Thursday, 18 December 2014

पक्ष हरले, मतदार जिंकले!

Published: Sunday, October 26, 2014

मतदान झाले. मतमोजणी झाली. निकाल लागले. भाजप स्वबळावर अल्पमतातलं सरकार बनवणार, हे स्पष्ट झाले. पूर्ण बहुमतासाठी फक्त २०-२२ आमदार त्यांना कमी पडले. त्यामुळे हा लेख लिहीपर्यंत (आणि कदाचित प्रसिद्ध होईपर्यंत) कुणाच्या पाठिंब्यावर सरकार बनणार आणि मुख्यमंत्री कोण, हे कदाचित स्पष्ट झालेलं असेल अथवा नसेल. कारण केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह यांनी 'दीपावली के बाद' महाराष्ट्रात येणार असे सांगितलेय.
मतदानपूर्व, मतदानोत्तर चाचण्या यांसह संपूर्ण प्रचारकाळ आणि पंधरा ते एकोणीस ऑक्टोबर सकाळपर्यंत विश्लेषक, प्रवक्ते, भाष्यकार आपापल्या परीने पतंग उडवीत होते. लोकांना वाटत होतं, जाहीर प्रचाराप्रमाणे या चर्चानाही बंदी घालायला हवी. नव्या सोसायटीतले नवीन मध्यमवयीन नवश्रीमंत सभासद गणपतीच्या निमित्ताने डोळे बांधून गाढवाला शेपूट लावण्याचा खेळ उत्साहाने खेळतात, तशाच या चर्चा होत्या. कारण प्रत्येकाच्या प्रतिपादनाचा शेवट- 'शेवटी निकाल काय लागतील त्यावरच ठरेल!' असाच असायचा. मग कशाला बोलता? थांबा तोवर! पण नाही.
निकाल लागेपर्यंत भाजप 'जर-तर'ची भाषा अतिआत्मविश्वासाने ठोकरून 'आम्ही पूर्ण बहुमतच नाही, तर १५०-१७० पर्यंत जाऊ,' असंच सांगत होता. उद्धव ठाकरे 'भगवा फडकणार', 'मीच मुख्यमंत्री होणार!' असं म्हणत. आणि मोठय़ा टाईपातल्या मथळ्याखाली बारीक टाईपात उपशीर्षक असावे तसे कु. आदित्य ठाकरे 'उद्धवजीच मुख्यमंत्री होणार!' हे रिपीट करत असे. राष्ट्रवादी यावेळी कुणीही यावे टपली मारून जावे या स्थितीत होता. 'जगातलं जे काही भ्रष्ट ते म्हणजे राष्ट्रवादी' इतपत माध्यमं, सोशल मीडियातून त्यांना लक्ष्य केलं गेलं होतं. आपले पंतप्रधान तर भर बारामतीत त्यांना 'नॅशनल करप्ट पार्टी' म्हणूनच थांबले नाहीत, तर घडय़ाळातले दहा वाजून दहा मिनिटे म्हणजे गुणिले दहा भ्रष्टाचार- असंही म्हणाले! काँग्रेस फक्त दक्षिण कराडमधूनच लढतेय इतपतच प्रचारात होती. पृथ्वीराज चव्हाण स्वत: एकटेच उभे राहिल्यासारखे वावरत होते.
या फुटलेल्या जोडय़ांच्या चौकोनाचा पाचवा कोन मनसे- म्हणजेच राज ठाकरे 'माझ्या हातात महाराष्ट्र द्या, बघा सुतासारखा सरळ करतो!' असं धमकीवजा आवाहन करत होते. म्हणजे भाजप जाहिरातीतून 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?' असं विचारायचा आणि राज ठाकरे 'महाराष्ट्र माझ्या हातात द्या' म्हणायचे! भाजपने यावेळी थेट शिवाजी महाराजांना प्रचारात उतरवलं. 'छत्रपतींचा आशीर्वाद, द्या मोदींना साथ'! स्वत: शिवाजी महाराजही दाढीत हसले असतील आणि मोदींना सभेत जिरेटोप घालून भाषण करायला लावलं नाही म्हणून नि:श्वास टाकून बसले असतील. मोदींना भाषण करण्याची जी चटक लागलीय ती घसा पार बसला तरी त्यांनी सभा, माइक आणि भाषण सोडले नाही. 
