त्यांच्या अंगात सिकंदर संचारला. त्यात मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने तर १६ मेच्या यशानंतर एनडीएच्या घटक पक्षांना बाजूला काढायचा पणच केला. परिणामस्वरूप चर्चेची गुऱ्हाळं लावत भाजपने 'अचानक झालं', 'दु:खद झालं' असा अभिनय करत युती तोडली. युतीसोबत महायुतीही तुटली. प्रतिक्षिप्त क्रियेसारखी आघाडीही तुटली आणि सरळ सामना पंचरंगी करून भाजपने सोपे गणित कठीण करून टाकले. आकांक्षा जेव्हा लालसेत बदलते तेव्हा अशी विनाशकाले विपरीत बुद्धी सुचते! आता या पंचरंगी लढतीत आघाडीला आपले वस्त्रहरण रोखता येईल. जाती-पातीच्या राजकारणाला ऊत येईल. पैशाचा पाऊस पडेल. 'कुछ भी हो सकता है' अशा वातावरणात आघाडीला पुन्हा सत्ता मिळण्याची स्वप्ने पडली तर तो त्यांचा निलाजरेपणा नाही तर भाजपच्या अहंगंडाने त्यांनी ती संधी दिली आहे.
युती तुटल्यावर भाजपने घटक पक्षांना सोबत ठेवत सेनेची कोंडी करत वर मानभावीपणाने 'आम्ही सेनेवर बोलणार नाही' असा लबाड पवित्रा घेतला. सेनेने मात्र चवताळलेल्या वाघासारखी भाजपवर टीका सुरू केली. बैठकांचे तपशील उघड होऊ लागले. आकडय़ांचे खेळ रंगू लागले. खऱ्याखोटय़ाचे पत्ते उघड होऊ लागले. सपासप वार होऊ लागले. चार महिन्यांपूर्वीच गळ्यात गळे घालणारे एकमेकांचा केसाने गळा कापू लागले. उमेदवार पळवापळवी, लांच्छनास्पद पक्षांतरे, पातळी सोडून केल्या जाणाऱ्या आरोपांना ऊत आला. त्यात 'रुबिक क्युब मास्टर' साहेबाचीच ही खेळी असा एक संदेशही पसरला. दर दिवशी शरद पवारांच्या नावे नवे समीकरण जन्माला येते आहे. साधी सरळ निवडणूक पोरखेळ पातळीवर आणल्याने सर्वपक्षीय मतदार भयंकर नाराज आहे. आपल्याला 'गृहीत' धरून राजकारण्यांचे चाललेले बेशरम चाळे हातावर हात ठेवून बघण्यापलीकडे काही करू शकत नाही.

खरी गोष्ट काय, खोटी गोष्ट काय, चूक कोणाची या तपशिलात जाऊनही सर्वसाधारण मतदारांत भाजपच्या छप्पन्न इंची छातीचा गर्वाने फुगलेला फुगा आणि त्यातल्या अति आत्मविश्वासाच्या हवेने नाराजी आहे. आपण देश जिंकला, आता महाराष्ट्र पादाक्रांत करायला कशाला कुणाची सोबत हवी, ही मग्रुरी जन्मण्याचं कारण नरेंद्र मोदी.
मोदींच्या करिश्म्यावर, जादूवर आपण देशात जसं स्वबळावर सरकार स्थापलं तसं महाराष्ट्रातही स्थापन करू या मनोविकारानं त्यांना पछाडलं. अमित शहा आणि मोदींनी त्याला मूकपाठिंबा दिला. भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे फक्त मोदी, आणि फक्त मोदी म्हणजे विजय या भ्रमाला मधल्या काही पोटनिवडणुकांनी इशारा दिला होता. पण विरोधकांना गणतीत काय खिजगणतीतही न धरण्याची मोदींची अहंमन्य वृत्ती या पराभवाने विचलित होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण आपल्यातले न्यून झाकायचे आणि बाकीचेच इतके मोठे करायचे की ते 'न्यून' अगदीच न्यून होऊन जावे. 