भाजपने युती तोडल्यामुळे एरव्हीचे संयमी उद्धव ठाकरे चवताळले आणि आधीचं सरकार भाजप व मोदींचे असल्यासारखेच ते या दोघांवरच बरसत आणि शेवटी बरळत राहिले. यामध्ये भाजपने रणनीती आखून 'मुंबईसह महाराष्ट्र' ताब्यात घेण्याची जी योजना बनविली, ती त्यांनी फक्त गुजराती-मराठीपुरती मर्यादित करून पुन्हा एकदा मराठीची फोडणी हिंदुत्वाच्या आमटीला देऊन पाहिली. भाजपने ना हिंदुत्व आळवलं, ना राम मंदिर, ना स्वतंत्र मुंबई. उलट, जाहीरनाम्यातून स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा वगळून राजकीय चलाखी मात्र केली. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याची जादू संघमुशीतून तयार झालेल्यांना जमते. तेवढय़ासाठी तरी उद्धव ठाकरेंनी नागपूरला जाऊन क्रॅश कोर्स करायला हरकत नाही. लांबचा प्रवास झेपणार नसेल तर कु. आदित्यला जवळच म्हाळगी प्रबोधिनीत पाठवावं. कारण विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यात दिसत नाही, असं पत्रकारांनी आक्रमकपणे विचारताच भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी अजिबात विचलित न होता शांतपणे म्हणाले, 'यात ज्याचा उल्लेख नाही ते करायचेच नाही असे कुठे आहे?' हे असे आणि अशा प्रकारे बोलायला संघ-शिकवणच हवी. याचाच पुढचा भाग म्हणजे बाळासाहेबांना दैवत करून उद्धवसह संपूर्ण सेनेकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करून काँग्रेस-एनसीपीवर मोदींच्या घणाघाती तोफा धडाडत ठेवल्या आणि उद्धव ठाकरेंना भरकटवत ठेवले.
एका पंतप्रधानाने असं एका राज्यात ठाण मांडून बसणं अनेकांना पसंत पडलं नाही. त्याचं प्रतिबिंब निकालात पडलं. मोदींनी सभा घेतलेल्या २० ठिकाणी भाजप उमेदवार पडले. १४५ ची मॅजिक फिगर गाठता आली नाही. पूर्ण बहुमत नाही, तर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला भाजप. लोकसभेच्या यशाच्या पाश्र्वभूमीवर विधानसभेचं यश हे शत-प्रतिशत नसून त्याला किंचित अपयशाची किनार आहे.
आता सगळा धुरळा खाली बसल्यावर शांतपणे महाराष्ट्राच्या राजकीय चित्राकडे बघितले तर काय दिसते? सर्व पक्ष हरले आणि मतदार जिंकले!
मतदारांनी भाजपच्या उन्मादाला चाप लावून त्यांना इतरांच्या मदतीची पाचर मारून ठेवली. शिवसेनेला मराठी की हिंदुत्व, छोटा भाऊ की मोठा भाऊ, लोकसभा विजयाचे शिल्पकार बाळासाहेब की मोदी, याचे उत्तर ६३ आमदार निवडून देऊन परस्पर देऊन टाकले. काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांनी 'तुम्हे ऐसी जगह मारूँगा जहाँ पानी तो होगा, मगर पिलानेवाला कोई नहीं होगा' अशा अवस्थेत नेऊन सोडलं. संजय लीला भन्साळीचा 'सावरियाँ' एकेकाळी ब्लू फिल्म म्हणून (रंगावरून) गाजला आणि पडला. राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटची अशीच वाताहत मतदारांनी लावली. मनसे स्थापनेनंतर राज ठाकरे कालपर्यंत 'मी एकटा, मला कुणी नको, ना मी कुठे जाणार' असं म्हणत. ते लोकांनी इतकं मनावर घेतलं, की त्यांचा एकच आमदार निवडून दिला आणि म्हणाले, 'जा एकटा!'
बाकी जागावाटपाच्या वेळी जवळपास १३०-१४० जागांची मागणी करणारे राजू शेट्टी, जानकर, आठवले, मेटे यांनी किती जागा लढवल्या आणि किती जिंकल्या, हे ऐकण्यात मतदारांनाच काय, भाजपलाही स्वारस्य नव्हते. महायुतीच्या विजयात भाजपचेच झेंडे फडकले. उपचारापुरतेदेखील या दोस्तांना कुणी पुढे आणले नाही.
खूप शांत आणि तटस्थपणे विचार केला तर काय दिसतं? भाजप १२३ आमदारांसह सत्ताधारी होणार. त्याचवेळी सेना ६३ + काँग्रेस ४२ + राष्ट्रवादी ४१ + १ मनसे + १५ अपक्ष असे १६२ आमदार विरोधात निवडून आलेत. २८८ आमदारांच्या सदनात आकडेवारीत विरोधी आकडेवारी जास्त आहे!
मोदी लाट, पंधरा वर्षांचा भ्रष्ट कारभार असूनही २८८ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे ८३ आमदार पुन्हा निवडून आलेत. लोकसभेच्या यशाच्या पाश्र्वभूमीवर तर भाजपचे हे अपयशच म्हणायला हवे. म्हणजे लोकसभेला युती नसती तर निकाल बदलले असते! सहकारी पक्षांना संपवताना महाराष्ट्रात तरी भाजपला सहकारी आणि सत्ताधारी पक्षांना म्हणावं तितकं नामोहरम करता आलेलं नाही. २५ आमदारांची जुळवाजुळव करताना त्यांना घोडेबाजार तेजीत आणावा लागेल. भाजपचं आणखी एक अपयश म्हणजे या  १२३ मध्ये त्यांनी आयात केलेल्या ५९ पैकी २०-२२ जण आहेत. २००९ च्या ४६ च्या तिप्पट आमदार निवडून आणले, असं सांगताना आजवरची त्यांची महाराष्ट्रातली (युती सरकारच्या वेळची) ६० च्या पुढची फिगर ते लपवतात. म्हणजे या बेरजा- वजाबाक्या केल्या तर दहा दिवस मोदींनी ठाण मांडून जास्तीच्या फक्त ३०-४० जागाच मिळाल्यात आणि सत्ताधाऱ्यांच्या साधारण तेवढय़ाच कमी! थोडक्यात, भाजप शत-प्रतिशत नाही आणि सत्ताधाऱ्यांचं पानिपतही नाही. 
पण शेवटी 'यश' हे 'यश' असतं असं म्हणतात. भाजपला १२३ जागा मिळताच राष्ट्रवादीने लगेचच बिनशर्त पाठिंबा दिला. तर ६३ आकडय़ाने जमिनीवर आलेले उद्धव ठाकरे 'प्रस्ताव आला तर-' इथपासून सुरू करून मोदी-शहांना अभिनंदनाचे फोन करूनच थांबले नाहीत, तर दोन देसाईंना दिल्लीदरबारी तहासाठी धाडले व स्वत: चहावाल्याला मुख्यमंत्री न होता भेटायला जायला तयार झाले!
कालपर्यंत 'अफझल खानाच्या फौजा, दिल्लीच्या तालावर नाचणार नाही, उंदीर कोण कळेल' असं मर्द मावळ्याच्या आवेशात बोलणारे उद्धव ठाकरे एकदम मवाळ मावळे झाले! महाराजांनी आग्य्राहून सुटका करून घेतली; पण हे स्वत:च बंदिवान होऊन आग्य््रााला निघालेत! अफझल खानाचा कोथळा काढणारे आता दिवाळी फराळाचं ताट घेऊन दिल्लीदरबारी रुजू होतील. या मवाळपणाचं कारण एकच : मोदींच्या याच झंझावाताने मुंबई महापालिकेच्या २६०० कोटी रुपये बजेटच्या पालिकेचा ताबा घेतला तर सेनेची रसद तुटून ती रस्त्यावर येईल. ठाणे, कल्याण सगळ्याच ठिकाणच्या सुभेदाऱ्या जातील. आणि नरेंद्र मोदी एक-एक गोष्टीचा हिशोब व्याजासह परत करणारे गृहस्थ आहेत. अमित शहा त्यांचे मुनीम आहेत. रंगशारदात आदित्यला पाठवायचे समर्थन करणारे उद्धव ठाकरे आता दिल्लीला का नाही पाठवत युवराजांना?