२५ वर्षांची युती आणि सहा महिन्यांपूर्वीची महायुती तोडताना भाजपची कसलीही राजकीय अपरिहार्यता नव्हती. होती फक्त सत्ता लालसा! आज त्यांना ज्या शाब्दिक कसरती कराव्या लागताहेत किंवा सेनेवर न बोलण्याच्या सुसंस्कृत मुखवटय़ाआड त्यांचा दांभिक चेहरा झाकण्याची सोय हे सगळे त्यांना विजयाऐवजी पराजयाकडेच घेऊन जाणार आहे. 'रामा'कडून 'छत्रपती शिवरायांकडे' वळण्याची अगतिकता हे सगळं मतदारांना कळत नसेल? दुधावर ताव मारून मिशा पुसून बसणाऱ्या बोक्यासारखी भाजपची प्रतिमा झालीय.
नरेंद्र मोदींवर, महाराष्ट्रानेच नाही तर दक्षिणेचा आणि पूर्वेचा काही भाग वगळता संपूर्ण देशाने विश्वास टाकला. ते जायंट नाही तर महाजायंट ठरले, पण या प्रवासात त्यांनी विरोधी पक्षासोबत स्वपक्षातल्या लोकांनाही दूर लोटले. मी आणि फक्त मी!
३० वर्षांच्या कालखंडानंतर देशात काँग्रेसेतर पक्षाची स्वबळावर सत्ता आणणारा नेता, आज देशाचा पंतप्रधान आहे. पण दिल्ली सोडून महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेसाठी १०-१२ दिवस ठाण मांडून होते मोदी! शरद पवार सोडले तर ते कुणाशी लढाई खेळत होते? उद्धव आणि राज ठाकरे यांच्याशी! देशाचा पंतप्रधान प्रादेशिक पक्षांच्या दोन तरुण नेत्यांशी दोन हात करण्यासाठी मुक्काम ठोकतो? मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन केलेली सेना सेनाप्रमुखांनी भाजपच्या बरोबरीने हिंदुत्वाकडे वळवली, म्हणून ही जनसंघाची मिणमिणती पणती, भाजपच्या नव्या अवतारात कमळ बनून महाराष्ट्रभर उमलली! अगदी मागच्या निवडणुकांपर्यंत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला सेनेमुळे सर्वदूर पसरता आलं. आज मोदी काय मिळाले, महाराष्ट्र भाजपला वाटले, आता काय कुणाची गरज? बाळासाहेबांच्या निधनानंतर सेनेला खिंडीत गाठायचे, मातोश्रीचे महत्त्व कमी करायचे आणि वर मोदी म्हणणार बाळासाहेबांच्या स्मृतीला स्मरून, त्यांचं योगदान मानून 'सेने'वर बोलणार नाही! मोदींची चलाखी इथेच संपत नाही. ते म्हणतात, 'केंद्रातून मला महाराष्ट्रात मदत करायची आहे तेव्हा इथे मला प्रतिसाद देणारं, साथ देणारं सरकार हवं आहे, म्हणून भाजपला विजयी करा!' २५ वर्षांचा मित्रपक्ष तुम्हाला तुमचा वाटत नाही? काँग्रेसने जसे गांधी भिंतीवर टांगले तसे बाळासाहेबांना भिंतीवर टांगून तुम्ही सत्ता ओरपणार? वाजपेयी केंद्रात होते तेव्हा महाराष्ट्रातल्या सेनेच्या मुख्यमंत्र्याशी त्यांचा संवाद होता, मग तुमचा का नाही होणार? नाही होणार, कारण मोदींना कुणाशी संवादच नकोय. अहम् ब्रह्मास्मि! त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना जिथे ते जुमानत नाहीत, तिथे मित्रपक्ष काय चीज? असाच 'अहम्' इंदिरा गांधींत शिरला होता आणि 'इंदिरा इज इंडिया' ही घोषणा जन्माला आली होती. मतदारांनी त्यांना 'इंडिया' म्हणजे कोण हे दाखवून दिलं. तसंच आज 'मोदी मोदी' करणारे काही दिवसांनी 'मोडीत' निघू शकतात, हे मोदींसकट मोदीप्रेमींनी लक्षात ठेवावं.