फार पूर्वी मी बाळासाहेबांची मुलाखत घेतली होती. साधारण ८५ साली. तेव्हा बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, 'मी पुनर्जन्म वगैरे मानत नाही. माझ्यानंतर सेनेचं काय होणार, याचाही विचार मी करत नाही. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत सेनेत माझाच शब्द चालणार!' तेव्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं स्वप्न, पुण्याई, त्यांचा आत्मा याचं भांडवल करू नये. स्वत: बाळासाहेब असताना मनोहर जोशी, नवलकर, वामनराव, दत्ताजी साळवी, सरपोतदार असे दमदार वक्ते सोबत वागवीत. प्रसंगी त्यांच्या स्वतंत्र सभा लावीत. आदित्यला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याऐवजी चंद्रकांत खरे, गीते, दिवाकर रावते, अरविंद सावंत यांना भाषणं करायला का लावली नाहीत? का त्यांच्या सभा लावल्या नाहीत? नीलम गोऱ्हे, शिवतरे, श्वेता परुळेकर यांनी नक्कीच सभा गाजवल्या असत्या. शेतकरी, कामगार, महिला यांचे प्रश्न त्यांनी मांडले असते. नेतृत्वाची फळी दिसली असती. वेगळे विषय बोलले गेले असते.
जी चूक राज ठाकरेंनी केली तीच उद्धव ठाकरेंनी केली. पीएच्या जिवावर पक्ष चालवता येत नसतो. आज सेनेत जी सेकंड रँक लीडरशिप आहे ती उद्धव यांना सर्वार्थाने सीनियर आहे! मग राहुल गांधी आणि तुमच्यात काय फरक? वारसा हक्क जन्मदाखल्याने मिळवता येतो; पण वारसा सांभाळायला कर्तृत्वच लागते. या निवडणुकीतून एवढे शिकले तरी पुरे.
राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा देऊन अटकपूर्व जामीन अर्ज भरलाय, असं गमतीने उपहासाने म्हटलं जातंय. पण भ्रष्टाचार, घोटाळे यांची चौकशी होऊन जेलमध्ये जावे लागेल या भीतीने शरद पवार काही करत असतील असं समजणं भाबडेपणाचं ठरेल!
९५ ला युतीचं सरकार आलं तेव्हा मुंडेंनी शरद पवारांवर असेच आरोप केले होते. भूखंडांचे श्रीखंड, एन्रॉन, दाऊद, ट्रकभर पुरावे सगळं होतं. राज्यात व केंद्रात 'भाजप' सहभागी सरकारं होती. चांगली पाच वर्षे होती. पवारांना काही होणं सोडाच; युती सरकार सत्तेत येण्यासाठी अपक्षांची फौज पवारांनीच पाठवली होती. 'हेलिकॉप्टरमधून गुंड आणले' म्हणणारे गडकरी वगैरेच नंतर पवारांसोबत हेलिकॉप्टरमधून बसून फिरून आलेत. कितीही एकमेकांवर टीका केली तरी महाराष्ट्रात युतीचं सरकार असताना केंद्रात पवार आपत्ती व्यवस्थापन हा विभाग केंद्रीय मंत्र्याचा दर्जा घेऊन सांभाळत होते!
त्यामुळे उद्या भाजपने 'राष्ट्रवादीचा पाठिंबा हा आपदधर्म आहे आणि घोटाळ्यांची चौकशी करून त्यांना तरुंगात धाडणे हा शाश्वत धर्म आहे,' असं सांगितल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. 
म्हणूनच यावेळी सर्व पक्ष हरले असून मतदार जिंकलेत! त्यांनी महाराष्ट्र कुठे आहे आणि तुम्हा सर्वाच्या जागा कुठे, हे नीट दाखवलंय.


शेवटची सरळ रेघ- 'पाठिंबा सेनेचा घ्या अथवा राष्ट्रवादीचा- मला महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री, विधान परिषद, महामंडळे द्या,' हे आपलं भरतवाक्य रामदास आठवले कधी (आणि किती वेळा) म्हणणार? त्यांना एकाच वेळी ही सर्व पदे 'अपवाद' म्हणून द्यायला काय हरकत आहे. 

No comments:

Post a Comment