मोदींना व्यक्तिमत्त्व आहे, वक्तृत्व आहे. मनमोहन सिंगांच्या १० वर्षांच्या मौनी कारभारानंतर मोदी म्हणजे मुक्याला कंठ फुटावा तसे झाले. पण लोकांना आवडतेय म्हटल्यावर त्यांनी राज्यकारभारापेक्षा भाषणांचाच सपाटा लावला. परदेशी पाहुणे देशात आणणे किंवा आपण परदेशी जाणे आणि भाषण ठोकणे हा एक नवाच उद्योग सुरू केला. दूरचित्रवाणीचा पडदा कमी पडला, म्हणून आता ते आकाशवाणीवरही बोलू लागले आहेत. या वेगाने ते प्रा. शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर आणि बाबासाहेब पुरंदरेंचाही विक्रम मोडतील!
त्यात आता आत्मस्तुतीही येऊ लागलीय. आजवर अमेरिकेत असं स्वागत, असा मान कुठल्या पंतप्रधानांना ६० वर्षांत मिळाला आहे, असा प्रश्न करून ते विचारतात, 'कुणामुळे मिळाला?' लोक 'मोदी' असे ओरडतात. मग हे नाटय़मय विनयाने 'नही, १२५ करोड हिंदुस्थान की जनता की वजह से!' असं म्हणणार!
'अहम् ब्रह्मास्मि'ग्रस्त मोदीजींना माहिती नाही की, भारतात पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त लोकप्रियता नेहरूंची होती. नेहरूंचे कपडे पॅरिसला धुवायला जातात हे लोक कौतुकाने सांगत. 'चाचा नेहरू' ही उपाधी त्यांना सहजपणे मिळाली आणि अमेरिका आणि भारत या इतिहासात बघायचं तर नेहरू आणि जॉन केनेडी यांची भेट इतकी गाजली, की लोकांनी घराघरात नेहरू-केनेडींचे फोटो लावले होते. तसे ओबामा-मोदींचे लागले? आणि इंदिरा गांधींनी तर अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता, पूर्व पाकिस्तान तोडून बांगलादेशची निर्मिती केली. याउलट यंदा चीनचे पंतप्रधान येऊन गेले न् गेले तर चीनने घुसखोरी केली आणि पाकशी वाटाघाटी बंद करूनही त्यांनी 'एलओसी'वर भारतीय जवानांना शहीद केले! तेव्हा आमचे पंतप्रधान 'शत प्रतिशत भाजप'साठी बीड, औरंगाबाद, मुंबई फिरत होते. अमेरिकेतला सत्कार सोहळा देखणा भव्यदिव्य होता, पण तो अमेरिकनांनी नाही, तिथल्या भारतीयांनी- त्यातही अधिकतर गुर्जर बांधवांनी केला. चीन, जपान, अमेरिका गुंतवणूक करणार अशा घोषणा होताहेत. पण विरोधाभास असा, की अरुणाचलमध्ये घुसखोरी करून वर आडमुठय़ा राहणाऱ्या चीनला आपण यूपीत तीन एसईझेड मंजूर करून दिले. तिथे कामगार कोण असणार यावरचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनीच दिली. अमेरिका दौऱ्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची देहबोली खूप काही सांगत होती. रशियाचा पोलादी पडदा जिथे फाटू शकतो, तिथे मोदींचा 'हम करेसो कायदा' किती दिवस चालणार?
शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंविषयीचा कळवळा म्हणजे मेलोड्रामाचा नवा अवतार! म्हणे, 'गोपीनाथ मुंडे असते तर मला यावं लागलं नसतं!' मग लोकसभेला का फिरलात? मुंडे होते की! मुंडेंची एवढी ताकद मानता तर मंत्रिपद देताना खळखळ का केली आणि मुंडेंची चिता विझायच्या आत संध्याकाळी सहा वाजता त्यांची खाती गडकरींकडे सोपवल्याची बातमीही येते! संपूर्ण प्रचारात मोदी मुंबई आणि महाराष्ट्र असा स्वतंत्र उल्लेख करत होते. कशाला? मुंबई महाराष्ट्रात नाही? मुंबईच्या निवडणुका वेगळ्या होताहेत?
आश्चर्य वाटतं राजू शेट्टींचं! त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात त्यांच्या कृषीमंत्र्यांचे पुतळे जाळले, स्वत: शेट्टींनी महायुतीतून बाहेर पडायची धमकी दिली होती. त्यांच्यासह जानकर, आठवले यांची नावं सोडा, दखलही घेतली नाही. जानकरांनी पंकजाला बहीण मानल्याने त्यांचा नाइलाज आहे; तर आठवले ५२ पत्त्यांत एक जोकर असतो तसे युती असो, आघाडी असो, रिडालोस असो, रंगीबेरंगी अवतारात चारोळ्या करत हजर असतात. मोदींनी अप्रत्यक्षपणे तुमची गरज नाही हे अधोरेखित केले. २५ वर्षे मित्र पक्ष असलेल्या आणि १५ च्या वर खासदार निवडून आणलेल्या सेनेला त्यांनी ओवाळून टाकलेलं अवजड उद्योग खातं दिलं, ते मोदी आठवलेंना मंत्री करणार? राज्यात मंत्रिपद, महामंडळं देणार?
मोदींनी आता भाषणबाजी आणि भपकेबाज योजनांचे इव्हेंट सोडून देश कारभार करावा. ते स्वप्रेमाने इतके आंधळे झालेत की उदाहरण म्हणून त्यांना फक्त गुजरातच दिसतो! शिवराज सिंह चौहान, रमणसिंग या भाजप मुख्यमंत्र्यांचा दाखला सोडा, ते नावही घेत नाहीत. तेही मोदींप्रमाणे सातत्याने निवडून येताहेत. अन्नसुरक्षा योजना काँग्रेसपेक्षा रमणसिंगानी सक्षमपणे राबवलीय. पण मी, मी आणि मी ही प्रतिमा लोक अजून वर्षभर सहन करतील. नंतर हिशेब मागायला लागतील. 'दागी' लोकांना स्थान नाही म्हणणाऱ्या मोदींच्या पक्षाचा अध्यक्ष डझनभर गुन्ह्यांत आरोपी आहे, तर उपाध्यक्ष येडीयुरप्पा भ्रष्टाचारामुळे राजीनामा द्यावे लागलेले वादग्रस्त आणि जातीग्रस्त पुढारी आहेत.
मोदी असल्याने आपण कमरेचे काढून डोक्याला बांधलं तरी लोक खांद्यावर घेतील असं प्रदेश भाजपला वाटल्याने त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष, लोकसंग्राम अशा पक्षांतल्या त्यांनीच भ्रष्ट ठरवलेल्या ५५ ते ६० लोकांना उमेदवारी दिली आहे. या दागी राष्ट्रवादी नेत्यांचे समर्थन करताना फडणवीस एखाद्या ह.भ.प. सारखे आपद्धर्म, शाश्वत धर्म वगैरे बडबडत होते. याला धरून मग पुढे समन्वय धर्म, तडजोड धर्म, क्षमा धर्म, पापक्षालन काहीही येऊ शकतं!
मुळात सत्ताधारी जेवढे बेबंद होते, तेवढेच विरोधी सेना-भाजपही निष्क्रिय होते. भ्रष्टाचार हा आघाडीच्या अंतर्गत वादातून माध्यमात पोहचला. विरोधकांचे कार्य शून्य! पण केंद्र सरकारला जसे लोक विटले तसेच इथल्या आघाडीला विटले आहेत. महायुती हा सक्षम पर्याय त्यांना समोर दिसत असताना, २५ वर्षीय स्थानिक मित्रपक्षाला कोंडीत पकडून मोदी अ‍ॅण्ड कंपनी महाराष्ट्र पुन्हा एकदा दिल्लीच्या पर्यायाने गुजरातच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करताहेत.
पण महाराष्ट्राची जनता, 'कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?' या सवालाला 'महाराष्ट्र नेऊन ठेवेल तुम्हाला.. योग्य जागी' असं खणखणीत उत्तर देईल. शेवटी कुठलाही मीपणा महाराष्ट्र खांद्यावर घेत नाही हे मोदींनाही कळणं गरजेचं आहे.
आघाडीला लोकसभेत समज दिली, भाजपला ती इतक्या लवकर द्यावी लागेल असं मतदारांना वाटत नव्हतं. पण नाइलाज को क्या इलाज? 

शेवटची सरळ रेघ-  रामदास आठवले म्हणाले, मोदी बुद्धाचाच विचार मांडताहेत. सिद्धार्थाने बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करून बोधित्व प्राप्त केलं. मोदींचं बोधीत्व ऐकताना रामदास आठवले नेमके कुठल्या झाडाखाली बसले होते हे तपासावे लागेल!